फिनलंडमध्ये सीमो पाठ्यवृत्ती कार्यक्रम



फिनलॅण्डमधील द सेंटर फॉर इंटरनॅशनल मोबिलिटी (CIMOCIMO CIMO) या संस्थेकडून विविध विद्याशाखांमध्ये संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी संशोधन पाठ्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणाऱ्या पाठ्यवृत्तीसाठी सर्व विद्याशाखांमधील पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आलेआहेत. या पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची फिरती अंतिम मुदत (rolling deadline) आहे.

पाठ्यवृत्तीबद्दल:-
सीमो’चा हा पाठ्यवृत्ती कार्यक्रम संशोधनाची प्रचंड आवड असलेल्या सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय युवक- युवतींसाठी आहे. हा कार्यक्रम जरी सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना खुला असला तरी रशिया, चीन, भारत, चिली, ब्राझिल या देशांतील अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. पाठ्यवृत्तीचा एकूण कालावधी त्या विद्याशाखेवर किंवा संशोधन विषयांवर अवलंबून आहे. तरी साधारणतः हा कालावधी तीन महिन्यांपासून एक वर्षापर्यंत असू शकतो. संस्थेकडून या कालावधी दरम्यान निवड झालेल्या अर्जदाराला ९०० ते १२०० युरोंचा मासिक भत्ता देण्यात येईल. पदव्युत्तर किंवा पी.एच.डी.नंतरच्या पदवीचा (पोस्टडॉक्टरल स्टडीज) या पाठ्यवृत्ती कार्यक्रमामध्ये अंतर्भूत नाही. तसेच पाठ्यवृत्तीचा कालावधी अपवादात्मक स्थितीमध्ये वाढवण्यात येईल, अन्यथा तो तीन महिन्यांपासून एक वर्षापर्यंतच राहील.


आवश्यक अर्हता :-
ही पाठ्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांमध्ये दोन गट करण्यात येतील. त्यातील पहिल्या गटात किंवा प्राथमिक गटामध्ये फिनिश विद्यापीठात पी.एच.डी. करणाऱ्या किंवा तिथे पी.एच.डी.ला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. दुसऱ्या गटामध्ये बहिस्थ: अर्जदारांचा समावेश असेल. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टरल अभ्यासक्रमाचे किंवा संशोधन करणारे असे विद्यार्थी जे सध्या कोणत्याही इतर परदेशी विद्यापीठामध्ये स्वत:चे संशोधन करत आहेत, त्यांचा समावेश असेल. दुसऱ्या गटातील अर्जदारांकडे जर एखाद्या यजमान फिनिश विद्यापीठाचे शिफारसपत्र असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता जास्त आहे. या बरोबरच अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी व त्याचे इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व असावे.

अर्ज प्रक्रिया:
या पाठ्यवृत्तीसाठी त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून पाठवणे आवश्यक आहे. संस्थेने त्यांच्या वेबसाईटवर ‘सीमो पाठ्यवृत्ती अर्ज’ असे नमूद केलेले आहे. अर्जदाराने त्या अर्जावर सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज पूर्ण भरून त्याची प्रिंट घेऊन त्यावर अर्जदाराने सही करावी. अर्जावरील काही पर्याय भरण्यासाठी संगणकाच्या ‘माउस’ किंवा ‘स्पेस की’चा वापर करावा. अर्जदार अर्ज फिनिश, स्वीडिश किंवा इंग्रजीपैकी कोणत्याही एका भाषेत पाठवू शकतो. अर्जदाराने संपूर्ण भरलेल्या अर्जाच्या दोन प्रतीसह स्वत:चे एस. ओ. पी.(Statement of Purpose),त्याच्या शिक्षण,शिक्षणेतर उपक्रम, नोकरी व अनुभव इत्यादी बाबींची माहिती देणारा सी.व्ही, त्याच्या संशोधनाबद्दल थोडक्यात माहिती देणारा रिसर्च प्लॅन वं यजमान फिनिश विद्यापीठाचे शिफारसपत्र इत्यादी कागदपत्रे जोडावी. लिफाफ्यावर संबंधित पाठ्यवृत्तीचा उल्लेख करून संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर अर्जदाराने आपला अर्ज आंतरराष्ट्रीय कुरियरने पाठवावा. अर्जदाराला त्याच्या निवडीविषयी त्याने अर्ज सादर केल्यापासून तीन महिन्यानंतर कळवण्यात येईल.

अंतिम मुदत:-
या पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची फिरती अंतिम मुदत (rolling deadline) आहे म्हणजेच निश्चित अंतिम मुदत नाही. मात्र, अर्जदाराला ज्यावेळी त्याचा संशोधन कार्यक्रम सुरु करावयाचा आहे त्या अगोदर पाच महिने त्याने आपला अर्ज संस्थेकडे पाठवावा.  
महत्वाचा दुवा :-


वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. ९ सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?