महिलांना इंग्लंडमध्ये अर्धवेळ एमबीएसाठी शिष्यवृत्ती


इंग्लंडमधील हल विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलकडून ‘लीडरशिप एक्झिक्युटिव्ह एमबीए स्कॉलरशिप’ या नावाने महिलांना अर्धवेळ (पार्ट टाईम) एमबीए करता यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्याच्या हेतूने ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. २०१५ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी हल विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या अर्जदारांकडून दि. १४ सप्टेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल:
महिलांमध्ये निसर्गत:च उद्योजकतेची प्रेरणा असते. नेमकी हीच गोष्ट हेरून महिलांमधील उद्योजकतेला चालना मिळावी व त्यातून एका व्यापक पातळीवर उद्यमशील नेतृत्व तयार व्हावं या हेतूने इंग्लंडमधील हल विद्यापीठात एमबीएसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. महिलांवरील इतर जबाबदारी लक्षात घेता त्यांना अर्धवेळ (पार्ट टाईम) एमबीए करता येणं सहज शक्य आहे . त्यामुळे विद्यापीठाने आपल्या बिझनेस स्कूलमध्ये उमेदवारांना अर्धवेळ एमबीएसाठी  प्रवेश देणं सुरु केलं. प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही अडचणींशिवाय एमबीए पूर्ण करता यावे यासाठी बिझनेस स्कूलकडून ‘लीडरशिप एक्झिक्युटिव्ह एमबीए स्कॉलरशिप’ या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी  एमबीएसारखाच दोन वर्षाचा असेल. या दरम्यान शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरता ट्युशन फी दिली जाईल. तसेच निवासी भत्ता, वैद्यकीय विमा यासारख्या इतर सुविधादेखील असतील.  
आवश्यक अर्हता :
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. ज्या उमेदवारांना हल विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलमध्ये २०१५ सालच्या एमबीएसाठी प्रवेश मिळालेला आहे फक्त तेच उमेदवार या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी अर्जदार पदवीधर असावा व त्याला सप्टेंबर २०१५ साठी एमबीएला प्रवेश मिळालेला असावा. त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याला जर कामाचा अनुभव असेल तर अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे लागेल. अर्जदाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदार आयइएलटीएस या इंग्रजीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करणाऱ्या अर्जदाराने इतर कोणतीही शिष्यवृत्ती स्वीकारलेली नसावी.
अर्ज प्रक्रिया:
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराला विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलमध्ये फक्त एमबीएसाठी प्रवेश मिळालेला असायला हवा. अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या वेबसाईटवर अर्ज क्रमांकासाहित जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याला हल विद्यापीठात २०१५ साठी  प्रवेश मिळाल्याचे प्रवेशपत्र, अर्जदाराकडे असलेले व्यवस्थापन कौशल्य व  त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल फक्त एक हजार शब्दांमध्ये माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची शिफारसपत्रेआतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जासाहित जोडावयाची कागदपत्रे अपूर्ण असतील तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयइएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे.  

निवड प्रक्रिया:
हल विद्यापीठाच्या या शिष्यवृत्तीसाठी निवड शैक्षणिक गुणवत्ता व अंगभूत व्यावसायिक कौशल्य या निकषांवर केली जाईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदारांना पंधरा दिवसात म्हणजे साधारणपणे  दि. २८ सप्टेंबर २०१५ पर्यंत कळवले जाईल.
अंतिम मुदत:- 
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १४ सप्टेंबर २०१५  आहे.
महत्वाचा  दुवा :-












Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?