रशियात स्कॉलटेक विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती
मुलभूत व उपयोजित विज्ञानासहित माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील स्कॉलटेक विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी २०१४ साठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- स्कॉलटेक विद्यापीठ म्हणजेच ‘स्कॉलकोव्हो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ हे रशियातील एक नामांकित खाजगी विद्यापीठ आहे. स्कॉलटेकचे नाव दोन गोष्टींमुळे झाले, एक म्हणजे अमेरिकेतील ‘एमआयटी’ विद्यापीठाच्या सहकार्याने २०११ मध्ये सुरु करण्यात आलेले विद्यापीठ म्हणून व दुसरे म्हणजे उपयोजित संशोधन व उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणारे येथील वातावरण. हे विद्यापीठ राजधानी मास्कोजवळ असलेल्या स्कॉलकोव्हो या उपनगरात आहे. नव्या पिढ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलभूत व उपयोजित संशोधनासाठी तयार करणे व त्यातून उद्योजकतेसाठी प्रेरित करणे या हेतूने स्कॉलटेक काम करत आहे. एकविसाव्या शतकात एका नव्या वैज्ञानिक युगाची लहर तयार करणे ज्यातून रशिया व जग या दोहोंचा फायदा होऊन जगातील अनेक समस्यंवर तंत्रज्ञानावर आधारित सृजनशील उत्तरे शोधता यावी...