केंब्रिजमध्ये गणितातील रामानुजन शिष्यवृत्ती

केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनीटी कॉलेजमध्ये गणितात असामान्य संशोधन करून अल्पावधीतच जगभर प्रसिध्दी मिळवलेले थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांचे व ट्रिनीटी कॉलेजचे असलेले गहिरे संबंध अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या नावाने फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी केंब्रिजमध्ये गणितातील संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा ही शिष्यवृत्ती हुशार वगणितातील संशोधनाची प्रचंड आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. याशिष्यवृत्तीसाठी केंब्रिज विद्यापीठाकडून दि. १५ जानेवारी, २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.


शिष्यवृत्तीबद्दल:

       वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे व ट्रिनीटी कॉलेजचे असलेले गहिरे संबंध अधोरेखित करण्यासाठी ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देण्यात येते. मुलभूत गणित किंवा उपयोजित गणितात व्यापक संशोधन व्हावे या हेतूने भारतीय विद्यार्थ्यांना पी.एच.डी. पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.रामानुजन शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षाचा असून या कालावधीतच विद्यार्थ्याला त्याचे पी.एच.डी.चे संशोधन पूर्ण करावयाचे आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थ्याला विद्यापीठाची ट्युशन फी, भारतातून येण्याजाण्याचा संपूर्ण विमानप्रवास, निवासासहित इतर खर्च व मासिक भत्ता इत्यादी सर्व फायदे मिळणार आहेत.शिष्यवृत्तीचा एकूण वार्षिक भत्ता तेरा हजार युरो एवढा असून विद्यार्थ्याच्या त्यामध्ये त्याचाविमानप्रवास,निवासासहित इतर खर्च व त्याला तिथे घ्याव्या लागणाऱ्या नऊ महिन्याच्या अतिरिक्त अभ्यासक्रमाच्या फीचा समावेश आहे. अर्थातच, शिष्यवृत्तीधारकाच्या या अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेवरच त्याची शिष्यवृत्ती पुढील वर्षासाठी सुरु राहील.


आवश्यक अर्हता:


ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठीच खुली आहे. भारतातील कोणत्याही विद्यापीठातील किंवा समकक्ष दर्जाच्या संस्थेतून गणितातील पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. अर्जदाराला अगोदरच केम्ब्रीज विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला असू नये. अर्जदाराची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यावर त्याला पी.एच.डी. अभ्यासक्रम सुरु करण्याअगोदर नऊ महिन्यांचा पदव्युत्तर दर्जाचा ‘मास्ट’ (Master of Advanced Study in Mathematics) अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. या अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेवरच विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती त्याच्या पी.एच.डी.च्या पुढील वर्षासाठी सुरु ठेवता येईल. इतर अर्हतांमध्ये मग विद्यार्थ्याची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी आणि त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच त्यानेटोफेल अथवा आयईएलटीएस या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


अर्ज प्रक्रिया:

रामानुजन शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून ट्रिनीटी कॉलेजच्या खाली दिलेल्या वेबसाईटवर जमा करावा. ज्या विद्यार्थ्यांना प्रक्रियेद्वारे अर्ज पाहवता येणार नाही, ते अर्ज आंतरराष्ट्रीय कुरियर किंवा पोस्टानेदेखील पाठवू शकतात. शिष्यवृत्तीच्या या अर्ज्प्रक्रीयेमध्ये एकूण दोन भाग आहेत. पहिला भाग अर्जदाराने पूर्ण करावयाचा आहे. तर दुसरा भाग त्याच्या तज्ञ प्राध्यापक किंवा संशोधन मार्गदर्शकाने. अर्ज पूर्ण करून वेळेअगोदर पाठवणे आवश्यक आहे. त्यामध्ये मग विद्यार्थ्याच्या शैक्षणिक किंवा संशोधन पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे हीसुद्धा वेळेत येणे अपेक्षित आहे. अर्जाबरोबर विद्यार्थ्याने त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारा त्याचा सी.व्ही., विद्यार्थ्यालाया शिष्यवृत्तीला का अर्ज करावासा वाटतो हे थोडक्यात सांगणारे एस.ओ.पी.,आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत विद्यापीठीय प्रती इत्यादी कागदपत्रे देखील जोडावीत.

निवड प्रक्रिया:

शिष्यवृत्तीच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असून अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल मार्च किंवा मेपर्यंत कळवले जाईल.


अंतिम मुदत:-


या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ जानेवारी, २०१४ आहे.


महत्वाचा दुवा :-


http://www.trin.cam.ac.uk




वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. ४ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?