चीनमध्ये पदव्युत्तर शिष्यवृत्ती कार्यक्रम



आशिया खंडामधील देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत व आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडातून उत्तम नेतृत्व तयार व्हावे या उद्देशाने चीनमधील झेजियांग विद्यापीठ या अग्रगण्य राष्ट्रीय विद्यापीठाने सार्वजनिक प्रशासन या विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (Master in Public Administration: Asia Synergy Program for Future Leaders) आखलेला आहे. आशियातील इतर देशांच्या विद्यार्थ्यांनीही या अभ्यासक्रमात सहभाग दर्शवावा व आपल्या खंडासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांततेसाठी हातभार लावावा म्हणून हा पदव्युत्तर अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये रचला गेला असून त्यासाठी दोन वर्षे शिष्यवृत्तीधारकाला प्रवेशासहित संपूर्ण शिष्यवृत्ती व इतर सवलती दिल्या जाणार आहेत. २०१५ मधील या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झेजियांग विद्यापीठाकडून आशियातील चीनव्यतिरिक्त इतर देशांमधील विद्यार्थ्यांकडून दि. १ जूनपूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:


         १८९७ मध्ये स्थापन झालेले झेजियांग विद्यापीठ हे चीनमधील एक प्रमुख राष्ट्रीय विद्यापीठ आहे. चीनमधील झेजियांग प्रांतातील हँग्झो या शहरात असलेले हे विद्यापीठ जगातील पहिल्या दीडशे विद्यापीठांपैकी तर आशियातील पहिल्या तीस विद्यापीठांपैकी एक आहे. झेजियांग विद्यापीठात पाच प्रमुख विद्याशाखा आहेत. अभियांत्रिकी, कला व विज्ञान, कृषी, गणित आणि वैद्यकीय. यातील वैद्यकीय शाखेचा विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे. विद्यापीठाच्या कला शाखेतील सार्वजनिक प्रशासन विभागाकडून घेतल्या गेलेल्या पुढाकारातून सार्वजनिक प्रशासन या विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी सुरु केला. त्यातील शिष्यवृत्तीसाठी झेजियांग विद्यापीठाला BAI XIAN Education Foundation या संस्थेने सढळ हाताने मदत केली आहे.
          आशियातील चीनसह इतर समकालीन देशांच्या सामाजिक- आर्थिक विकासाचा अभ्यास व्हावा, शासकीय व्यवस्थांचे ज्ञान असलेल्या युवा विद्यार्थ्यांमधून सार्वजनिक क्षेत्रात दर्जेदार गुणवत्ता यावी व त्यातून भावी नेतृत्व उदयास यावे या विचारांशी बांधिलकी असलेल्या संस्थांकडून हा शिष्यवृत्ती कार्यक्रम दरवर्षी राबवला जात आहे. भावी आशियाई नेतृत्वामध्ये सांस्कृतिक सहसंबंध वाढावेत आणि विश्वास व समजूतदारपणा यांच्या माध्यमातून आशियातील देशांची जागतिक विकासाच्या दृष्टीने वाटचाल करावी या हेतूने सुरु केलेल्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आशियाई देशांमधील (चीनव्यतिरिक्त) एकूण पंधरा विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरता ट्युशन फी, नोंदणी शुल्क, इंटर्नशिप फी यांसहित इतर सर्व शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. याबरोबरच विद्यापीठाच्या परिसरामध्ये एका चीनी विद्यार्थ्याबरोबर निवासाची सोय विभागून दिली जाते. शिष्यवृत्तीधारकाला सहा हजार चीनी युआन मासिक वेतन व आंतरराष्ट्रीय आरोग्य विम्याची सुविधाही दिली जाईल.


आवश्यक अर्हता :


ही शिष्यवृत्ती आशियाई देशांतील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. विद्यापीठाच्या अपेक्षेनुसार या शिष्यवृत्तीला अर्ज करणारा अर्जदार हा जबाबदार, अतिशय हुशार, प्रामाणिक, नेतृत्वगुण व एकात्मता जोपासणारा आणि व्यापक दृष्टीकोन असणारा असावा. अर्जदार पदवीधर असावा किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत असावा. अर्जदाराची पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. शिष्यवृत्ती कार्यक्रम इंग्रजीत असल्याने अर्जदाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराचे आरोग्य उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. त्याने इतर कोणतीही शिष्यवृत्ती स्वीकारलेली नसावी.


अर्ज प्रक्रिया:


या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर जमा करावा. अर्जाबरोबर अर्जदाराने इंग्रजी किंवा चीनी भाषेमध्ये त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., सी.व्ही., त्याने पदवी अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, तसेच त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्यासर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती व आरोग्य तपासणी अर्ज इत्यादी गोष्टी जोडाव्यात. या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जदाराने विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर कुरियर कराव्यात. कागदपत्रांशिवाय केलेले किंवा अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.


निवड प्रक्रिया:


अर्जदाराची एकूण गुणवत्ता व स्पर्धात्मकता लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल. निवड झालेल्या अर्जदारांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रकाशित केली जाईल. निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारकांचा शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या ध्येयधोरणांना पाठींबा असणे आवश्यक आहे. तसेच शिष्यवृत्तीधारकाला या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यावर त्याला इतर कुठेही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी स्वीकारता येणार नाही.


अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ जून २०१५ आहे.


महत्वाचा दुवा :-


http://iczu.zju.edu.cn/




वरील लेख (चीनमधील पदव्युत्तर शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रकाशित झाला.












Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?