न्युझीलंडमध्ये पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती


 न्यूझीलंड शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच एज्यूकेशन न्यूझीलंडकडून कोणत्याही विषयांतील  आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी संशोधन करता यावे यासाठी New Zealand International Doctoral Research Scholarships –NZIDRS हा पीएचडी कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय दि.१५ जुलै, २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत

शिष्यवृत्तीबद्दल:

विविध क्षेत्रांमधील जागतिक गुणवत्तेस आकर्षित करून त्या माध्यमातून न्युझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा व त्यांच्या प्रभावाचा अभ्यास करायचा आणि त्यातून न्युझीलंडची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योगांच्या विकासाला चालना द्यायची या हेतूने न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम न्यूझीलंड शासनाच्या एज्यूकेशन न्यूझीलंडकडून सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला त्याची ट्युशन फी भरता येईल. तसेच, त्याला मिळणारा एकूण वार्षिक भत्ता पंचवीस हजार न्युझीलंड डॉलर्स किंवा प्रतिमाह दोन हजार डॉलर्स एवढा असेल. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीमध्ये त्याच्या तीन वर्षाच्या वैद्यकीय विमासुरक्षेचाही समावेश असेल. या शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्तीधारक न्यूझीलंडमधील लिंकन विद्यापीठ, मॅसे, ऑकलंड, एयूटी, कॅंटरबरी, ओटागो, वैकाटो आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ या आठ विद्यापीठांपैकी कोणत्याही एका विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकतो.

आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व फिजी या तीन देशांमधील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्याचा जीपीए ३.६ /४ किंवा A / A+ असावा. न्युझीलंडमध्ये पूर्णवेळ पीएचडी करण्याची त्याची तयारी असावी. तसेच, न्युझीलंडमध्ये थेट पीएचडी प्रवेशासाठी आवश्यक असणारे निकष पूर्ण करावेत. म्हणजेच त्याच्याकडे पदव्युत्तर पदवी असावी आणि त्याने टोफेल अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्याची पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे.

अर्ज प्रक्रिया:

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज NZIDRS च्या वेबसाइटवरुन डाउनलोड करून घ्यावा. अर्जामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून अर्ज पूर्ण भरलेल्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय पोस्टाने किंवा कुरियर सेवेने संबंधित विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयाला (Office of admission) पाठवावा. त्या अर्जाबरोबर अर्जदाराला इतर आवश्यक कागदपत्रे म्हणजे त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी. (Statement of Purpose), आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती, त्याचा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक किंवा संशोधन पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा प्रकल्प मार्गदर्शकांचे (Project Guide) इ-मेल आयडीज पाठवावे लागतील. संबंधित विद्यापीठ नंतर त्या प्राध्यापकांकडून शिफारसपत्रे मागवून घेईल.

निवड प्रक्रिया:

NZIDRS शिष्यवृत्तीच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया गुणवत्तेवर व त्याच्या संशोधन प्रकल्प अहवालावर (Proposed research plan) आधारित आहे. या अहवालामध्ये न्युझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा प्रभाव असावा. तसेच त्याचा दर्जा निश्चितच आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांच्या पातळीचा असावा. अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल दि. १ जुलै २०१५  पूर्वी कळवले जाईल.


अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ जुलै, २०१५  आहे.


महत्वाचा दुवा :-



वरील लेख (न्यूझीलंडमध्ये पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीलोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत ६ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाला.


Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?