डॉक्टर्ससाठी मॉलिक्युलर मेडिसिनमध्ये पी.एच. डी.


जर्मनीमधील प्रख्यात हॅन्नोवर मेडिकल स्कूलमध्ये बायोमेडिकल रिसर्च" विभागामार्फत मॉलिक्युलर मेडिसिन या विषयात पी.एच.डी.साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी जीवशास्त्र वा वैद्यकीय क्षेत्रांतील उच्च पदवीधरांकडून दि.१ एप्रिल २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
 पार्श्वभूमी :-
 हॅन्नोवर मेडिकल स्कूलकडून दिली जाणारी पी.एच.डी.पदवी जर्मनीमधील तीन नामांकित वैद्यकीय संशोधन संस्था अनुक्रमे लेबनित्झ युनिव्हर्सिटी ऑफ हॅन्नोवर, द युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी मेडिसीन, हॅन्नोवर आणि हेल्मोल्टझ् सेंटर ऑफ इन्फेक्शन रिसर्च या सर्वांच्या सहकार्याने दिली जाते. या डॉक्टरल  अभ्यासक्रमासाठी पूर्वी DAAD अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जायची. आता मात्र, German Excellence Initiative’ कार्यक्रमांतर्गत या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.संबंधित पी.एच.डी. जरी मॉलिक्युलर  मेडिसिनमध्ये असली तरी संशोधनाचे उपविषय बव्हंशी व्यापक आहेत. पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या संशोधनाची पातळी अतिशय उच्च असून हा अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रांतील युरोपियन मानकांनुसार मुल्यांकित केलेला आहे.
शिष्यवृत्तीबद्दल :
हॅन्नोवर मेडिकल स्कूलची ही शिष्यवृत्ती ऑक्टोबर २०१३मध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आहे. या शिष्यवृत्तीचा कालावधी तीन  ते चार वर्षाचा आहे. तसेच, शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला या संपूर्ण कालावधीसाठी दरमहा साधारणपणे १२०० ते १३५० युरो एवढा भत्ता दिला जातो. विद्यापीठाने जीवशास्त्र या विषयातील उच्च पदवीधरांसाठी हि शिष्यवृत्ती आहे असे त्यांच्या वेबसाईट जरी म्हटले असले तरी आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी हा निकष थोडा वेगळा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडे वैद्यकीय क्षेत्रामधील MBBS किंवा MD पदवी असेल तर त्यांना या डॉक्टरल कार्यक्रमासाठी सहज प्रवेश मिळू शकतो. म्हणूनच या लेखाचे शीर्षकसुद्धा ही शिष्यवृत्ती वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधरांनाच जास्त उपयुक्त आहे असे दर्शवते. 
आवश्यक पात्रता :- 
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराकडे वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी असावी. आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडे किमान MBBS अथवा व्हेटर्नरी मेडिसीन, बायोकेमिस्ट्री किंवा  मॉलिक्युलर बायोलॉजी मधील पदव्युत्तर पदवी (M.Sc.) असावी.  त्याचबरोबर अर्जदाराकडे किमान ६ महिन्यांचा एखाद्या प्रकल्प संशोधनाचा अनुभव असावा. अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा IELTS  या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय ३२ पेक्षा जास्त असू नये.
अर्ज प्रक्रिया: 
 स्कूलच्या वेबसाईटवर अर्जप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. ही वेबसाईट जर्मन, डच व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी इंग्रजी भाषा निवडावी. अर्जदाराला फक्त शिष्यवृत्तीसाठी कोणताही स्वतंत्र अर्ज नसून पी.एच.डी.प्रवेश व शिष्यवृत्ती दोन्हींसाठी मेडिकल स्कूलकडे एकच अर्ज करायचा आहे. सर्वप्रथम अर्जदाराला स्वत:ची माहितीसह मेडिकल स्कूलच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर स्कूल कडून अर्जदाराला एक इ-मेल पाठवला जाईल. त्या इ मेलवर अर्जदाराची ओळख पटल्यानंतर  मग अर्जदाराला पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. अर्जप्रक्रीयेचा एक भाग म्हणून  अर्जदाराला त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित दोन तज्ञांचा इ-मेल आयडी अर्जात नमूद करावा लागेल. स्कूल नंतर त्यांना स्वतंत्रपणे संपर्क करून अर्जदारासाठी शिफारसपत्र मागवून घेईल.
अंतिम मुदत:- 

अर्जदारांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. एप्रिल 
२०१३ आहे.
 महत्वाचे दुवे:-

वरील लेख (http://www.loksatta.com/career-vrutant-news/national-international-scholarshipsscholarships-regarding-biomedical-research-83146/) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि.१८ मार्च २०१३ रोजी प्रकाशित झाला.




Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?