दक्षिण कोरियात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संशोधन शिष्यवृत्ती


दक्षिण कोरियातील चोसून विद्यापीठाच्या ‘वायरलेस अँड कम्युनिकेशन सिस्टम लॅब’ या प्रयोगशाळेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ‘वायरलेस अँड मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम्स’ या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या या प्रयोगशाळेकडून पात्र विद्यार्थ्यांना पीएचडी आणि एकात्मिक पदव्युत्तर-पीएचडी (Integrated Masters and Ph.D. Program) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व संबंधित कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी प्रयोगशाळेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून दि. ३० मे २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.


शिष्यवृत्तीबद्दल:

चोसून विद्यापीठ हे दक्षिण कोरियातील एक प्रमुख खाजगी विद्यापीठ आहे. विद्यापीठाचा परिसर कोरियाच्या नैऋत्येस असलेल्या ग्वांग्जू या महानगरामध्ये आहे. हे विद्यापीठ आशियामध्ये २५१ व्या क्रमांकाचे तर दक्षिण कोरियातील पहिल्या तीस विद्यापीठांपैकी एक आहे. चोसून विद्यापीठाचे ‘वायरलेस अँड मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम्स’ या प्रगत तंत्रज्ञानातील संशोधन जागतिक पातळीवर नावाजलेले आहे. म्हणूनच या क्षेत्रातील संशोधनाला वाहून घेतलेल्या जागतिक संस्थांपैकी एक म्हणजे विद्यापीठातील ‘वायरलेस अँड कम्युनिकेशन सिस्टम लॅब’-WMCS Lab ही प्रयोगशाळा होय. या प्रयोगशाळेत सैद्धांतिक संशोधनाबरोबरच उपयोजित संशोधनावरदेखील भर दिला जातो. विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेकडून यावर्षी आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जात आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएचडी आणि एकात्मिक पदव्युत्तर-पीएचडी (Integrated Masters and Ph.D. Program) या दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरता संशोधनाच्या सर्व सोयी, विद्यापीठाच्या आवारात निवासाची सोय व शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या इतर सर्व सोयीसुविधा दिल्या जातील.


आवश्यक अर्हता :


या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान या अभियांत्रिकी शाखांमधील पदवीधर असावा. अर्जदाराला पदवीच्या स्तरावर किमान ८५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी टोफेल किंवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत अतिशय उत्तम गुण संपादन करणे गरजेचे आहे, म्हणजे विद्यापीठाने तसे निकष जाहीर केले आहेत. अर्जदाराला टोफेलच्या (आयबीटी) परीक्षेत किमान ८० गुण तर आयइएलटीएसमध्ये किमान ६.५ बँड्स मिळवणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे पदवी स्तरावर संशोधनाचा अनुभव असणे गरजेचे आहे.


अर्ज प्रक्रिया:


चोसून विद्यापीठातील या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने प्रयोगशाळेशी (WMCS Lab) संपर्क साधावा. खाली दुव्यामध्ये दिलेल्या प्रयोगशाळेच्या वेबसाईटवर किंवा प्रयोगशाळेतील जेष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जे- यंग प्यून (jypyun@chosun.ac.kr) यांच्याकडे अर्जप्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळेल. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., सी.व्ही., त्याने पदवी अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, त्याचे टोफेलचे (किंवा आयइएलटीएसचे) गुणांकन, तसेच त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदार त्याचा अर्ज प्रा. जे- यंग प्यून यांच्याकडे किंवा स्वतंत्रपणे प्रयोगशाळेच्या इमेलवर जमा करू शकतो.


निवड प्रक्रिया:


अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल. निवडीनंतर अर्जदाराला वैयक्तिकपणे कळवले जाईल.


अंतिम मुदत:-
चोसून विद्यापीठाच्या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० मे २०१५ आहे.


महत्वाचा दुवा :-


http://ubicom.chosun.ac.kr/






वरील लेख (दक्षिण कोरियातील संशोधन शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. ९ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?