कॅनडामध्ये पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिष्यवृत्ती
सैद्धांतिक पदार्थविज्ञानात जागतिक दर्जाच्या मोजक्या
स्वतंत्र संशोधन संस्थांपैकी एक म्हणजे कॅनडातील ‘पेरिमीटर इन्स्टिट्यूट फॉर
थिओरोटिकल फिजिक्स’. कॅनडातीलच वाटर्लु विद्यापीठाच्या सहकार्याने संस्थेकडून
सैद्धांतिक पदार्थविज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. या विषयात
संशोधन व उच्चशिक्षण करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी दोन्ही
संस्थांकडून एकत्रितपणे शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१६ साली दिल्या
जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी पदार्थविज्ञान किंवा गणित विषयातील आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून
दि. १ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल:
‘पेरिमीटर
इन्स्टिट्यूट फॉर थिओरोटिकल फिजिक्स’ ही कॅनडातील वाटर्लु शहरात असलेली संशोधन
संस्था आहे. पदार्थविज्ञानामध्ये गुणात्मक संशोधन करणाऱ्या जगातल्या ज्या काही
मोजक्या स्वतंत्र संशोधन संस्था आहेत, त्यापैकी ही एक. स्वत: अर्ध्यातच महाविद्यालयीन शिक्षण सोडून
दिलेल्या, ब्लॅकबेरीचे संस्थापक उद्योजक माईक लझारीदीस यांनी १९९९ साली या
संस्थेची स्थापना केली. सैद्धांतिक पदार्थविज्ञानात मुळातच जागतिक दर्जाचे संशोधन
फार कमी होते. पेरिमीटर इन्स्टिट्यूट म्हणूनच फक्त सैद्धांतिक पदार्थविज्ञानात
संशोधन करणारी संस्था आहे. कॅनडामध्ये असलेल्या वाटर्लु विद्यापिठाबरोबर पेरिमीटर
संशोधन संस्थेने अनेक अभ्यासक्रमांसाठी स्वत:ला जोडून घेतलेले आहे. दोन्ही
संस्थांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टरल विद्यार्थ्यांपर्यंत
अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. त्यापैकीच एक म्हणजे सैद्धांतिक पदार्थविज्ञानातील
पदव्युत्तर अभ्यासक्रम. या पदव्युत्तर संशोधन अभ्यासक्रमासाठी (मास्टर्स बाय
रिसर्च) पेरिमीटर संशोधन संस्था व वाटर्लु विद्यापीठाकडून ही शिष्यवृत्ती दिली
जाते. यावर्षी दिल्या जाणाऱ्या एकूण प्रवेश व संशोधन
शिष्यवृत्तींची संख्या ३० एवढी आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असेल.
या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला
विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरता पूर्ण शिष्यवृत्ती बहाल केली जाईल. ज्यामध्ये
त्याच्या विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्क, भोजन व निवास, आरोग्य विमा, लॅपटॉपसहित
सर्व शैक्षणिक साहित्य आणि प्रवास भत्ता
इत्यादींचा समावेश असेल. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही
शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही. अर्जदाराने त्याच्या आवडीच्या संशोधनाच्या
विषयाची उपलब्धता विद्यापीठाच्या किंवा पेरिमीटर संशोधन संस्थेच्या वेबसाईटवर तपासावी.
आवश्यक अर्हता :
या शिष्यवृत्तीला
अर्ज करण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदार पात्र आहेत. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार पदार्थविज्ञान
किंवा गणित या विषयांतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा किंवा पदव्युत्तर पदवीच्या
अंतिम वर्षाला शिकत असावा. मात्र, त्याच्या पदवीबरोबरच त्याच्याकडे संशोधनाचा
उत्तम अनुभव असावा. अर्जदाराला त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे
लागेल. पदवी व पदव्युत्तर
स्तरावर अर्जदाराची शैक्षणिक
पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी
.तसेच त्याचा पदार्थविज्ञानातील विविध संकल्पनांचा
सखोल अभ्यास असावा. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने टोफेल
या इंग्रजीच्या परीक्षेत
किमान ९० गुण मिळवणे गरजेचे आहे, ज्यामध्ये लेखन (writing) व बोलणे (speaking) या विभागांमध्ये किमान २५ गुण असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया:
या
शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण
करून दुव्यामध्ये दिलेल्या वेबसाईटवर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने
अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल फक्त एका पानात माहिती
देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., आतापर्यंत त्याने
केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन अहवाल (Research
Proposal), प्रकाशित केलेल्या
शोधनिबंधाची यादी, त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या तीन प्राध्यापक
किंवा तज्ञांची लेटरहेडवर नमूद केलेली शिफारसपत्रे, आतापर्यंतच्यासर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती आणि टोफेलच्या गुणांची प्रत इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदाराने जर टोफेल परीक्षा
दिली नसेल तर तो आयइएलटीएस किंवा सीएइएल (Canadian Academic English Language Assessment) या
परीक्षांचे गुण संस्थेला कळवू शकतो. या शिष्यवृत्तीसाठी जीआरई परीक्षा उत्तीर्ण
असणे आवश्यक नाही मात्र अर्जदाराने जर जीआरई परीक्षा दिली असेल तर जीआरईचे गुण अधिकृत
संस्थेमार्फत गुण विद्यापीठास कळवावे. अर्जदार
पदव्युत्तर अभ्यासक्रमाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज
जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ञ मार्गदर्शकाला इमेलद्वारे
संपर्क करू शकतो.
निवडप्रक्रिया:-
अर्जदाराची सैद्धांतिक पदार्थविज्ञानातील गुणवत्ता, त्यातील
त्याची आवड व एकूण स्पर्धात्मकता लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली
जाईल. संस्था विविध पार्श्वभूमी असलेल्या व वेगवेगळ्या देशांमधील अर्जदारांची निवड
या शिष्यवृत्तीसाठी करू पाहते आहे. शिष्यवृत्तीधारकाला या अभ्यासक्रमास प्रवेश
मिळाल्यावर त्याला इतर कुठेही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी स्वीकारता येणार नाही.
निवड झालेल्या अर्जदारांची यादी विद्यापीठाच्या व संस्थेच्या वेबसाईटवर प्रकाशित
केली जाईल.
अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ फेब्रुवारी २०१६ आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ फेब्रुवारी २०१६ आहे.
महत्वाचा दुवा :-
वरील लेख (कॅनडामध्ये पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत २१ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाला.
Comments
Post a Comment