हॉंगकॉंगमध्ये पी.एच.डी.साठी शिष्यवृत्ती


हॉंगकॉंगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून (Research Grant Council) सन २००९ पासून दिल्या जाणाऱ्या ‘हॉंगकॉंग पी.एच.डी. शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हॉंगकॉंगमधील विविध विद्यापीठांमध्ये (संबंधित विद्यापीठात उपलब्ध असलेल्या विषयांत) पी.एच.डी.साठी प्रवेश व शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या व त्याच विषयात हॉंगकॉंगमध्ये पी.एच.डी. करू इच्छिणाऱ्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून २०१४- १५ साठी देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संशोधन अनुदान परिषदेकडून दि. २ डिसेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.


पार्श्वभूमी:-


आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्तेला हॉंगकॉंगमध्ये आकर्षित करून घेण्यासाठी सन २००९ साली ‘हॉंगकॉंग पी.एच.डी. शिष्यवृत्ती योजना’हॉंगकॉंगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून (Research Grant Council) सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत विज्ञान शाखेतील मुलभूत विज्ञान, वैद्यकीय व अभियांत्रिकी- तंत्रज्ञान तसेच कलाशाखेतल्या कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या व त्याच विषयात हॉंगकॉंगमध्ये पी.एच.डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉंगकॉंगमधील परिषदेशी सलंग्न असलेल्या आठपैकी कोणत्याही विद्यापीठात (संबंधित विद्यापीठात संशोधनाचा विषय उपलब्ध असल्यास ) पी.एच.डी.साठी प्रवेश व शिष्यवृत्ती देण्यात येतो. या आठ विद्यापीठांची विस्तृत माहिती परिषदेच्या वेबसाईट वर दिलेली आहे.


शिष्यवृत्तीबद्दल:-


आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना खुली असलेली ही शिष्यवृत्ती हॉंगकॉंगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून दरवर्षी दिली जाते. सन २०१४-१५ साली दिल्या जाणाऱ्या एकूण आंतरराष्ट्रीय प्रवेश व शिष्यवृत्त्यांची संख्या दोनशेपेक्षाही जास्त आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला निवासासहित इतर खर्चासाठी परिषदेकडून २,४०,००० हॉंगकॉंग डॉलर्स म्हणजे साधारणत: तीस हजार यु.एस. डॉलर्स एवढा वार्षिक भत्ता मिळणार आहे. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षाचा आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा पी.एच.डी. कालावधी जर त्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्या उर्वरित कालावधीसाठी आवश्यक असणारा भत्ता सलंग्न विद्यापीठाकडून दिला जाऊ शकतो.


आवश्यक अर्हता :-


संशोधन परिषदेच्या या शिष्यवृत्तीबरोबर अर्जदाराला हॉंगकॉंगमधील एका विद्यापीठात पी.एच.डी.साठी प्रवेशसुद्धा मिळणार आहे. म्हणूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा अर्जदार किमान पदव्युत्तर पदवीधर असावा. त्याबरोबरच अर्जदाराने TOEFL अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर एखाद्या अर्जदाराचे संशोधनाचे माध्यम चीनिभाषेमधून असेल तर अशा अर्जदाराला TOEFL व IELTS या परीक्षांची आवश्यकता शिथिल करण्यात आलेली आहे. अर्जदाराची शैक्षणिक व संशोधन पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. उमेदवाराचे संवादकौशल्य व नेतृत्व क्षमता उत्कृष्ट दर्जाचे असावे. अर्जदार सध्या जर कुठे पी.एच.डी. करत असेल तर त्याला या शिष्यवृत्तीसाठी नव्याने पी.एच.डी.साठी अर्ज करावा लागेल.


अर्ज प्रक्रिया:


अर्जदाराने शिष्यवृत्तीसाठी त्याचा अर्ज प्रथम ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून विद्यापीठाच्या वेबसाईटवर जमा करावा. तेथे अर्ज जमा केल्यावर अर्जदाराला त्याच्या अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळेल. तो संदर्भ क्रमांक वापरून अर्जदार परिषदेशी सलंग्न असलेल्या आठपैकी कोणत्याही एका विद्यापीठाला पी.एच.डी. प्रवेशासाठी अर्ज करू शकतो. शिष्यवृत्तीची अंतिम मुदत व या आठ विद्यापीठांच्या प्रवेशासाठीच्या अंतिम मुदती वेगवेगळ्या आहेत. परिषदेने वेबसाईटवर ही सर्व माहिती दिलेली आहे. अर्जदाराने त्याच्या अर्जाबरोबर त्याच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस. ओ. पी. (Statement of Purpose), त्याचा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी पाठवणे आवश्यक आहे.


अंतिम मुदत:-


या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २ डिसेंबर २०१३ आहे.


महत्वाचा दुवा :-


https://cerg1.ugc.edu.hk/hkpfs/index.html




वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. ७ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?