स्वित्झर्लंडमध्ये बायोमेडिकलमधील पीएचडी कार्यक्रम
स्वित्झर्लंडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल रिसर्च या संशोधन संस्थेने तिथल्याच बेसल विद्यापीठाच्या सहकार्याने बायोमेडिकल या विषयातील आंतरराष्ट्रीय पीएचडी कार्यक्रम राबवला आहे. पीएचडीसाठी प्रवेश व एकूण चार वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या दोन्ही संस्थांनी दि. १ मे २०१५ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल:
जैवविज्ञान या मुलभूत विज्ञानाच्या शाखेतील जागतिक दर्जाची जी काही प्रमुख संशोधन केंद्रे आहेत त्यांमधील एक म्हणजे स्वित्झर्लंडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल रिसर्च. स्टेम सेल्स, न्युरोबायोलॉजी व कॅन्सर या विषयांमधील जागतिक स्तरावरच्या प्रगत संशोधनासाठी मायशर इन्स्टिट्यूटचे नाव घेतले जाते.
अलीकडेच म्हणजे १९७० साली स्थापन झालेल्या या संशोधन संस्थेतील संशोधन पूर्णपणे स्वतंत्र पण एकमेकांशी समन्वय असलेल्या वेगवेगळ्या बावीस विभागांमध्ये चालते. याव्यतिरिक्त आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे सात तांत्रिक विभाग या बावीस विभागांच्या सर्व संशोधन कार्यक्रमांना अद्ययावत बनवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. म्हणूनच संस्थेला आज जैवविज्ञानातील मुलभूत व नाविन्यपूर्ण संशोधनासाठी असलेले एक सर्वोत्कृष्ट केंद्र अशी आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झालेली आहे.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी शंभर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएचडीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पीएचडी कार्यक्रमासह शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी चार वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीअंतर्गत या चार वर्षांदरम्यान शिष्यवृत्तीधारकाला सैद्धांतिक व उपयोजित संशोधनातील निशुल्क प्रशिक्षण दिले जाईल. तसेच चौथ्या वर्षाच्या अंतिम सत्रादरम्यान संशोधन प्रकल्पाचे मायशर इन्स्टिट्यूट व बेसल विद्यापीठातील एका स्वतंत्र तज्ञ प्रबंध समितीकडून परीक्षण केले जाईल व संशोधन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला बेसल विद्यापीठाची पीएचडी पदवी बहाल करण्यात येईल. दरम्यान, मायशर इन्स्टिट्यूटकडून चार वर्षांच्या या कालावधीकरता विद्यार्थ्याला त्याच्या मासिक भत्त्याच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाईल. मासिक भत्त्याची ही रक्कम स्विस राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशनच्या निकषांनुसार असल्याने निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीवर भरघोस अशीच असेल. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला इतर सर्व सोयी सुविधाही दिल्या जातील.
आवश्यक अर्हता :
या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार संबंधित विषय शाखांमधील पदव्युत्तर पदवीधर असावा. अर्जदाराची पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी आयइएलटीएस या इंग्रजी भाषेच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे पदवी स्तरावर प्रयोगशाळेतील किंवा तत्सम एखाद्या संस्थेतील संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र असावे.
अर्ज प्रक्रिया:
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या मायशर इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर जमा करावा. अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., सी.व्ही., त्याने पदवी अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, तसेच त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्यासर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती, त्याचे आयइएलटीएसचे गुणांकन, आरोग्य तपासणी अर्ज, संशोधन अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदारांचे अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया:
अर्जदाराची जैवविज्ञान किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन मुलाखतीसाठी त्याची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची २-३ जुलैच्या दरम्यान मुलाखत घेतली जाईल व त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
अंतिम मुदत:-
संस्थेकडून या अभ्यासक्रमासाठी वर्षातून दोनदा प्रवेश होत असल्याने दोन स्वतंत्र अंतिम मुदती आहेत. मे व नोव्हेंबर. प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची यावेळची अंतिम मुदत अंतिम मुदत दि. १ मे २०१५ आहे.
महत्वाचा दुवा :-
http://www.fmi.ch/
वरील लेख (स्वित्झर्लंडमध्ये 'जैववैद्यक' विषयात पीएच.डी.) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि.१३ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झाला.
Comments
Post a Comment