रशियामध्ये पदार्थविज्ञानातील पोस्टडॉक्टरल शिष्यवृत्ती



युरल फेडरल विद्यापीठ हे रशियातील एक महत्वाचे विद्यापीठ असून, युरल प्रांतातील प्रमुख संशोधन केंद्र आहे. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय पीएचडीधारक अर्जदारांना पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम व संशोधन पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ साठी ही शिष्यवृत्ती पदार्थविज्ञान या विषयासाठी दिली जाणार आहे. युरल विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी’ विभागाच्या क्वांटम मॅग्नेटोमेट्री प्रयोगशाळेकडून या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पीएचडीधारक अर्जदारांकडून दि. १ जून २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

शिष्यवृत्तीबद्दल:

रशियातील प्रमुख दहा विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ व संशोधनासाठी उत्तम मानांकन प्राप्त अशी ओळख असलेले युरल फेडरल विद्यापीठ हे युरल प्रांतातील एक प्रमुख संशोधन केंद्र आहे. युरल फेडरल विद्यापीठाची स्थापना १९२० साली झाली. हे विद्यापीठ हे युरल प्रांतातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. विद्यापीठात विविध विभांगाकडून पदवी, पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रम राबवण्यात येतात. रशियन अकादमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जवळपास शंभरपेक्षाही अधिक विविध विषयांमधील शिक्षण व संशोधन उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यापीठाने इतर संशोधन संस्था, औद्योगिक केंद्रे व व्यावसायिक संस्था यांच्याशी विस्तृत जाळे पद्धतशीर तयार केलेले आहे. विद्यापीठाला युरल प्रांतात या माध्यमातून रोजगाराच्या बहुतांश संधी उपलब्ध करून देता आलेल्या आहेत. संबंधित शिष्यवृत्ती ही विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी’ (आयपीटी) या विभागाच्या वतीने शिष्यवृत्तीधारकाला बहाल करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमाचे संशोधन हे सैद्धांतिक व प्रायोगिक संशोधनामध्ये असेल व त्याचा पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम आयपीटी विभागाच्या क्वांटम मॅग्नेटोमेट्री प्रयोगशाळेमध्ये किंवा इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेसच्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक प्रयोगशाळेत पूर्ण करता येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता या विभागाकडे आकृष्ट करता यावी यासाठी विद्यापीठाने ही शिष्यवृत्ती सुरु केलेली आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पोस्टडॉक्टरल संशोधनाचा कालावधी दोन वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून या कालावधीसाठी एक मिलियन रशियन रुबल्स प्रतिवर्ष असा भत्ता दिला जाईल. याव्यतिरिक्त त्याला निवासासाठी १ बीएचके घर , विमा भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही. तसेच त्याला त्याचा पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक राहील.

आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदाराने पीएचडी मिळवलेली असावी व त्याचे वय ३५ पेक्षा कमी असावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. पदार्थविज्ञानातील सैद्धांतिक व प्रायोगिक संशोधनाशी संबंधित Methods of NMR spectroscopy या विषयाच्या संशोधनात गती असावी किंवा तत्सम अनुभव असल्यास त्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत.  आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी इंग्रजीच्या आयइएलटीएस किंवा टोफेल ह्यापैकी एक परीक्षा दिलेली असावी व त्यात उत्तम गुणांकन प्राप्त केलेले असावे. तसेच, अर्जदारानचे बोली व लेखी इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया:
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज विहित नमुन्यात तयार करून विभागप्रमुखांना अंतिम मुदतीपूर्वी इमेल करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याचे जीआरईचे गुण, तसेच टोफेल किंवा आयइएलटीएस या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस्, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही.लघु संशोधन अहवाल, प्रकाशित केली असल्यास शोधनिबंधांच्या प्रती, तज्ञांची शिफारसपत्रे, ट्रान्सक्रिप्ट्स् व कार्य अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात.     

निवड प्रक्रिया:

अर्जदाराची विषयातील संशोधन गुणवत्ता लक्षात घेऊन व निवड समितीकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ईमेलने कळवले जाईल.

अंतिम मुदत:- 

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ जून २०१६  आहे.

महत्वाचा  दुवा :-


वरील लेख (रशियामध्ये पदार्थविज्ञानातील पोस्टडॉक्टरल शिष्यवृत्तीलोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत १६ मे २०१६ रोजी प्रकाशित झाला.



Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?