अमेरिकेत कृषी तंत्रज्ञानातील पाठ्यवृत्ती


हरितक्रांतीचे प्रणेते व जगद्विख्यात कृषिशास्त्रज्ञ नॉर्मन बोर्लोग यांच्या नावाने अमेरिकन सरकारच्या कृषी विभागाकडून आंतरराष्ट्रीय अर्जदारांना कृषी तंत्रज्ञानातील उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाते. २०१४ साठी देण्यात येणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. २२ सप्टेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.


पाठ्यवृत्तीबद्दल:-


नॉर्मन बोर्लोग कृषी तंत्रज्ञान पाठ्यवृत्ती कार्यक्रम हा हरितक्रांतीचे प्रणेते व जगद्विख्यात कृषिशास्त्रज्ञ नॉर्मन बोर्लोग यांच्या सन्मानार्थ २००४ सालापासून अमेरिकी कृषी विभागाने सुरु केला. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास ६४ देशांमधील कृषी अध्यापक, शास्त्रज्ञ व कृषी नियोजनकर्ते असलेल्या विविध पाठ्यवृत्तीधारकांना गौरवले गेले आहे. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत उपरोक्त व्यावसायिकांना अमेरिकेतील संशोधक किंवा शासकीय संस्थेबरोबर संयुक्त प्रशिक्षण व कृषी तंत्रज्ञानामध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पाठ्यवृत्तीचा एकूण कालावधी साधारणतः ६ ते १२ आठवड्यांचा आहे. काही कालावधीनंतर अमेरिकेतील संबंधित संशोधक किंवा शासकीय संस्था पाठ्यवृत्तीधारकाच्या प्रकल्प संस्थेला (home institution) त्या संशोधनाची उपयुक्तता जाणून घेण्यासाठी भेट देतील. या संयुक्त प्रशिक्षण व कृषी संशोधन कार्यक्रमात agronomy, veterinary science, nutrition, food safety, sanitary and phytosanitary issues, natural resource management, agricultural biotechnology, global climate change, agricultural economics and agricultural policy इत्यादी विषयांचा समावेश असल्याने पाठ्यवृत्ती कार्यक्रमाची व्यापकता लक्षात येते.


आवश्यक अर्हता :-


ही पाठ्यवृत्ती निवडक २८ देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. भारत त्या देशांपैकी एक आहे. म्हणजेच भारतीय अर्जदार या पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. इतर आवश्यक अर्हतांमध्ये अर्जदाराकडे कृषी/ तंत्रज्ञान अथवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर किंवा पी.एच.डी. पदवी असावी. तसेच, त्याच्याकडे किमान दोन वर्षांचा संशोधनाचा अनुभव असावा. तसेच, अर्जदार त्याच्या देशामधील एखाद्या विद्यापीठ, संशोधन संस्था किंवा कोणत्याही इतर शासकीय संस्थेमध्ये कृषी संशोधनात कार्यरत असावा. अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी व त्याचे इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व असावे. याशिवाय, सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिकेतील पाठ्यवृत्तीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने मिळवलेल्या तेथील ज्ञानावर आधारित त्याचे पुढील संशोधनकार्य स्वदेशात सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.


अर्ज प्रक्रिया:


अर्जदाराने या पाठ्यवृत्तीसाठी त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून पाठवणे आवश्यक आहे अर्जदाराने संपूर्ण भरलेल्या अर्जासोबत स्वत:चे एस. ओ. पी. (Statement of Purpose), त्याच्या शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, नोकरी व अनुभव इत्यादी बाबींची माहिती देणारा सी.व्ही., त्याच्या संशोधन पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या मूळ प्रती, त्त्याच्या पासपोर्टची एक प्रत आणि सध्या तो सेवेमध्ये असणाऱ्या संस्थेचे किंवा योग्य त्या प्रशासकीय व्यवस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडावी.


अंतिम मुदत:-
या पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २२ सप्टेंबर २०१३ आहे.


महत्वाचा दुवा :-


http://www.usda.gov/wps/portal/usda/usdahome



वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. २६ ऑगस्ट २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?