संशोधनासाठी मिळवा शिष्यवृत्ती
ऑस्ट्रेलियामधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या
आरएमआयटी विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांमध्ये पीएचडी व पदव्युत्तर पदवी ग्रहण
करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या
प्रथम सत्रातील पीएचडी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून
दि. ३१ ऑक्टोबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी:-
‘रॉयल मेलबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’ (आरएमआयटी) हे
तांत्रिक विद्यापीठ ऑस्ट्रेलियातील पहिल्या वीस नामांकित तर जगातल्या पहिल्या पाचशे
विद्यापीठांपैकी एक आहे. १८८७ साली स्थापन झालेले हे विद्यापीठ व्हिक्टोरिया
राज्याच्या राजधानीत म्हणजे मेलबर्न या शहरात क्षेत्रफळाने मोठय़ा भूभागावर वसलेले
आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विद्यापीठाची एकूण चार केंद्र आहेत तर आशिया, युरोप आदी खंडातील देशांमध्ये एकूण तीन केंद्र आहेत. विद्यापीठाने तयार
केलेल्या विविध अभ्यासक्रमांमध्ये व्यावसायिक, उपयोजित, किमान कौशल्यावर आधारित दृष्टिकोन जपलेला आहे. विद्यापीठाने जवळपास प्रत्येक
विषयातील अभ्यासक्रमाचा आराखडा उद्योगक्षेत्रातील गरज ओळखून निश्चित केलेला आहे. आरएमआयटी विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियातील एक प्रमुख संशोधन
केंद्र आहे. जागतिक स्तरावर ‘आर्ट अँड डिझाइन’ या विषयातील विद्यापीठाचे संशोधनातील योगदान हे नेहमी वाखाणण्याजोगेच राहिले
आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये चालू असलेल्या संशोधनातील गुणवत्ता वाढावी
व त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्ता विद्यापीठाकडे आकर्षित
व्हावी या हेतूने ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या
पीएचडीच्या किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीएवढाच शिष्यवृत्तीचा कालावधी
असेल. या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करावे लागेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत अर्जदाराला विद्यपीठाकडून त्याच्या
संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी आवश्यक असलेले शिक्षण शुल्क, आंतरराष्ट्रीय वैद्यकीय विमा सुविधा, तसेच विद्यावेतन
देण्यात येईल. हे विद्यावेतन वार्षिक जवळपास तीस ते पस्तीस हजार ऑस्ट्रेलियन
डॉलर्स एवढे असेल. तसेच,
विद्यापीठातील त्याच्या विभागाकडून निवासी भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या सर्व सुविधा देण्यात
येतील. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीधारकाला वैद्यकीय रजा व प्रसूती रजा आदी सवलती
दिल्या जातील. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींची संख्या जाहीर
केलेली नाही.
अर्ज प्रक्रिया:–
पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश व शिष्यवृत्तीच्या
अर्जप्रक्रियेसाठी विद्यापीठाने एकच ऑनलाइन अर्जप्रणाली वेबसाइटवर उपलब्ध करून
दिलेली आहे. अर्जदार अर्ज करणार असलेल्या पदव्युत्तर किंवा पीएचडी अभ्यासक्रमाचा
अर्ज या ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या
सॉफ्ट प्रतींसह इमेल करावा. याबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक व संशोधन
पाश्र्वभूमीबद्दल आणि कार्य अनुभवाबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी, त्याचा सी.व्ही,
त्याने पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात केलेल्या
संशोधनाचा लघु संशोधन अहवाल, तसेच त्याने
शोधनिबंधाच्या स्वरूपात प्रकाशित केलेले एखादे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय
संशोधन,
याव्यतिरिक्त त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या
व शिफारस देऊ
शकणाऱ्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांचे इमेल, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, जीआरई आणि आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुणपत्रक, संशोधन अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. शिफारसपत्रांसाठी
मात्र अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन
प्राध्यापकांचे अथवा तज्ज्ञांचे ईमेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ
स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांना संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती
करेल.
आवश्यक अर्हता:–
आरएमआयटी विद्यापीठात प्रवेशासहित असलेली ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय
अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार मान्यताप्राप्त
विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा. विद्यापीठाच्या कोणत्याही
विभागामध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने पदव्युत्तर पदवी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केलेली
असावी. त्यामध्ये संशोधनातील घटक अधिक असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश
घेणाऱ्या अर्जदाराकडे त्या विषयातील पदवी असावी. त्याच्या पदवी अभ्यासक्रमाचा
कालावधी मात्र चार वर्षांचा असावा. त्याचा पदवीचा जीपीए किमान ४ (८० टक्के व
त्यापेक्षा जास्त) एवढा असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक
आहे. अर्जदाराची एकूण शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असावी. अर्जदारांसाठी
आयईएलटीएस या इंग्रजीच्या परीक्षेमध्ये किमान सात बँड्स मिळवणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाने याव्यतिरिक्त कोणतीही किमान आवश्यक अर्हता नमूद
केलेली नाही,
मात्र अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. त्याच्याकडे जर
पूर्णवेळ कार्यानुभव असेल किंवा किमान एका विदेशी भाषेचे उत्तम
ज्ञान असेल तर अंतिम निवड प्रक्रियेमध्ये निश्चितच प्राधान्यक्रम मिळू शकेल.
निवड प्रक्रिया:-
संशोधन गुणवत्ता लक्षात घेऊन अर्जदाराची निवड करण्यात येईल. संशोधन समितीकडून
त्यावर चर्चा झाल्यावर अंतिम विद्यार्थ्यांची निवड होईल. निवडीनंतर यशस्वी
अर्जदारांना विद्यापीठाकडून त्यांच्या निकालाबाबत व पुढील सर्व प्रक्रियेबाबत
कळवण्यात येईल.
अंतिम मुदत:–
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑक्टोबर २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा:–
वरील लेख (संशोधनासाठी मिळवा शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या
पुरवणीत २६ सप्टेंबर २०१६ रोजी प्रकाशित झाला.
Comments
Post a Comment