उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?


खरंतर परदेशातील उच्चशिक्षण ही खूप अगोदरपासून नियोजनबद्ध करण्याची बाब आहे. आपल्याकडे परदेशात जाणारे सर्वात जास्त विद्यार्थी हे अभियांत्रिकी शाखेचे असतात. त्याखालोखाल वैद्यकीय,फार्मसी, व्यवस्थापन आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्ज करतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला(Masters) जाणारे असतात. हे विद्यार्थी भारतात असताना येथील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आता पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे असा विचार सुरु करतात. इतर शाखांच्या तुलनेत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र परदेशातील उच्चशिक्षणाबाबतीत थोडी अधिक जागृती आहे. कदाचित म्हणून बरेचसे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असतानाच परदेशातील पुढच्या शिक्षणाची तयारी सुरु करतात. परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मग तिथेच पीएचडीला अर्ज करायचा असाही बऱ्याचजणांचा विचार असतो. तो योग्यही आहे. त्यातही परदेशातील उच्चशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा हा अमेरिकेकडे असतो. मात्र, उच्चशिक्षणासाठी अमेरिकेबरोबरच युके आणि युरोपमधील इतर देश हे सुद्धा उत्तम पर्याय आहेत. त्याबरोबर फक्त अभियांत्रिकीमधूनच नाही तर इतरही शाखेतील विद्यार्थ्यांना अनेक अभ्यासक्रमांसाठी परदेशात उच्चशिक्षणासाठी जाता येते ते  ही फक्त 'मास्टर्स'ला नाही तर पीएचडीसाठीसुद्धा. पण दुर्दैवाने बऱ्याच विद्यार्थ्यांना याबाबत काहीही माहिती नसते. परदेशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या टाळाव्या लागणाऱ्या गोष्टींबद्दल आजच्या भागात थोडीशी माहिती घेऊ.

परदेशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी काय करावे लागेल?
परदेशातील उच्चशिक्षण घेण्याचा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमासाठी आणि कोणत्या देशात जायचे आहे हे व्यवस्थित ठरवता आले पाहिजे. याचं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना जसे आपण पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अर्ज करावा की पीएचडीला हेच समजत नाही, तसेच युरोपमध्ये पुढील शिक्षण घ्यावे की अमेरिकेत हेच कळत नाही. बऱ्याचदा अमेरिकेचा थोडा बोलबाला झालेला आहे म्हणून तिकडच्या विद्यापीठांना अर्ज केला जातो किंवा कोणीतरी मित्र किंवा नातेवाईक अमेरिकेत आहेत म्हणून अमेरिकन विद्यापीठांना अर्ज पाठवले जातात. हे निकष पूर्णपणे चुकीचे आहेत. उच्चशिक्षणासाठी आपल्या संशोधनाचा किंवा अभ्यासक्रमाचा विषय कोणत्या ठिकाणी उत्तम शिकवला जातो हे व्यवस्थितपणे पाहून मग त्या विद्यापीठाचा संबंधित विषयाच्या संशोधनात जागतिक क्रमवारीत कितवा क्रमांक आहे हे पाहून विद्यापीठाची किंवा देशाची निवड करणे योग्य ठरेल. प्रचलित पद्धतही इथे वापरता येईल. उदाहरणार्थ, पदार्थविज्ञान किंवा मुलभूत विज्ञानाच्या कोणत्याही विषयांतील संशोधनासाठी जर्मनी किंवा इतरही अनेक युरोपीयन देश हे उत्तम पर्याय आहेत. संगणक अभियांत्रिकीसाठी अमेरिकेतील बऱ्याच विद्यापीठांना विद्यार्थ्यांची प्रथम पसंती असते. तसेच व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी युके हा उत्तम पर्याय समजला जातो.
एकदा का ठराविक देशाची निवड ठरली की मग प्रश्न येतो कोणत्या परीक्षा द्यायच्या? प्रत्येक देशानुसार व अभ्यासक्रमानुसार हे उत्तर वेगळे असेल. भारत इंग्रजी राष्ट्रभाषा नसलेला देश आहे म्हणून इंग्रजीची टोफेल किंवा आयइएलटीएस या दोन्हींपैकी एक परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना द्यावीच लागते. त्या- त्या देशानुसार द्याव्या लागणाऱ्या परीक्षांची माहिती पुढे विस्तृतपणे दिलेली आहे.


