अमेरिकेत फुलब्राईट - नेहरू पाठ्यवृत्ती


युसिफ या संस्थेकडून भारतीय नागरिकत्व असलेल्या प्राध्यापक व संशोधकांना दरवर्षी अमेरिकेतील विविध विद्यापीठ व संशोधन संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी पाठ्यवृत्ती बहाल केली जाते. ही पाठ्यवृत्ती म्हणजेच फुलब्राईट - नेहरू पाठ्यवृत्ती. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा ही पाठ्यवृत्ती हुशार व संशोधनाची प्रचंड आवड असणाऱ्या प्राध्यापक संशोधकांना देण्यात येणार आहे. या पाठ्यवृत्तीसाठी युसिफकडून दि. १५ जुलै २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पार्श्वभूमी :- 

भारत व अमेरिकेमधील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रांतील सहकार्य वाढीस लागावे व  अध्यापन - संशोधन क्षेत्रांतील विचारांची आदानप्रदान व्हावी या हेतूने युसिफ  म्हणजेच द युनायटेड स्टेटस् इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. या संस्थेकडून दोन्ही देशांतील अभ्यासकांना विविध विषयांतील अध्यापन संशोधनासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या व इतर सहाय्यवृत्त्या देण्यात येतात. आतापर्यंत संस्थेकडून भारत व अमेरिकेतील मिळून एकूण १७००० पेक्षा अधिक फुलब्राईट फेलोजनिवडले गेलेले आहेत.

पाठ्यवृत्तीबद्दल:- 

हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या भारतीय प्राध्यापक व संशोधकांना अमेरिकेतील विविध विद्यापीठ व संशोधन संस्थांमध्ये त्यांचे स्वत:चे अध्यापन किंवा संशोधन किंवा दोन्हीही करण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट माध्यम मिळावे हा युसिफकडून दिल्या जाणाऱ्या फुलब्राईट - नेहरू पाठ्यवृत्तीचा प्रमुख हेतू आहे. युसिफची ही पाठ्यवृत्ती शिक्षण व संशोधन क्षेत्रांतील सर्वच विद्याशाखांसाठी दिली जाते. सर्वसाधारणपणे मात्र कृषी, अर्थशास्त्र, उर्जा, हवामान बदल, पर्यावरण, शिक्षण, आंतरराष्ट्रीय संबंध, लोकप्रशासन, सार्वजनिक आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांना आणि अमेरिका किंवा भारतातील भाषा, साहित्य, इतिहास, प्रशासन, अर्थव्यवस्था, संस्कृती या शाखांमधल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाते. पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदारांना पाठ्यवृत्तीचा संबंधित कालावधी अमेरिकेतच पूर्ण करावा लागतो. या पाठ्यवृत्तीचा एकूण कालावधी वेगवेगळ्या विद्याशाखेवर अवलंबून असून तो  चार महिन्यांपासून ते नऊ महिन्यांपर्यंत आहे. युसिफच्या या पाठ्यवृत्तीमध्ये पाठ्यवृत्तीधारकाचा येण्याजाण्याचा संपूर्ण विमानप्रवास, निवासासहित इतर  खर्च व मासिक भत्ता इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

आवश्यक  अर्हता :- 

या पाठ्यवृत्तीसाठी अर्जदार पी.एच.डी. पदवीधारक असावा अथवा त्याचे पी.एच.डी.च्या समकक्ष शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत. त्याला त्याच्या कामाचा म्हणजे संशोधन किंवा अध्यापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. तसेच सध्या सेवेमध्ये असणाऱ्या अर्जदारांनी योग्य प्रशासकीय व्यवस्थेमार्फत आपला अर्ज पाठवावा. अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या अलीकडील प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाची एक प्रत पाठवावी.


अर्ज प्रक्रिया: 

युसिफच्या वेबसाईटवर या पाठ्यवृत्तीसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाचा नमुना व त्याबद्दलची इतर माहिती दिलेली  आहे. अर्ज पूर्ण करून अर्जदाराने तो संस्थेला इ- मेल करावा. अर्ज भरताना तो हस्ताक्षरात भरू नये त्याऐवजी  संगणकाचा वापर करावा. तसेच अर्जामध्ये विचारलेली माहिती भरताना अर्जदाराने दिलेल्या शब्दमर्यादेचे उल्लंघन करता कामा नये. पूर्ण अर्जाची एक प्रिंट काढून त्यावर स्वत:ची स्वाक्षरी करून ती प्रत जवळच्या युसिफच्या कार्यालयात द्यावी. पश्चिम भारतासाठी युसिफचे कार्यालय मुंबई इथे आहे. अर्जदार जर खाजगी अथवा शासकीय सेवेत असेल तर त्याने आपला अर्ज योग्य त्या प्रशासकीय व्यवस्थेमार्फत युसिफकडे पाठवावा.

अंतिम मुदत:- 

अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.१५ जुलै २०१३ आहे.  

महत्वाचा दुवा :-
http://www. usief.org.in

वरील लेख (फुलब्राईट - नेहरू पाठ्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि.१७ जून २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?