जर्मनीमध्ये कायद्यातील संशोधनासाठी शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीबद्दल:
विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञांच्या योगदानाने बनलेली आणि विज्ञान– तंत्रज्ञानातील संशोधनाच्या अत्त्युच्च दर्जाचे मानांकन म्हणून गणली जाणारी मॅक्स प्लांक संशोधन संस्था ही जर्मनीस्थित मॅक्स प्लांक सोसायटीच्या अनेक संस्थांपैकी एक आहे. विविध विषयांत संशोधन करणाऱ्या एकूण ऐंशीपेक्षाही जास्त संस्था मॅक्स प्लांक सोसायटीच्या आहेत. या संस्था जर्मनी आणि युरोपमधील बऱ्याचशा देशांमध्ये कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक म्हणजे ‘मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ’ ही कायद्याशी संबंधित विषयांत संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९२६ साली बर्लिन येथे झाली. मात्र १९५६ साली ही संस्था जर्मनीतील हँबर्ग येथे स्थलांतरित करण्यात आली. युरोप तसेच जगातील इतर भागातील कायदेशीर पद्धतीतील साम्य व फरक अभ्यासून खाजगी नियम-निर्माण, राष्ट्रीय कायदेशीर प्रणाली, आंतरराष्ट्रीय कायदे व आंतरराज्य करार इ. बाबतीत विश्लेषण करणे, इत्यादी गोष्टींतील संशोधनावर संस्थेमध्ये भर दिला जातो.
मॅक्स प्लांक सोसायटीची ही शिष्यवृत्ती संस्थेने तीन गटांमध्ये विभाजित केलेली आहे. डॉक्टरेट शिष्यवृत्तीधारकांसाठी, पोस्ट–डॉक्टरेट शिष्यवृत्तीधारकांसाठी व महाविद्यालय -विद्यापीठांमधील प्राध्यापक किंवा जेष्ठ संशोधकांसाठी. संशोधन शिष्यवृत्तीची एकूण संख्या मर्यादित असून शिष्यवृत्तीचा कमाल कालावधी ४ महिने एवढा आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत चार महिन्यांच्या कालावधीदरम्यान संस्थेकडून शिष्यवृत्तीधारकाला दरमहा मासिक भत्ता देण्यात येईल. डॉक्टरेट शिष्यवृत्तीधारकाला प्रतिमहिना १३६५ युरोज, पोस्ट–डॉक्टरेट शिष्यवृत्तीधारकांना प्रतिमहिना १६५० युरोज तर जेष्ठ संशोधकवर्गासाठी प्रतिमहिना २२०० युरोज असे ह्या भत्त्याचे स्वरूप असेल. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीधारकाला कोणताही प्रवास खर्च किंवा संबंधित भत्ता तसेच आरोग्य विमा व इतर कोणत्याही प्रकारच्या सवलती दिल्या जाणार नाहीत.
आवश्यक अर्हता :
या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी संस्थेने त्यांच्या वेबसाईटवर कोणतीही किमान अर्हता दर्शवलेली नाही. मात्र संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या कायद्याच्या विविध विषयांमध्ये संशोधन करण्याची इच्छा असलेले पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. तरीही, कार्यक्रमातील संशोधनाची पातळी पाहता अर्जदार डॉक्टरेट असावा. अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. संशोधन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य केलेले असावे. शोधनिबंधाच्या प्रकाशनांचा आघात घटक (Impact factor) अतिशय उत्तम असावा. संशोधनाचा प्रकल्प जर्मन भाषेतून असेल तर जर्मन भाषेतील नैपुण्य दर्शवणारी प्राविण्य पातळी अर्जदाराने गाठलेली असावी. अन्यथा संस्थेमधील वातावरणाशी एकरूप होण्यासाठी आवश्यक प्रभुत्व जर्मन किंवा फ्रेंचवर असावे.
अर्ज प्रक्रिया:
मॅक्स प्लांक सोसायटीच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने मॅक्स प्लांक संस्थेची ऑनलाईन अर्ज प्रणालीवापरणे आवश्यक आहे. अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या संपूर्ण शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याच्या व्यावसायिक शिक्षणाची माहिती देणारा सी.व्ही., हाती घेतलेले विविध शैक्षणिक कार्यक्रम, नोकरीतील सध्याच्या पदाबद्दल तपशीलवार माहिती, मॅक्स प्लांकमध्ये तो हाती घेणार असलेल्या प्रकल्पाचा विस्तृत संशोधन प्रबंध व दोन तज्ञांची बंद शिफारसपत्रे इत्यादी सर्व कागदपत्रे ऑनलाईन जमा करावीत.
निवड प्रक्रिया:
अर्जदाराची या शिष्यवृत्तीसाठी निवड करताना त्याची शैक्षणिक व संशोधन पार्श्वभूमी लक्षात घेतली जाईल. संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवड प्रक्रियेबाबत अंतिम मुदतीनंतर साधारणतः आठ ते दहा आठवड्यांपर्यंत संपर्क साधला जाईल.
अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ ऑगस्ट २०१५ आहे.
महत्वाचा दुवा :-
http://www.mpipriv.de/en/pub/news.cfm
वरील लेख (कायदाविषयक संशोधनासाठी जर्मनीतील शिष्यवृत्ती ) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. १ जून २०१५ रोजी प्रकाशित झाला.
Comments
Post a Comment