अमेरिका (यूएसए)
बऱ्याच विद्यार्थ्यांची उच्चशिक्षणासाठी पहिली पसंती अमेरिकेला असते. याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील जागतिक दर्जाची विद्यापीठे व त्यांचे संशोधन. विद्यार्थ्याला त्याचे  उच्चशिक्षण जर अमेरिकेत घ्यायचे असेल तर त्याला  GRE (Graduate Record Exam)    TOEFL (Test of English as a Foreign Languageया दोन परीक्षा देणे अनिवार्य आहे. या दोन्ही परीक्षा अमेरिकेतील  ETS ( Educational Testing Service) या संस्थेकडून घेतल्या जातात. यापैकी जीआरई  ही परीक्षा विद्यार्थ्याला संगणकावर आधारित ( Computer Based) द्यायची आहे की  पेपरवर आधारित (Paper Based) द्यायची आहे हे ठरवावे लागते. जीआरई परीक्षा पूर्वी १६०० गुणांची असायची आता मात्र ती ३४० गुणांची करण्यात आली आहे. यामध्ये तीन पेपर असतात. Analytical writing, Quantitative reasoning, Verbal reasoning.  टोफेल ही फक्त इंग्रजीची परीक्षा आहे. अमेरिकेतील बरीचशी विद्यापीठे आयइएलटीएस परीक्षा स्वीकारत नाहीत. त्यामुळे जीआरईबरोबर टोफेल ही परीक्षाही द्यावी लागते. टोफेलमध्ये चार विभाग असतात. Reading, Writing, Listening, Speaking.  ही परीक्षा जरी १२० गुणांची असली तरी यामध्ये फक्त उत्तीर्ण होऊन चालत नाही. जगभरातल्या बऱ्याचशा विद्यापीठांना टोफेलमध्ये किमान ८० गुण हवे असतात. जीआरईच्या गुणांची वैधता पाच वर्षांची असते तर टोफेलची दोन वर्षांची. जीआरई-टोफेलचे गुण थेट विद्यापीठाला न कळवता ETS मार्फत (Educational Testing Service) कळवावे लागतात. संगणक, जैव-अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकीच्या किंवा अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी बहुतांश विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम अमेरिका असतो. याशिवाय एमबीए, वैद्यकीय अभ्यासक्रम, मानसशास्त्र आणि मुलभूत विज्ञानातील संशोधन इत्यादी विषयांतील अभ्यासक्रमांसाठीसुद्धा विद्यार्थी अमेरिकेची निवड करतात. 
 जर्मनी
अमेरिकेखालोखाल अभियांत्रिकीमधील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची पसंती जर्मनीला असते. अमेरिकेपेक्षा जर्मनीतील शैक्षणिक व्यवस्था थोडीफार वेगळी आहे. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सत्रात इथे जास्त परीक्षा नसतात. मग वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्याला सगळ्या परीक्षा एकदम द्याव्या लागतात. जर्मनीमध्ये उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला शैक्षणिक बाबींमध्ये जरी जर्मन भाषेची गरज नसली तरी थोडीफार तरी जर्मन येणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याला जर्मनीत उच्चशिक्षण घेण्यासाठी फक्त इंग्रजीची परीक्षा (English Profienciency Test)  द्यावी लागते.जर्मनीतील बहुतांश विद्यापीठे आयइएलटीएस (IELTS - International English Language Testing System) स्वीकारतात. फक्त आयइएलटीएसच्या उत्तम गुणांवर व उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमीवर जर्मनीत सहजरीत्या प्रवेश मिळू शकतो. मॅक्स प्लॅंक संशोधन संस्थेसारख्या नामांकित संशोधन संस्था इथे असल्याने साहजिकच  विद्यार्थ्यांचा ओढा मुलभूत विज्ञान, अभियांत्रिकीतील विविध शाखा यांसारख्या अभ्यासक्रमाकडे असतो.
युके

