भारतीय कलाकारांसाठी ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती

   

भारतीय कलाकारांनी गुणात्मक व व्यावसायिक ध्येये गाठावीत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे हितसंबंध तयार व्हावेत या हेतूने दोन्ही देशांच्या पुढाकाराने कलाक्षेत्रासाठी उचललेलं एक पाऊल म्हणजे भारतीय कलाकारांसाठी ब्रिटनमध्ये दिली जाणारी ’सीडब्लूआयटी’ शिष्यवृत्ती. चार्ल्स  वॅलेस इंडिया ट्रस्टकडून (CWIT) दरवर्षी  दृश्यकला, नृत्य, संगीत, नाट्य, चित्रपट आदी विविध क्षेत्रांतील भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलेचे मूल्यमापन करता यावे यासाठी ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१५-१६ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित कला क्षेत्रांमधील अर्जदारांकडून दि. १५  नोव्हेंबर २०१४  पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
 शिष्यवृत्तीबद्दल:
सांस्कृतिक व भाषिक विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशातील बहुविध कलेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ब्रिटनस्थित ‘चार्ल्स  वॅलेस इंडिया ट्रस्ट’कडून (CWIT) दरवर्षी कला क्षेत्रांतील भारतीय कलाकारांना ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती दिली जाते. भारतातील बहुसंख्य कलाकारांना करिअरच्या पहिल्या काही टप्प्यांमध्येच आपल्या इच्छाकांक्षांना सुरुंग लावावा लागतो, हे लक्षात घेऊन १९८१ साली करिअरच्या आरंभी किंवा मध्य स्तरावर असलेल्या कलाकारांसाठी ही शिष्यवृत्ती भारत सरकार व ब्रिटीश प्रशासनाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली. त्यावेळी या दोन्ही सरकारांमध्ये झालेल्या करारानुसार या प्रयत्नांना संस्थात्मक स्वरूप देण्यात आले आणि त्यातून मग चार्ल्स  वॅलेस इंडिया ट्रस्ट निर्माण झाली. संस्थेच्या हेतुनुसार विविध क्षेत्रांतील कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील कलात्मक, गुणात्मक व व्यावसायिक ध्येये गाठता यावीत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे वैयक्तिक हितसंबंध तयार व्हावेत यासाठी संस्था नेहमी कार्यरत राहील. गेल्या जवळपास तीसेक वर्षांमध्ये संस्थेने साधारणतः २७०० शिष्यवृत्त्या बहाल केल्या आहेत. ब्रिटीश कौन्सिलचे प्रतिनिधी हे या संस्थेचे विश्वस्त असल्याने कौन्सिलदेखील निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारकांना व्हिसासाठी पूर्ण सहकार्य करत असते. ‘सीडब्लूआयटी’च्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत विविध कलाक्षेत्रातील शिष्यवृत्तीधारकाच्या संशोधन अभ्यासक्रमाचा कालावधी वेगवेगळा असेल. सर्वसाधारणपणे हे अभ्यासक्रम दोन-तीन महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंतच्या कालावधीचे असू शकतात. शिष्यवृत्तीधारकाची शिष्यवृत्ती त्या कालावधीपुरती मर्यादित असेल. यावर्षी दिल्या जाणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींची संख्या दहा आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला ट्युशन फी, ब्रिटनमधील  निवासी भत्ता व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी अनुदानित रक्कम यांसारख्या सुविधा देण्यात येतील.
आवश्यक अर्हता :
या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा. अर्जदाराचे किमान वय २५ वर्षे तर कमाल ३८ वर्षे असावे. ही शिष्यवृत्ती कला क्षेत्रांतील दृश्य कला, नृत्य, संगीत, नाट्य, चित्रपट (दिग्दर्शन,पटकथा व लेखन), फोटोग्राफी व डिझाईन या विषयांसाठी तर वारसा क्षेत्रांतील स्थापत्यशास्त्र संवर्धन, वस्तुसंग्रहालय व्यवस्थापन-संवर्धन, वारसा संवर्धन इत्यादी अभ्यासक्रमांशी निगडीत आहे. अर्जदाराकडे त्याच्या संबंधित कला अथवा व्यावसायिक क्षेत्रातील विशेष नैपुण्यासह पदवी किंवा पदविका असावी. अर्जदाराकडे तत्सम क्षेत्रातील व्यावसायिक अनुभव असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल.  अर्जदाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे व त्याने आयइएलटीएस या इंग्रजीच्या परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अर्जदाराने गेल्या पाच वर्षांमध्ये चार्ल्स  वॅलेस इंडिया ट्रस्टकडून कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती स्वीकारली असू नये.
अर्जप्रक्रिया:
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज संस्थेकडे फक्त सीडी किंवा डीव्हीडीच्या माध्यमातून पाठवावा. 


निवड प्रक्रिया:-
या शिष्यवृत्तीसाठी प्रचंड स्पर्धा असते. अर्जप्रक्रियेची मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी करून गुणवत्तेनुसार योग्य उमेदवार ठरवले जातात व त्यांना त्यांच्या निवडीबद्दल कळवले जाते.
अंतिम मुदत:- 
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५  नोव्हेंबर २०१४  आहे.
महत्वाचा  दुवा :-








Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?