आयपीसीसीची पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती



२००७ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाल्याने चर्चेत आलेल्या आयपीसीसी (इंटर गव्हर्नमेंट पॅनेल फॉर क्लायमेट चेंज) या संस्थेने पारितोषिकाच्या निधीतून विकसनशील देशांतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी आयपीसीसी शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला. आयपीसीसी शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत या देशांमधील युवा शास्त्रज्ञांना विद्यापीठामध्ये अथवा संशोधन संस्थेत ठराविक विषयांत दोन वर्षे संशोधन करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१५-१७ मध्ये दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील युवा संशोधक अर्जदारांकडून दि. १५ फेब्रुवारी २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:


डिसेंबर २००७मध्ये आयपीसीसीला मानवनिर्मित हवामान बदलांच्या परिणामांवर राबवलेल्या उपायांसाठी शांततेचे नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले. यामुळे हवामान बदल आणि मानवी सुरक्षा यांचे महत्व अधोरेखित झाले. म्हणूनच पारितोषिकाच्या मिळालेल्या निधीमधून आयपीसीसीने या विषयांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात हा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवण्यासाठी आणखी आर्थिक भागीदारीची गरज होती. हवामान बदलांवर संयुक्त राष्ट्राच्या विशेष राजदूत व नार्वेच्या माजी पंतप्रधान डॉ. ब्रुंड्टलँड यांनी आर्थिक भागीदार व्हायचे ठरवले. तेव्हापासून आयपीसीसी विकसनशील देशांमधील युवा शास्त्रज्ञांना हवामान बदलांवर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती देत आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत विकसनशील देशांमधील युवा शास्त्रज्ञांना त्यांच्या ऐच्छिक विद्यापीठामध्ये अथवा संशोधन संस्थेत पीएचडीसाठी प्रवेश घेऊ दिला जातो. त्यादरम्यान आयपीसीसीकडून या शिष्यवृत्तीधारकाला दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त पंधरा हजार युरो एवढे वार्षिक वेतन दिले जाते. यावेळी या शिष्यवृत्तीसाठी मागवले जाणारे अर्ज हे २०१५-१७ या कालावधीकरता आहेत.


आवश्यक अर्हता :


ही शिष्यवृत्ती विकसनशील देशांमधील सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे विकसनशील देशांचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबर त्याच्याकडे हवामान बदल किंवा संबंधित कोणत्याही विषयामध्ये पीएचडीसाठी प्रवेश मिळाल्याचे किंवा पीएचडी करत असल्याचे विद्यापीठाचे किंवा संशोधन संस्थेचे पत्र असणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त असू नये. अर्जदाराने स्वत:चा अर्ज उत्कृष्ट बनवण्यासाठी त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.


अर्ज प्रक्रिया:


या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या आयपीसीसीच्या वेबसाईटवर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., स्वत:चा सी.व्ही., त्याने पदव्युत्तर किंवा पीएचडीच्या सुरुवातीच्या अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध, त्याला पीएचडीसाठी करावयाच्या असलेल्या संशोधनाची थोडक्यात ओळख करून देणारा एक अहवाल (Research Proposal), त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे संशोधन, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती आणि त्याचा वर्षभराचा वित्त अहवाल इत्यादी गोष्टी वेबसाईटवर जमा कराव्यात. त्याबरोबरच अर्जदाराला ज्या विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळालेला आहे त्याचे अधिकृत प्रवेशपत्र आयपीसीसीच्या अर्जाबरोबर त्यांच्या वेबसाईटवर जमा करावे लागेल.


निवड प्रक्रिया:


अर्जदाराचा अर्ज व त्याबरोबर संशोधनातील त्याची गुणवत्ता व त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन आयपीसीसी सायन्स बोर्ड व संबंधित विषयांतील तज्ञ त्याच्या अर्जाची छाननी करतील. जे अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील, त्यांना सप्टेंबर २०१५ पर्यंत त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.


अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ फेब्रुवारी २०१५ आहे.


महत्वाचा दुवा :-


http://www.ipcc.ch/




वरील लेख ('आयपीसीसी'ची पीएच.डी.साठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती.) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. २६ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित झाला.












Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?