व्यवस्थापन,शास्त्र, भाषा आणि कलाशाखेचे बरेचसे विषय किंवा त्यातील संशोधन यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांकडून युकेला प्राधान्य दिले जातात. जागतिक मानांकनात असलेली यूकेतील ऑक्सफर्ड, केम्ब्रिजसारखी अनेक विद्यापीठे, विविध शाखांमध्ये सुरु असलेले उत्कृष्ट दर्जाचे संशोधन व एकूण जागतिक संशोधनात सर्वात जास्त असलेला वाटा या सर्व जमेच्या बाजू असल्याने युकेकडे  आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओढा नसेल तरच नवल. युकेमधील अर्जप्रक्रिया बव्हंशी जर्मनीशी साम्य दाखवणारी आहे. फॉल किंवा स्प्रिंगमधील प्रवेश, त्यावर आधरित अर्जप्रक्रिया व अंतिम मुदत. कोणत्याही विद्यापीठातील प्रवेशासाठी आयइएलटीएस किंवा टोफेलमध्ये किमान गुण. युकेमध्ये या दोन्ही परीक्षा वैध आहेत. येथील प्रवेशासाठी जीआरईची गरज नाही. जर व्यवस्थापन शाखेतल्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल तर GMAT (Graduate Management Admission Test) मध्ये उत्तम गुण हवेत.  

अर्जप्रक्रिया व त्यातील काही समान गोष्टी  
वरीलपैकी कोणत्याही देशात दोन वेगवेगळे शैक्षणिक सत्र असतात. फॉल किंवा स्प्रिंग. साधारणतः ऑगस्टमध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्राला फॉल म्हणतात तर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या आसपास सुरु होणाऱ्या सत्राला स्प्रिंग असे म्हणतात. विद्यार्थ्याला फॉल किंवा स्प्रिंग यापैकी एका सेमिस्टरला अर्ज करावा लागतो. अर्ज करताना अर्जाची फी मात्र प्रत्येक देशातील विद्यापीठावर अवलंबून असते. वरील तिन्ही देशांपैकी कुठेही अर्ज करताना अर्जासहित विद्यार्थ्याने एस.ओ.पी. (Statement of Purpose)त्याचा सी.व्ही.दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे (Letter of Recommendations)आतापर्यंतच्यासर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी कुरियरने त्या विद्यापीठाकडे पाठवाव्यात. यापैकी काही गोष्टी प्रत्येक विद्यापीठाच्या गरजेनुसार वेगवेगळ्याही असू शकतात. त्या त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर अर्ज कसा करावा याबद्दल विस्तृतपणे माहिती दिलेली असतेच. ती तपासून मगच अर्ज करावा. परदेशात प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे आरोग्य विमाकवच घ्यावे लागते. प्रत्येक देशाच्या निकषांनुसार आरोग्य विम्याची रक्कम मात्र वेगवेगळी असेल. कोणत्याही देशात विद्यार्थ्याला उच्चशिक्षण घ्यावयाचे असो त्याची इंग्रजीवर प्रभुत्व आणि शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम असणे गरजेचे आहे. तसेच GRE, TOEFL, GMAT किंवा IELTS या परीक्षांमध्ये किमान गुण परदेशी विद्यापीठात फक्त प्रवेश मिळवून देऊ शकतात. मात्र जर चांगल्या विद्यापिठामध्ये प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्याला संबंधित परीक्षेत उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याकडे जर कामाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र असेल किंवा संशोधनाच्या बाबतीत त्याचे ‘संशोधन प्रबंध’ प्रकाशित झाले असतील तर प्रवेशाच्या संधी जास्तपटीने वाढतात हे लक्षात घ्यावे. अर्जाच्या प्रक्रियेपासून ते प्रवेश मिळेपर्यंत इतर दोन देशांच्या तुलनेत अमेरिकन अर्जप्रक्रिया जास्त खर्चिक आहे.

