जर्मनीमध्ये पीएचडीसाठी शिष्यवृत्ती


बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील एक महत्वाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. बॉन विद्यापीठ हे मुलभूत विज्ञान, कलाशाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, व्यवस्थापन आदी विषयांतील संशोधन व अध्यापन या दोहोंतही अव्वल आहे. या विद्यापीठाच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे म्हणून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७ मधील पीएचडीच्या शिष्यवृत्तीसहित प्रवेशासाठी अर्थशास्त्र,पर्यावरणशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे या विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत. 

शिष्यवृत्तीबद्दल:

जवळपास दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे सन १८१८ साली स्थापना झालेले बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील प्राचीन व प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक महत्वाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांपैकी अनेकजण नोबेल पारितोषिक विजेते आहेत, तर इतर नावांमध्ये पोप बेनेडिक्ट, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक नित्शे इत्यादी प्रमुख नावे. आजदेखील बॉन हे जर्मनीतील एक प्रमुख विद्यापीठ आहे. टाइम्स हायर एज्युकेशन रॅंकिंग्जच्या यादीमध्ये यावर्षी या विद्यापीठाला जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ म्हणून निवडण्यात आलेले आहे. पदवी, व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विषयांमध्ये  प्रचंड प्रमाणात आढळणारे वैविध्य व पन्नास लाखांपेक्षाही जास्त संख्येमध्ये उपलब्ध असणारी पुस्तके यामुळे जगातला तरुण वर्ग या विद्यापीठाकडे निश्चितच आकर्षित होतो. विद्यापीठाचा सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च हा विभाग अलीकडे म्हणजे १९९७ साली सुरु करण्यात आलेला आहे. या विभागाच्या वतीने अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, कृषी, भूविज्ञान, जीवशास्त्र, गणित व मुलभूत विज्ञाने इत्यादी विषयांमध्ये संशोधन करण्यात येते. विद्यापीठाच्या या विभागाच्या वतीने वर उल्लेख केलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे म्हणून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीधारकाच्या पीएचडीच्या संशोधनाचा कालावधी तीन वर्षांचा असेल. विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून या तीन वर्षांसाठी मासिक भत्ता मिळवता येऊ शकेल. तसेच पीएचडीच्या या कालावधीकरता संपूर्ण  ट्युशन फी माफ केलेली असेल. याव्यतिरिक्त त्याला विमा भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. शिष्यवृत्तीधारकाला ही शिष्यवृत्ती पीएचडीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असेल. त्याला पीएचडी पूर्ण करणे बंधनकारक राहील.

आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराकडे तो अर्थशास्त्र,पर्यावरणशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे यांपैकी ज्या विषयात पीएचडी करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. म्हणजे अमेरिकन मुल्यांकन पद्धतीनुसार त्याचा जीपीए ३.० एवढा किंवा जर्मन मुल्यांकनानुसार जीपीए २.० एवढा असावा. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन अनुभव असावा. एवढेच नव्हे, तर त्याच्याकडे त्याच्या विषयाच्या संशोधनातील नाविन्यपूर्ण अशा कल्पना असाव्यात. संस्थेने ह्या शिष्यवृत्तीच्या प्रवेशासाठी हा एक प्रमुख निकष ठेवलेला आहे. अर्जदाराने संशोधनातील अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. संपूर्ण डॉक्टरल अभ्यासक्रम हा इंग्रजीमध्ये असून अर्जदाराकडे इंग्रजीचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचे इंग्रजीवरील प्रभुत्व अर्थातच त्याच्या टोफेल किंवा आयइएलटीएसच्या गुणांवरून ठरवले जाईल. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी जीआरई व टोफेल ह्या परीक्षा दिलेल्या असाव्यात. संस्थेच्या ह्या पीएचडी कार्यक्रमास अर्ज करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही, मात्र अर्जदाराला त्याची शेवटची पदवी मिळून सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.

अर्ज प्रक्रिया:
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारास दोन टप्प्यांमध्ये अर्जप्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. पहिल्या टप्प्यात ऑनलाईन नोंदणी करून स्वत:ची संपूर्ण माहिती सादर करायची आहे. पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर अर्जदाराला एक नोंदणी क्रमांक मिळेल. दुसऱ्या  टप्प्यामध्ये हा नोंदणी क्रमांक वापरून अर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. अर्जदाराने दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्ज विहित नमुन्यात ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर अंतिम मुदतीपूर्वी जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याचे जीआरईचे गुण, तसेच टोफेल किंवा आयइएलटीएस या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस्, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही.लघु संशोधन अहवाल, प्रकाशित केली असल्यास शोधनिबंधांच्या प्रती,तज्ञांची शिफारसपत्रे,ट्रान्सक्रिप्ट्स् व कार्य अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच, अर्जदाराने पूर्ण झालेल्या अर्जाची प्रिंट घेऊन त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वतंत्रपणे विद्यापीठाकडे पोस्टाने किंवा आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेने जमा करावीत.   

निवड प्रक्रिया:

अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व त्याची संशोधनाची आवड लक्षात घेऊन निवड समितीकडून त्याची अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ईमेलने कळवले जाईल.

अंतिम मुदत:- 

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्ट २०१६  आहे.

महत्वाचा  दुवा :-

वरील लेख ( जर्मनीमध्ये पीएचडीसाठी शिष्यवृत्तीलोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत २५ एप्रिल २०१६ रोजी प्रकाशित झाला.
                                                     




Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?