अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

परदेशातील मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या (Persons of Indian origin or PIO) आणि अनिवासी भारतीयांच्या (NRIs) मुलांना भारतामध्ये उच्च शिक्षण घेता यावे यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने एक शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती योजना Scholarship Programme for Diaspora Children (SPDC) या नावाने ओळखली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत या विद्यार्थ्यांना भारतातील कुठल्याही विद्यापीठात किंवा शैक्षणिक अथवा संशोधन संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक-अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (फक्त वैद्यकीय व संबंधित इतर क्षेत्रे वगळता ) प्रवेश व त्या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीतील सर्व खर्चाची पूर्तता भारत सरकारकडून केली जाते . SPDC  च्या या शिष्यवृत्तीसाठी परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून सध्या परदेशस्थित असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांकडून दि. १० जून २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.   


पार्श्वभूमी :-

डायस्पोरा (Diaspora) या शब्दाचा अर्थ 'जगाच्या निरनिराळ्या भागांत राहणाऱ्या व्यक्ती ज्यांचे पूर्वज एका ठराविक देशात राहत होते ' असा आहे. म्हणजे मूळ  भारतीय वंशाची असलेली पण सध्या इतर देशांमध्ये (फक्त पाकिस्तान व बांगलादेश वगळता) स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबामधील मुलांसाठी गेल्या काही वर्षापासून ही शिष्यवृत्ती भारत सरकारकडून सुरु करण्यात आली. या शिष्यवृत्तीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी  EdCIL (India) limited, ही कंपनी भारत सरकारच्या वतीने 'नोडल एजन्सी' म्हणून काम पाहते. SPDC ची ही शिष्यवृत्ती फक्त पदवी अभ्यासक्रमांसाठीच दिली जाते.

शिष्यवृत्तीबद्दल:-

भारत सरकारच्या अनिवासी भारतीय व भारतीय वंशाच्या मुलांना दिली जाणारी ही शिष्यवृत्ती परराष्ट्र मंत्रालयाने सन २००६-०७ पासून सुरु केलेली आहे. या  शिष्यवृत्तीमध्ये  विद्यार्थ्याला  पदवी अभ्यासक्रमास प्रवेश, ट्युशन फी, प्रवेश फी, प्रवेशानंतरचा शैक्षणिक खर्च व पदवीच्या पूर्ण कालावधीसाठी लागणारा इतर सर्व आर्थिक खर्च या सर्व बाबींचा समावेश आहे. मंत्रालयातर्फे एकूण १०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यापैकी ५० विद्यार्थी अनिवासी भारतीय असतात तर उर्वरित  ५० विद्यार्थी भारतीय वंशाचे परदेशस्थ विद्यार्थी असतात. अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती साठी पात्र ठरण्यासाठी प्रमुख निकष आर्थिक उत्पन्नाच्या ठराविक मर्यादेचा आहे. त्याबाबतची जास्त माहिती मंत्रालयाच्या वेब साईटवर दिलेली आहे. मूळ भारतीय वंशाच्या (PIO) विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही आर्थिक मर्यादा नाहीत. संबंधित शिष्यवृत्ती ही या दोन्ही गटांमधील विद्यार्थ्यांना  भारतामध्ये शिकण्यासाठी मिळणार असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यास भारतातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये  प्रवेश  मिळू  शकणार  आहे. अर्थातच हा प्रवेश त्याच्या या पूर्वीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून असेल व त्याद्वारेच तो विविध  व्यावसायिक-अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निश्चित केला जाणार आहे. 


आवश्यक  अर्हता :-
SPDC  साठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा वयोगट दि.०१ ऑक्टोबर २०१३ रोजी १७ ते २१च्या दरम्यान असावा, म्हणजेच त्याचा जन्म दि.०१ ऑक्टोबर १९९२ पूर्वी व दि.०१ ऑक्टोबर १९९६ नंतर झालेला नसावा. त्या अर्जदाराच्या शालांत अथवा समक्षक परीक्षेच्या प्रमाणपत्रावरील जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदाराचे उच्च माध्यमिक (आपल्याकडील अकरावी-बारावी ) किंवा समकक्ष शिक्षण पूर्ण झालेले असावे मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण झालेले नसावे. तसेच अर्जदाराचे हे शिक्षण गेल्या सहा वर्षांपैकी कमीत कमी तीन वर्षे तरी परदेशामध्ये कुठेही झालेले असावे.   


अर्ज प्रक्रिया :- 

SPDC च्या शिष्यवृत्तीसाठी वेब साईट वर उपलब्ध असलेल्या स्वरुपात अर्ज भरून त्याबरोबर माध्यमिक- उच्च माध्यमिक अथवा समकक्ष पातळीच्या परीक्षेचे ट्रान्सक्रिप्टस   EdCIL (India) limited कडे पोस्टाने अंतिम मुदतीपूर्वी पाठवायचे आहेत.  EdCIL (India) limited चा पत्ता वेबसाईट वर दिलेला आहे.

निवड प्रक्रिया :

अर्जदारांच्या अर्ज छाननी व पडताळणी नंतर पात्र अर्जदारांची प्रवेश परीक्षा घेतली जाईल. प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार अर्जदारांची  शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या अर्जदारांची यादी मंत्रालयाच्या वेबसाईट वर दि.  ३० जून २०१३ रोजी प्रकाशित करण्यात येईल. 


अंतिम मुदत:- अर्ज करण्याची अंतिम मुदत   दि. १० जून २०१३  आहे.  

महत्वाचा  दुवा :-
http://www.moia.gov.in/


वरील लेख (अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि.२७ मे २०१३ रोजी प्रकाशित झाला.

वरील लेख (अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. ३ जून २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?