पीएचडी का एमएस?  
भारतातून परदेशी  उच्चशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडलेला हा मोठा प्रश्न असतो. पीएचडीसाठी विद्यापीठाकडून मासिक आर्थिक भत्ता सहज उपलब्ध होते. पण पीएचडीला प्रवेश मिळवणे खूप कठीण आणि स्पर्धात्मक असते. पीएचडीला अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला आपण पीएचडीसाठी अर्ज का करतोय हे व्यवस्थितपणे माहित असायला हवे. म्हणजे कोणीतरी मित्रमैत्रिणी पीएचडीला अर्ज करताहेत म्हणून किंवा उत्तम  आर्थिक वेतन मिळवायचे आहे म्हणून पीएचडीला अर्ज करायचा निर्णय घेऊ नये. परदेशात विज्ञान किंवा अभियांत्रिकीमध्ये पीएचडी करणे हे समर्पित भावनेने करावयाचे काम आहे. पीएचडीला अर्ज करण्याअगोदर संशोधन म्हणजे नेमके काय हे पूर्णपणे समजून घ्यावे नंतर आवश्यक ती तयारी करून पीएचडीला अर्ज  करावा.


आर्थिक मदतीबद्दल
परदेशातील शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला शिष्यवृत्ती किंवा एखादी पाठ्यवृत्ती तरी मिळावी अशी इच्छा असते. कारण त्यामध्ये मग ट्युशन फी भरता येते व त्याबरोबरच तिथल्या वास्तव्याचा व खर्चाचा प्रश्न निकाली निघतो. अमेरिकेमध्ये मात्र आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र विद्यार्थ्याला ‘ट्युशन फी वेव्हर’ म्हणजेच ट्युशन फीमधून मुक्तता मिळू शकते. मग आर्थिक प्रश्न कसा सोडवायचा? अमेरिकेतील प्रत्येक विद्यापीठाला तेथील औद्योगिक क्षेत्राचे मोठे पाठबळ मिळत असते. त्या पाठबळावर विद्यापीठ जमेल तेवढ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्याकडील ‘कमवा आणि शिका’ योजनेसारखे त्या विद्यापीठाच्या आवारात अर्धवेळ काम (Part time job) करण्याची मुभा देते. ही कामे विद्यापीठाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, ग्रंथालयातील पुस्तकांच्या कामापासून ते कनिष्ठ विद्यार्थ्यांना एखादा विषय शिकवण्यासारखी ही कामे असतात. अमेरिकतल्या विसा नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यात एकूण वीस तास काम करण्याची परवानगी मिळते. हाच नियम जर्मनी व युकेमध्येही लागू आहे. सुट्टीमध्ये तर विद्यार्थी या तिन्ही देशांमध्ये पूर्णवेळ काम करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम असेल त्यांना रिसर्च असिस्टंट (RA) तर काही विद्यार्थ्यांना टीचिंग असिस्टंट (TA)  म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांना उत्तम वेतनही दिले जाते. कोणतेही अर्धवेळ काम असो, विद्यार्थ्याला त्या शहराच्या खर्चानुसार किमान मासिक वेतन मिळावे एवढी काळजी विद्यापीठाने घेतलेली असते. जर्मनी व युकेमध्ये साधारणपणे एका तासाला सहा ते सात युरो एवढ्या दराने विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन दिले जाते. ‘ट्युशन फी वेव्हर’साठी विद्यार्थ्याने विद्यापीठाचे निकष वेबसाईटवर तपासावेत. तसेच विद्यापीठाकडून दिले जाणारे अर्धवेळ काम हे गृहीत धरू नये. कारण हे काम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दिले जाते. तसेच विद्यापीठाकडून मिळणारे अर्धवेळ काम, असिस्टंटशिप किंवा शिष्यवृत्ती ह्या सर्व गोष्टी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असतात. 
महत्वाच्या वेबसाइट्स
वरील तिन्ही देशांमधील प्रवेशाची अर्जप्रक्रिया किंवा त्यानंतरच्या इतर सोपस्कारांसाठी खालील वेबसाइट्स नक्की उपयोगी पडतील.



-       

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'