हार्वर्डमध्ये रॅडक्लिफ पाठ्यवृत्ती कार्यक्रम


जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठातील ‘रॅडक्लिफ इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्सड् स्टडी’ हा विभाग विविध क्षेत्रांतील तज्ञ-विचारवंत, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, कलाकार किंवा लेखक इत्यादी सृजनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्तीद्वारे त्यांच्या या नवनिर्मितीत मोलाचे योगदान देऊ इच्छितो. म्हणूनच हार्वर्ड विद्यापीठाच्या या विभागाकडून उपरोक्त व्यावसायिकांनी त्यांच्या सबंधित विषयांतील प्रगत व अद्ययावत काम करावे यासाठी त्यांना रॅडक्लिफ पाठ्यवृत्ती बहाल केली जाते.  दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ही पाठ्यवृत्ती संबंधित क्षेत्रात भरीव कार्य असणाऱ्या पात्र अर्जदारांना दिली जाणार आहे.  २०१५ साली दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी विविध क्षेत्रातील व विविध विषयातील अर्जदारांकडून दि. १ ऑक्टोबर २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाठ्यवृत्तीबद्दल:
‘रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्ती’ ही फक्त हार्वर्डच नव्हे तर जगभरात नाव कमवलेली पाठ्यवृत्ती आहे. कारण ही पाठ्यवृत्ती ‘हार्वर्ड’कडून दिली जाते व दुसरे म्हणजे सृजनशील क्षेत्रातलं किंवा एखादं नवनिर्मितीचं काम करण्यासाठी ही पाठ्यवृत्ती दिली जाते. विविध विद्याशाखांमधील अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या अभ्यासक-तज्ञ-विचारवंत, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, कलाकार किंवा लेखक आदी व्यावसायिकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगत व अद्ययावत काम करता यावे हा या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाचा हेतू आहे. सर्वच प्रमुख विद्याशाखांमधील कोणत्याही विषयामध्ये काम करण्यासाठी ही पाठ्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी उपरोक्त विविध क्षेत्रांतील साधारणतः ५० पाठ्यवृत्ती दिल्या जातात. पाठ्यवृत्तीधारकाच्या संशोधन प्रकल्पाचा कालावधी मात्र एक वर्षाचा असेल. या पाठ्यवृत्तीअंतर्गत पाठ्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून वार्षिक ७०००० डॉलर्स एवढा भत्ता देण्यात येईल. त्याव्यतिरीक्त त्याच्या प्रकल्पासाठी अतिरिक्त भत्ता , निवासी भत्ता, प्रवास भत्ता यांसारख्या इतर सुविधादेखील  देण्यात येतील.
आवश्यक अर्हता :
ही पाठ्यवृत्ती वर उल्लेखलेल्या कोणत्याही क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या पाठ्यवृत्तीसाठी अर्जदार स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो किंवा अनेक अर्जदारांचा एक गट मिळूनदेखील अर्ज करू शकतो. अर्जदार स्वतंत्रपणे किंवा गटामध्ये  ‘मानववंशशास्त्र, विविध सामाजिक शास्त्रे, सृजनशील कला, मुलभूत विज्ञानातील विविध विषय आणि  गणित ’ इत्यादी विषयांसाठी अर्ज करू शकतो. यांतील बव्हंशी सामाजिक शास्त्रे व मुलभूत विज्ञान क्षेत्रातील पाठ्यवृत्तीसाठी पीएचडीची किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे तर इतर क्षेत्रांसाठी पीएचडी जरी गरजेची नसली तरी तत्सम पातळीची पात्रता अर्जदाराकडे असावी. त्या- त्या विषयानुसार किमान पात्रता वेबसाईटवर दिलेली आहे. 



अर्ज प्रक्रिया:
हार्वर्डच्या या पाठ्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करावा. अर्जदाराकडे अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याने आतापर्यंत केलेल्या त्याच्या संपूर्ण कामाचा  लघु संशोधन अहवाल (Research Proposal),  इत्यादी गोष्टी असाव्यात. 
निवड प्रक्रिया:
अर्जाच्या अंतिम मुदतीनंतर पुढील निवड प्रक्रिया साधारणपणे काही काळ चालेल. प्रत्येक शाखेतील पात्र अर्जदाराचा अर्ज त्या-त्या शाखेतील अनुभवी तज्ञ समितीकडून तपासाला जातो. अर्ज पुनरावलोकनाची दोन टप्प्यात चालणारी ही प्रक्रिया आहे. अर्जदाराचे समीक्षण त्याच्या अर्जाबरोबर त्याची गुणवत्ता व त्याने मांडलेल्या प्रकल्पाच्या दर्जावर केले जाईल.समितीने केलेल्या मूल्यमापनावर मग अंतिम अर्जदारांची या पाठ्यवृत्तीसाठी निवड केली जाईल. अर्जदाराला त्याच्या निवडीबद्दल मार्च २०१५ मध्ये कळवले जाईल.
अंतिम मुदत:- 
या पाठ्यवृत्तीमधील सामाजिक शास्त्रे, मानववंशशास्त्र आणि सृजनशील कलाक्षेत्रातील विषयांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.१ ऑक्टोबर २०१४  आहे, तर मुलभूत विज्ञान व गणित या क्षेत्रांमधील विषयांसाठी ही मुदत दि.१ नोव्हेंबर २०१४ अशी आहे.  
महत्वाचा  दुवा :-






Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?