इटलीमध्ये अर्थशास्त्रातील पीएचडीसाठी शिष्यवृत्ती’



आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासू प्राध्यापकवर्ग आणि संशोधनातील तज्ञ मार्गदर्शक यांनी सुसज्ज अशा सेंट अॅना स्कूल ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज् आणि स्ट्रासबर्ग विद्यापीठ या इटली व फ्रांसमधील दोन संस्थांच्या वतीने संयुक्तपणे अर्थशास्त्रामध्ये पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाहित संशोधन शिष्यवृत्ती दिली जात आहे. २०१५-१६ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर अर्जदारांकडून दि. ७ मे २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:


सेंट अॅना स्कूल ऑफ अॅडव्हान्सड स्टडीजचा अर्थशास्त्र विभाग नामांकित असून तो ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स’ नावाने ओळखला जातो. या विभागात अर्थशास्त्राच्या विविध शाखांमध्ये संशोधन होते. औद्योगिक व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये इथे जागतिक दर्जाचे संशोधन व संशोधन प्रशिक्षण होते. या विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम दर्जाचे मानांकन मिळालेले आहे. सेंट अॅना स्कूल ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज् आणि स्ट्रासबर्ग विद्यापीठ या दोन्ही संस्थांकडून अर्थशास्त्रात यावर्षी एकूण चार संशोधन शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत. शिष्यवृत्तीधारकाच्या संशोधन प्रकल्पाचा म्हणजे पीएचडीचा कालावधी चार वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून पीएचडीच्या कालावधीकरता ट्युशन फी, चौदा हजार युरो एवढे वार्षिक वेतन, ‘सेंट अॅना स्कूल ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज्’ संस्थेच्या उपहारगृहासहित इतर सर्व सुविधा मोफत दिल्या जातील. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही. अर्जदाराने संशोधनाच्या व इतर सोयींची उपलब्धता विद्यापीठाच्या वेबसाईटवर तपासावी.


अर्जदारासाठी फायदेशीर बाबी :


अर्जदारांना या शिष्यवृत्तीला अर्ज केल्यास, जर त्याची अंतिम निवड झाली तर त्याला या विद्यापीठात पीएचडीला प्रवेशासहित शिष्यवृत्ती मिळेल. तसेच, अर्थशास्त्रासारख्या उत्तम क्षेत्रात जागतिक दर्जाच्या संस्थेत काम करण्याची संधी मिळेल.


आवश्यक अर्हता :


ही शिष्यवृत्ती अर्थशास्त्रात पी.एच.डीचे संशोधन करू इच्छिणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर असावा. म्हणजे त्याच्याकडे अर्थशास्त्रातील एम.ए. किंवा एम.एस्सी. यापैकी एक पदवी असावी. अर्जदार जर पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत असेल, तर दि.३१ ऑक्टोबर २०१५ पूर्वी त्याच्याकडे पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराने स्वत:चा अर्ज उत्कृष्ट बनवण्यासाठी त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने टोफेल अथवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असावे.


अर्ज प्रक्रिया:


या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., स्वत:चा सी.व्ही., त्याने पदव्युत्तर अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध, त्याला पीएचडीसाठी करावयाच्या असलेल्या संशोधनाची थोडक्यात ओळख करून देणारा एक अहवाल (Research Proposal), त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे संशोधन तसेच त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्यासर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयइएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे. अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ञ मार्गदर्शकाला इमेलद्वारे संपर्क करू शकतो.


निवड प्रक्रिया:


अर्जदाराचा अर्ज व त्याबरोबर संशोधनातील त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन निवड समिती त्याच्या अर्जाची छाननी करेल व त्याला एकूण १०० पैकी गुण देण्यात येतील. ज्या अर्जदारांना १०० पैकी किमान ७० गुण मिळतील ते अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. त्या शिष्यवृत्तीधारकांना दि. ११ जून २०१५ पर्यंत त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल व पुढील पंधरा दिवसांत पुढच्या सर्व प्रक्रियेसाठी आवाहन केले जाईल.


अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.७ मे २०१५ आहे.


महत्वाचा दुवा :-


http://www.sssup.it/






वरील लेख (इटलीमध्ये अर्थशास्त्रातील पीएचडीसाठी शिष्यवृत्ती.) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. १२ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित झाला.













Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?