हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

हॉंगकॉंगमधील हिनरीक फाउंडेशनकडून दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित विषयांमध्ये पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पूर्णवेळ शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षीसुद्धा ह्या फाउंडेशनकडू आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या या विषयासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.


पार्श्वभूमी :- 
मर्ल हिनरीक यांनी स्थापन केलेले हॉंगकॉंगमधील हिनरीक फाउंडेशन हे जागतिक व्यापाराला चालना देण्याचं काम त्यांच्या छोटयाशा पातळीवर करत आहे. हे काम करत असताना संस्थेनं आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित योजना, व्यापारासंबंधी शिक्षण-प्रशिक्षण व त्यातून रोजगार निर्माण इत्यादी विषयांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. एकूणच, या साऱ्यातून राष्ट्रा-राष्ट्रांमधील शांतता वाढीस लागो, असा उदात्त हेतू समोर ठेवून हिनरीक फाउंडेशन प्रामाणिकपणे काम करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासारख्या व्यापक विषयाची आवड असणाऱ्या हुशार व ध्येयवादी भारतीय विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत असे संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे. ही शिष्यवृत्ती आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्येतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  ('एम.ए.इन इंटरनॅशनल जर्नलिझम') दिली जाणार आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून, यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्याला या वर्षासाठी पूर्णवेळ शिष्यवृत्ती (पदवीनंतर संस्थेच्या काही औपचारिक करारासह) दिली जाणार आहे.
आवश्यक पात्रता :- 
हिनरीक फाउंडेशनच्या या शिष्यवृत्तीसाठी फक्त भारतीय नागरिकत्व असलेले अर्जदार पात्र आहेत. अर्ज करतेवेळी अर्जदाराकडे वृत्तपत्रविद्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार अथवा त्याच्याशी संबंधित असलेल्या विषयातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी  असावी. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा IELTS  या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांना फाउंडेशनच्या नियमांनुसार हॉंगकॉंग बाप्तीस्त विद्यापीठामध्ये 'एम.ए.इन इंटरनॅशनल जर्नलिझम' हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक व इतर गरजांसाठी संबंधित विद्यार्थ्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीबद्दल:-
 निवड झालेल्या विदयार्थ्यांना हिनरीक फाउंडेशनकडून पूर्णवेळ शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये विद्यापीठाची ट्युशन फी, शैक्षणिक साहित्य व अभ्यासक्रमाशी संबंधित इतर फी, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक खर्चासाठी (राहणे,खाणे व इतर खर्च) लागणारा मासिक भत्ता, याबरोबरच त्याचे भारत ते हॉंगकॉंगपर्यंत येण्याजाण्याचे विमानाचे तिकीट आणि विद्यार्थ्याच्या हॉंगकॉंगमधील निवासादरम्यान विसा बाळगण्यासाठी येणारा खर्च या साऱ्याचा समावेश आहे. संस्थेचं काम मुळात जागतिक व्यापार वृद्धी व त्यातून आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण असल्याने पत्रकारितेच्या या अभ्यासक्रमासाठी  आंतरराष्ट्रीय व्यापार वा  त्याच्याशी संबंधित इतर बाबींचा अभ्यास/वाचन विदयार्थ्याला पुढे बरचसं उपयुक्त ठरू शकतं. शिष्यवृत्तीधारकाला पदवी पूर्ण झाल्यानंतर मात्र दोन वर्षे करारानुसार 'नॅसडॅक' किंवा 'ग्लोबल सोर्सेस'सारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करावे लागेल, अर्थातच लठ्ठ पगारासह.

अर्ज प्रक्रिया: 
प्रवेशासाठीचे निकष तर वर आपण पाहिलेच आहेत. आता अर्जप्रक्रियेविषयी बोलू. अर्जदाराने अर्ज करण्याअगोदर स्वत:बरोबर खालील गोष्टी तयार ठेवाव्यात.

  1. स्वत:चे शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभव इ. बाबींनी सज्ज रेझ्युमे.
  2. दोन तज्ञांचे शिफारसपत्र. पैकी एक अर्जदाराच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित म्हणजेच त्याच्या प्राध्यापकांचे व दुसरे व्यावसायिक अनुभवाचे, संबंधित वरिष्ठांकडून.
  3. शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स् किंवा त्याची ई-कॉपी.
  4. पासपोर्ट व पदवी प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी.
या सर्व माहितीसह आपला अर्ज अर्जदाराने mail.nguyen@hinrichfoundation.com या इ-मेल वर पाठवून द्यावा.

अंतिम मुदत:-

अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २० फेब्रुवारी २०१३ आहे. निवडलेल्या अर्जदारांना साधारणत: मार्च-एप्रिलच्या सुमारास मुलाखतीसाठी बोलवले जाईल व त्यातून अंतिम उमेदवारांची निवड केली जाईल.
 महत्वाचे दुवे :-
वेब: www.hinrichfoundation.com





वरील लेख (http://www.loksatta.com/career-vrutant-news/national-international-scholarship-hinrik-international-newspaper-education-scholarship-45312/) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. २१ जानेवारी २०१३ रोजी छापून आला. 

Comments

Popular posts from this blog

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?