ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती


ऑस्ट्रेलियन सरकारकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘एन्डेव्हर पदव्युत्तर शिष्यवृत्ती’ दिली जाते.
कोणत्याही विषयातील पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व त्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील पात्र अर्जदारांकडून दि. ३० जून २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.


शिष्यवृत्तीबद्दल:


एन्डेव्हर शिष्यवृत्ती ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धात्मक शिष्यवृत्ती आहे. आंतरराष्ट्रीय अर्जदारांना खुली असलेली ही शिष्यवृत्ती संपूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असून, एखाद्या विषयाचा अभ्यास हाती घेऊन त्यामध्ये संशोधन करून स्वत:चा, स्वत:च्या देशाचा व ऑस्ट्रेलियाचा व्यावसायिक विकास साधता येईल अशा अर्जदाराला या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन सरकार सहकार्य करू इच्छित आहे. ‘एन्डेव्हर’सारख्या जागतिक दर्जाच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन सरकार ऑस्ट्रेलियाचा शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चेहरा तयार करू पाहत आहे. म्हणूनच ऑस्ट्रेलिया सरकार त्यांच्या देशातील उच्चशिक्षण आणि संशोधन क्षेत्रामधील या संधीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बुद्धिमत्ता स्वत:कडे आकर्षित करू इच्छित आहे.
                  या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयातील पदव्युत्तर (मास्टर्स) व पीएचडीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षाचा असल्याने त्यासाठी दोन वर्षांपर्यंत तर पीएचडी कार्यक्रमासाठी चार वर्षांपर्यंत शिष्यवृत्ती बहाल केली जाते. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी हा अभ्यासक्रमाच्या कालावधीएवढा असेल. शिष्यवृत्तीधारकाच्या पहिल्या वर्षातील संशोधन गुणवत्तेवर दुसऱ्या वर्षाची शिष्यवृत्ती अवलंबून असेल व हाच निकष तिसऱ्या व चौथ्या वर्षासाठी लागू असेल.
          शिष्यवृत्तीअंतर्गत या कालावधीदरम्यान ऑस्ट्रेलियन सरकारकडून शिष्यवृत्तीधारकाला प्रत्येक सेमिस्टरसाठी सुमारे १५००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढी ट्युशन फी दिली जाते. म्हणजेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक एकूण ट्युशन फी १४०५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स तर पीएचडीसाठी एकूण २७२५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढी ट्युशन फी शिष्यवृत्तीच्या कालावधीमध्ये शिष्यवृत्तीधारकाला पुरवली जाते. याबरोबरच शिष्यवृत्तीधारकाला दरमहा मासिक भत्ता ३००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स तसेच वार्षिक प्रवास भत्तादेखील साधारणपणे ३००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढा देण्यात येईल. यासहीत शिष्यवृत्तीधारकाला संपूर्ण शिष्यवृत्ती कालावधीकरता आरोग्य विमा कवच बहाल केले जाईल.


आवश्यक अर्हता :


या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पदव्युत्तर (मास्टर्स) व पीएचडीच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील किंवा कोणत्याही विषयातील अर्जदार अर्ज करू शकतो. अर्जदाराचे वय त्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होताना अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदाराचा पदव्युत्तर किंवा पीएचडी अभ्यासक्रम दि. १ जानेवारी २०१६ नंतर व दि. ३० नोव्हेंबर २०१६ च्या आत सुरु होणारा असावा. अर्जदाराने निवडलेल्या अभ्यासक्रमात त्याला कार्य- अनुभव (Work Experience) किंवा संशोधन अनुभव असावा. अर्जदार ऑस्ट्रेलियन सरकारच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा शिष्यवृत्तीधारक नसावा. तसेच ज्या अर्जदारांना यापूर्वी ‘एन्डेव्हर पदव्युत्तर शिष्यवृत्ती’ मिळालेली ते या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास पात्र नसतील.


अर्ज प्रक्रिया:


या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ‘‘एन्डेव्हर ऑनलाईन अर्ज प्रणाली’ वापरून पूर्ण अर्ज संबंधित वेबसाईटवर जमा करावा. ही अर्ज प्रणाली अर्ज पूर्ण असेल तरच स्वीकारते अन्यथा अर्जदाराला त्याचा अर्ज जमा करता येत नाही. अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., सी.व्ही., त्याने पदवी किंवा पदव्युत्तर अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, तसेच त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती, त्याचे जीआरई किंवा आयइएलटीएसचे गुणांकन, संशोधन अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्यात.


निवड प्रक्रिया:


अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी विचारात घेतली जाईल. तसेच अर्जदाराची निवड खाली दिलेल्या निकषांनुसार केली जाईल.


Ø अर्जदाराने निवडलेल्या क्षेत्रात त्याला कार्य-अनुभव (Work Experience) असावा. अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी व कार्य-अनुभव या दोन्ही गोष्टींना निवड प्रक्रियेत एकूण ४० % गुण आहेत.


Ø अर्जदाराने अर्ज केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल त्याने केलेला अभ्यास व संशोधन याला निवड प्रक्रियेत एकूण २०% गुण आहेत.


Ø अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणाऱ्या त्याच्या एस.ओ.पी.ला एकूण २० % गुण आहेत.


Ø अर्जदाराच्या एस.ओ.पी. ज्यामध्ये त्याची समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेतली जाईल. याला एकूण १० % गुण आहेत.


Ø अर्जदाराच्या शैक्षणिक पार्श्वभूमी व त्याचे पुढील उच्चशिक्षण, त्याच्या क्षमता हे सर्व ऑस्ट्रेलिया व त्याच्या देशाला कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते याबद्दल विस्तृतपणे माहिती देणाऱ्या त्याच्या एस.ओ.पी.ला एकूण १० % गुण आहेत.


सरकारच्या संबंधित विभागाकडून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवड प्रक्रियेबाबत डिसेंबर २०१५ पर्यंत संपर्क साधला जाईल.


अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० जून २०१५ आहे.


महत्वाचा दुवा :-

https://internationaleducation.gov.au





वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि.११ मे २०१५ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?