रशियात स्कॉलटेक विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती



मुलभूत व उपयोजित विज्ञानासहित माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील स्कॉलटेक विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी २०१४ साठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.


शिष्यवृत्तीबद्दल:-


स्कॉलटेक विद्यापीठ म्हणजेच ‘स्कॉलकोव्हो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ हे रशियातील एक नामांकित खाजगी विद्यापीठ आहे. स्कॉलटेकचे नाव दोन गोष्टींमुळे झाले, एक म्हणजे अमेरिकेतील ‘एमआयटी’ विद्यापीठाच्या सहकार्याने २०११ मध्ये सुरु करण्यात आलेले विद्यापीठ म्हणून व दुसरे म्हणजे उपयोजित संशोधन व उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणारे येथील वातावरण. हे विद्यापीठ राजधानी मास्कोजवळ असलेल्या स्कॉलकोव्हो या उपनगरात आहे. नव्या पिढ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलभूत व उपयोजित संशोधनासाठी तयार करणे व त्यातून उद्योजकतेसाठी प्रेरित करणे या हेतूने स्कॉलटेक काम करत आहे. एकविसाव्या शतकात एका नव्या वैज्ञानिक युगाची लहर तयार करणे ज्यातून रशिया व जग या दोहोंचा फायदा होऊन जगातील अनेक समस्यंवर तंत्रज्ञानावर आधारित सृजनशील उत्तरे शोधता यावीत, हे ब्रीदवाक्य विद्यापीठाने समोर ठेवले आहे.



आवश्यक अर्हता :-


ही शिष्यवृत्ती आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्कॉलटेक विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याने या शिष्यवृत्तीसाठी चांगलीच स्पर्धा असते. शिष्यवृत्तीसाठी अर्जदार किमान पदवीधर असावा. मात्र, त्याची पदवी अभियांत्रिकी, गणित, उपयोजित विज्ञान (applied sciences), भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र इत्यादी विषयांमध्ये किंवा या विषयांशी संबंधीत असावी. पदवीच्या स्तरावर अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने जीआरइ परीक्षा दिली असेल तर विद्यापीठाला त्याबद्दल कळवावे.


अर्ज प्रक्रिया:


स्कॉलटेक विद्यापीठाची अर्जप्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये असते. पहिल्या टप्प्यात,अर्जदाराने या शिष्यवृत्तीसाठी त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून विद्यापीठाच्या वेबसाईटवर जमा करावा. त्या अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिकपार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस. ओ. पी. (Statement of Purpose), त्याचा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी मेल कराव्यात.


अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत जानेवारी २०१४ पर्यंत आहे.


महत्वाचा दुवा :-

http://www.skoltech.ru




वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. २३ सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?