जागतिक बँकेची 'आर्थिक ' पदव्युत्तर शिष्यवृत्ती


  जागतिक बँकेकडून सदस्य असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधील अर्जदारांना वेगळ्या विषयांवरील अभ्यासक्रम अथवा प्रकल्पांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात.  जागतिक बँक जवळपास या सर्वच शिष्यवृत्त्या एखाद्या इतर सहकारी देशाच्या मदतीने देत असते. त्यातील एक महत्वाची शिष्यवृत्ती म्हणजे 'जपान-जागतिक बँक संयुक्त शिष्यवृत्ती' (Joint Japan/World Bank Graduate Scholarship - JJWBGS ). शिष्यवृत्तीच्या नावावरूनच समजते की ती जपानच्या सहकार्याने दिली जाते. जागतिक बँकेचेी ही शिष्यवृत्ती आर्थिक विकासाशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या शिष्यवृत्तीसाठी दि. ३१ मार्चपूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.   


पार्श्वभूमी :- 
जागतिक बँकेच्या सदस्य देशांची संख्या साधारणत: १५० पेक्षाही जास्त आहे. जगातील सर्व विकसनशील देशांमध्ये आर्थिक स्थैर्य नांदावे म्हणून त्या देशांमधील आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण विकासाशी संबंधित विषयांकडे जागतिक बँक विशेष लक्ष देत असते. विशेषत: यामुळेच अनेक विकसनशील देशांमध्ये जागतिक बँकेकडून बरेचसे कार्यक्रम राबवले जातात. या कार्यक्रमांतर्गत विकसनशील देशांत आर्थिक व सामाजिक विकासाच्या क्षेत्रात उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या साऱ्याचा जागतिक विकासास हातभार लावणे असा व्यापक व दीर्घकालीन हेतू जागतिक बँकेसमोर आहे. शिष्यवृत्तीधारकांनी शिष्यवृत्तीच्या कालावधीनंतर आपल्या ज्ञान व कौशल्याचा वापर करून स्वत:च्या देशातील आर्थिक-सामाजिक विकासासाठी योगदान द्यावे अशी या कार्यक्रमातून अपेक्षा आहे. अर्थातच, ती बंधनकारक नाही.

आवश्यक पात्रता :- 
जागतिक बँकेच्या या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्जदार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. मात्र, अर्जदाराचा जन्म ३१ मार्च १९७३ पूर्वी झालेला नसावा. त्याचबरोबर अर्जदाराकडे दि. ३१ मार्च २०१३ पर्यंत स्वत:च्या देशात किंवा इतरत्र फक्त विकसनशील देशामध्ये कमीत कमी २ वर्षांचा (जास्त अनुभवी अर्जदारांना प्राधान्य) कामाचा अनुभव असावा. अर्जदार कोणत्याही विकसित देशाचा नागरिक किंवा तेथील कायमचा रहिवासी नसावा. तसेच, अर्जदाराचा कोणत्याही विकसित देशातील निवासाचा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त नसावा. अर्जदार जागतिक बँक अथवा तिच्याशी संबंधित कोणत्याही संस्थेचा कर्मचारी नसावा. अर्जदाराचे चारित्र्य व त्याची शारीरिक स्थिती उत्तम असावी.


शिष्यवृत्तीबद्दल:-
१९८७ साली जागतिक बँकेने जपान सरकारकडून मिळालेल्या निधीतून त्याच वर्षापासून 'जागतिक बँक शिष्यवृत्ती कार्यक्रम' राबवायला सुरुवात केली. या कार्यक्रमांतर्गत जागतिक बँकेचे सदस्य असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधील विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. वर उल्लेखलेली शिष्यवृत्ती त्यांपैकीच एक आहे. जगातल्या बऱ्याचशा विद्यापीठांत आज "आर्थिक विकासा"शी संबंधित अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, अर्थशास्त्र ,आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण किंवा विकासाशी संबंधित इतर विषय. तर त्यापैकी कोणत्याही एक किंवा दोन वर्षाच्या पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती मिळवता येते. फक्त तो अभ्यासक्रम उपलब्ध असलेले विद्यापीठ स्वत:च्या देशाऐवजी, जागतिक बँकेचे सदस्य असलेल्या इतर कोणत्याही विकसनशील देशांमधील असावे. थोडक्यात, एखाद्या भारतीय विद्यार्थ्याला जर ही शिष्यवृत्ती मिळाली तर त्याला  भारतातील कोणत्याही विद्यापीठात तत्सम अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार नाही. त्याऐवजी तो परदेशातील कोणत्याही विद्यापीठामध्ये उपरोक्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. आतापर्यंत साधारणत: ६४००० अर्जदारांमधून साडेतीन हजार अर्जदारांची अंतिम निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विदयार्थ्यांना जागतिक बँकेकडून पूर्णवेळ शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये विद्यापीठाची ट्युशन फी, निवासासाहित इतर सर्व खर्च, अर्जदाराचे  विमानाचे तिकीट व त्याचा वैद्यकीय व अपघात विमा या सर्व बाबींचा समावेश आहे. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी परदेशी
विद्यापीठात प्रवेश मिळाला असेल तर त्यांच्याकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवलेले आहेत.

अर्ज प्रक्रिया: 
 जागतिक बँकेच्या वेबसाईटवर अर्जप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज अजून वेबसाईटवर उपलब्ध नाहीत. मात्र येत्या काही दिवसांत ते उपलब्ध होतील असे नमूद केलेले आहे. अर्जासोबत अर्जदाराला त्याचे शिक्षण व शिक्षणेतर उपक्रम इत्यादी बाबींची माहिती देणारा सी.व्ही.,परदेशी विद्यापीठाकडून मिळालेले प्रवेशपत्र, नोकरीच्या (किंवा व्यवसायाच्या) अनुभवाचे प्रशस्तीपत्र, दोन शैक्षणिक तज्ञांचे शिफारसपत्र, आतापर्यंतची सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स् आणि राष्ट्रीयत्वाचा व जन्मतारखेचा पुरावा देणारी कागदपत्रे जोडावी लागतील. 
अंतिम मुदत:-
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१ मार्च २०१३ आहे.  तर शिष्यवृत्तीबद्दल अर्जदारांना जुलैच्या अखेरीस कळवले जाईल. 

महत्वाचा दुवा :-

http://www.worldbank.org/



वरील लेख (http://epaper.loksatta.com/c/794377) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रकाशित झाला.









Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?