इटलीमध्ये आंतरविद्याशाखीय पीएचडी


इटलीमधील आयएमटी स्कूल फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीजया संशोधन संस्थेने विविध विषयांची सांगड घालत आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमातील पीएचडी कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. पीएचडीसाठी प्रवेश, निशुल्क शिक्षण व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१३ जुलै २०१६  पूर्वी अर्ज मागवले आहेत. 

शिष्यवृत्तीबद्दल:

२०१६ च्या युरोपमधील विद्यापीठांच्या रँकिंग्जनुसार मध्य इटलीमधील लुक्का या शहरात असलेली आयएमटी स्कूल फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीजही संस्था संशोधनासाठी इटलीमध्ये प्रथम क्रमांकाची तर संपूर्ण युरोपात तृतीय क्रमांकाची म्हणून गणली गेलेली आहे. संस्थेच्या आद्याक्षरांतील आयएमटी म्हणजेच इन्स्टिट्यूशन्स, मार्केट्स, टेक्नोलॉजी. एकूणच संस्था शैक्षणिक-वैज्ञानिक, बाजारपेठ व तंत्रज्ञान या साऱ्यांचे एकत्रीकरण करू इच्छीत आहे व त्यातूनच विविध विषयांतील राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता आकर्षित करत आहे. म्हणूनच संस्थेने स्वत:च एक शैक्षणिक केंद्र बनत आंतरविद्याशाखीय पीएचडी कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे.  हा आंतरविद्याशाखीय पीएचडी कार्यक्रम अर्थशास्त्र, पदार्थविज्ञान, संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, मानसशास्त्र, गणित व सांस्कृतिक वारसा इत्यादी विषयांची सांगड घालू पाहत आहे म्हणूनच संस्थेला आज मुलभूत व नाविन्यपूर्ण अशा संशोधनासाठी असलेले युरोपातील एक सर्वोत्कृष्ट केंद्र अशी आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झालेली आहे.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत ३४ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएचडीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पीएचडी कार्यक्रमासह शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीधारकाला त्याचा पीएचडी अभ्यासक्रमासाठीचा सल्लागार तज्ञ निवडण्याची मुभा देण्यात येईल. शिष्यवृत्तीअंतर्गत या तीन वर्षांदरम्यान शिष्यवृत्तीधारकाला संशोधनातील निशुल्क प्रशिक्षण दिले जाईल. दरम्यान, संस्थेकडून तीन वर्षांच्या या कालावधीकरता विद्यार्थ्याला जवळपास १४००० युरो एवढी वार्षिक रक्कम  शिष्यवृत्ती म्हणून बहाल करण्यात येईल.  सर्व शिष्यवृत्तीधारकांना शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येईल.  तसेच शिष्यवृत्तीधारकाला निशुल्क निवासाची व उपहारगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा व अपघातापासून सुरक्षिततेसाठी विमा यासारख्या इतर सर्व सोयी सुविधाही दिल्या जातील.

आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांना कोणत्याही वयोमर्यादेशिवाय खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार संबंधित विषय शाखांमधील पदव्युत्तर पदवीधर असावा किंवा त्याच्याकडे किमान चार वर्षांच्या अभ्यासक्रमाची पदवी असावी. मात्र आंतरराष्ट्रीय अर्जदाराच्या पदवीची अर्हता संस्थेच्या पीएचडी समितीकडून तपासली जाईल. अर्जदाराची पदवी (पदव्युत्तर पदवी)च्या स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. संस्थेचा पीएचडी अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने त्याचे बोली व लेखी इंग्रजीवर प्रभुत्व असावे. अर्जदारांनी आयइएलटीएस या इंग्रजी भाषेच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्याच्याकडे इटालियन भाषेचे ज्ञान असणे आवश्यक नाही. अर्जदाराकडे पदवी स्तरावर प्रयोगशाळेतील किंवा एखाद्या संस्थेतील संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र असावे.  

अर्ज प्रक्रिया:

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संस्थेच्या वेबसाईटवर जमा करावा. अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या वैयक्तिक व शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही.,त्याने पदवी/पदव्युत्तर अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधाच्या स्वरुपात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, तसेच त्याच्या शैक्षणिक  पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक  ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती, त्याचे आयइएलटीएसचे गुणांकन, आरोग्य तपासणी अर्ज, संशोधन अनुभवाचे प्रशस्तीपत्र, पारपत्राची व राष्ट्रीय ओळखपत्राची साक्षांकित प्रत इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदारांचे अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. 

निवड प्रक्रिया:

अर्जदाराची संबंधित विषयातील शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन मुलाखतीसाठी त्याची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या  उमेदवारांची संस्थेच्या परिसरात किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा मुलाखत घेतली जाईल व त्यानंतर अंतिम निकाल त्याला कळवला जाईल.

अंतिम मुदत:- 

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १३ जुलै २०१६  आहे.

महत्वाचा  दुवा :-



वरील लेख (इटलीमध्ये आंतरविद्याशाखीय पीएचडीलोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत जून २०१६ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?