उच्चशिक्षणासाठी अर्थसंधी

के.सी. महिंद्र फाउंडेशनकडून के.सी. महिंद्र शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे एमएस, एमए, एमबीए किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेशातील कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवलेल्या अर्जदारास ही शिष्यवृत्ती दिली जाते. उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे. मूलभूत विज्ञान, कलाशाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी व वैद्यकीय आदी विषयांतील अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ मधील या शिष्यवृत्तीसाठी वर उल्लेखलेल्या विषयांमध्ये किंवा विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:-
परदेशी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. यात मध्यमवर्गातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी दिसतेय. पण परदेशात जाण्यासाठी पालकांना मोठे आर्थिक नियोजन करावे लागते. साहजिकच एखाद्या संस्थेकडून शिष्यवृत्ती किंवा तत्सम आर्थिक मदत मिळाल्यास ते पालकांना हवेच असते. परदेशात शिकू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून के.सी.महिंद्र फाउंडेशनकडून के.सी.महिंद्रा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या शिष्यवृत्तीअंतर्गत सामाजिक शास्त्रे, मानववंशशास्त्रे, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन व वैद्यकीय या विद्याशाखांमधील सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीअंतर्गत उत्कृष्ट तीन शिष्यवृत्तीधारकांना आठ लाख रुपयांची शिष्यवृत्ती बहाल केली जाईल व निवड झालेल्या इतर ४७ शिष्यवृत्तीधारकांना चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. या वर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींची एकूण संख्या ५० एवढी आहे.

आवश्यक अर्हता:-
ही शिष्यवृत्ती सर्व भारतीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराला परदेशातील मान्यताप्राप्त कोणत्याही एका विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला असावा. ज्या विषयात परदेशी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित, भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अर्जदाराकडे असावी. शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील उत्तम असा कार्य अनुभव  किंवा संशोधन अनुभव असावा. त्याचे प्रशस्तीपत्रकही अर्जदाराने सोबत जोडावे. एवढेच नव्हे, तर त्याच्याकडे त्याच्या विषयातील नावीन्यपूर्ण कल्पना असाव्यात. हा एक प्रमुख निकष ठेवलेला आहे. अर्जदाराचे इंग्रजीवरील प्रभुत्व टोफेल किंवा आयईएलटीएसच्या गुणांवरून ठरवले जाईल. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी यापैकी एक परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण असावे.

अर्ज प्रक्रिया:-
अर्जदाराने संस्थेच्या संकेतस्थळावर दिलेल्या अर्जाची प्रिंट घेऊन विहित नमुन्यात तो संपूर्णपणे भरून पोस्टाने संस्थेच्या पत्त्यावर अंतिम मुदतीपूर्वी पाठवावा. अर्जाबरोबर परदेशातील प्रवेश मिळालेल्या विद्यापीठाच्या प्रवेशपत्राची साक्षांकित प्रत, किमान एका प्राध्यापक किंवा तज्ज्ञ मार्गदर्शकाचे शिफारसपत्र, परदेशी विद्यापीठाला त्याने पाठवलेले एसओपी, त्याचा सी.व्ही., त्याचे जीआरई किंवा जीमॅटचे गुणपत्रक व टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्ड्स सर्व ट्रान्सक्रिप्ट्स व गुणपत्रक, दहावी व बारावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा पुरावा इत्यादी गोष्टी जोडाव्यात. पूर्ण भरलेले अर्ज अर्जदारांनी खालील पत्त्यावर पाठवावेत व अधिक माहितीसाठी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट
सेसिल कोर्ट, महाकवी भूषण मार्ग, मुंबई ४००००१
संपर्क (०२२) २२८९ ५५२६/ २२०२ १०३१

संकेतस्थळ:- 

निवड प्रक्रिया:-
अर्जदाराची निवडलेल्या विषयातील गुणवत्ता, शिष्यवृत्तीची निकड, त्याचे चारित्र्य, कल व आर्थिक पाश्र्वभूमी इत्यादी अनेक निकष लक्षात घेऊन निवड समितीकडून त्याची अंतिम निवड करण्यात येईल.

अंतिम मुदत:-
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३० मार्च २०१७ ही आहे.

वरील लेख (उच्चशिक्षणासाठी अर्थसंधी) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत ११ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?