थायलंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती



थायलंडमधील एक प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या चुलाभोर्ण ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण या विद्याशाखांतील अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते. संस्थेकडून हुशार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संबंधित विषयांतील पदव्युत्तर संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी संस्थेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून ३० नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल :-

चुलाभोर्ण ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट (CGI) हे थायलंडमधील एक प्रमुख खासगी विद्यापीठ आहे. सीजीआय हे उपयोजित जैविक विज्ञान, जैवरसायनशास्त्र व पर्यावरणशास्त्रांमधील आंतरविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध असलेले विद्यापीठ आहे. विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रम हे जवळच असलेल्या चुलाभोर्ण संशोधन संस्थेच्या सहकार्याने राबवले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शास्त्रज्ञ असलेल्या थायलंडच्या राजघराण्यातील राजकन्या प्रा. डॉ. चुलाभोर्ण महिदोल यांच्या ४८व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रशस्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. थायलंडमधील ही संस्था आशियातील प्रमुख व्यावसायिक वैज्ञानिक संशोधन संस्था व्हावी व तिच्या माध्यमातून विज्ञान-तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावरील भावी नेतृत्व पुढे यावे, असे विज्ञान संशोधनावर मनापासून प्रेम करणाऱ्या डॉ. चुलाभोर्ण यांना वाटते. त्यांच्या पुढाकारानेच या संस्थेची स्थापना २००५ साली थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक शहरात झाली. जीवशास्त्र, रसायनशास्त्र व पर्यावरण विषयाच्या भरपूर उपशाखा व त्यामध्ये चाललेले एकूणच उत्तम दर्जाचे व अद्ययावत असे संशोधन, उत्कृष्ट प्राध्यापकवर्ग, सुसज्ज अशा आधुनिक संगणकीकृत प्रयोगशाळा इत्यादी बाबींमुळे सीजीआय विद्यापीठ हे थायलंडमधीलच नव्हे तर आशियातील उत्कृष्ट दर्जाच्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. सीजीआय विद्यापीठात रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण या विद्याशाखांशी संबंधित विषय म्हणजे जैवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, जेनेटिक्स, पर्यावरण विज्ञान, आण्विक जीवशास्त्र (Molecular Biology) आदी विभाग असून या विविध विभागांकडून पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम राबवण्यात येतात. संबंधित शिष्यवृत्ती ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी असून संस्थेच्या त्या-त्या विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांला बहाल करण्यात येते. शिष्यवृत्तीधारकाच्या पदव्युत्तर पदवीचा (संशोधनासहित) कालावधी दोन वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून या दोन वर्षांसाठी मासिक भत्ता दिला जाईल, तसेच अभ्यासक्रमाच्या या कालावधीकरिता संपूर्ण टय़ुशन फी दिली जाईल. शिष्यवृत्तीधारकाला दरमहा ठरावीक निवासी व वेतन भत्ता देण्यात येईल. याव्यतिरिक्त त्याला विमा भत्ता, प्रवास भत्ता व संशोधन अभ्यासक्रमासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. शिष्यवृत्तीधारकाला ही शिष्यवृत्ती मिळाल्यावर उत्तम गुणांकन राखणे बंधनकारक असेल. शिष्यवृत्तीसाठी स्वीकारल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही व अध्र्यातच त्याला ही शिष्यवृत्ती सोडून जाता येणार नाही. त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक राहील.

आवश्यक अर्हता :-

सीजीआयच्या या पदव्युत्तर शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार रसायनशास्त्र व जीवशास्त्र किंवा त्याच्याशी संबंधित विषयामधील (उदा. जैवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, जेनेटिक्स, पर्यावरण विज्ञान, आण्विक जीवशास्त्र) पदवीधर असावा. या शिष्यवृत्तीसाठी वैद्यकीय क्षेत्रांतील अर्जदारसुद्धा अर्ज करू शकतात. अर्जदाराचे कमाल वय ३० असावे. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराचा पदवीच्या स्तरावर ३.० सीजीपीए असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे पदवी स्तरावर संशोधनाचा अनुभव असणे गरजेचे आहे. संबंधित क्षेत्रातील संशोधन अनुभव असेल, तर त्याला पदवी प्रवेशासहित शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिले जाते. अर्जदाराने संशोधनातील अनुभवाचे प्रशस्तीपत्र अर्जाबरोबर जोडावे. तसेच त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत अतिशय उत्तम गुण संपादन करणे गरजेचे आहे, म्हणजे विद्यापीठाने तसे निकष जाहीर केले आहेत. अर्जदाराला टोफेलच्या (आयबीटी) परीक्षेत किमान ८० गुण, तर आयईएलटीएसमध्ये किमान ६.५ बँड्स मिळवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी जर जीआरई परीक्षा दिलेली असेल तर जीआरईचे गुण संस्थेस कळवावेत. सीजीआयने जीआरई परीक्षा बंधनकारक केलेली नाही, मात्र शिष्यवृत्तीतील प्राधान्यक्रमासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. अर्जदाराने त्याच्या अभ्यासक्रमाच्या विषयाची उपलब्धता संस्थेच्या वेबसाइटवर तपासावी.

अर्ज प्रक्रिया:-

चुलाभोर्ण ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूटच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया-शिष्यवृत्ती व वैद्यकीय अहवाल या सर्वासाठी आवश्यक अर्ज अर्जदाराने संस्थेच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावेत. अर्ज अचूक भरून ईमेलद्वारे cgi_academic@cgi.ac.th या ईमेलवर व पोस्टाने The Chulabhorn Graduate Institute (CGI Scholarship Program) 54 Kamphangphet 6 Road, Laksi, Bangkok 10210 THAILAND’ या पत्त्यावर पाठवावेत. अर्जप्रक्रिया किंवा तत्सम कोणत्याही गोष्टीबाबत सविस्तर माहितीसाठी किंवा कोणत्याही शंकेसाठी अर्जदार संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या ईमेल्सवर किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतो. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., सी.व्ही., त्याने पदवी अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, त्याचे टोफेलचे (किंवा आयईएलटीएसचे) गुणांकन, तसेच त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात.

निवड प्रक्रिया:-

अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ईमेलने कळवले जाईल. अर्जदाराचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम अधिकार विद्यापीठाकडे असेल.

अंतिम मुदत :-

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१६ आहे.

महत्त्वाचा दुवा :




वरील लेख (थायलंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत १५ ऑगस्ट २०१६ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?