अमेरिकेत कला शाखेतील शिष्यवृत्ती



जागतिक स्तरावर कलाशाखा व सामाजिक शास्त्रांमधील गुणात्मक व अद्ययावत संशोधन करणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे अमेरिकेमधील गेटी संशोधन संस्था. कलाशाखा व समाजशास्त्रांचे संशोधन करणे आणि लेखन- संशोधनाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचणे व त्यातून या विद्याशाखांचे संवर्धन करणे या हेतूने प्रेरित असलेली ही संस्था लॉस एंजेलिसस्थित ‘द गेटी फाउंडेशन’कडून चालवली जाते. या विविध विद्याशाखांमधील गुणवंत व्यक्तींना त्यांच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्तपणे व कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक औपचारिकतेशिवाय मांडता याव्यात यासाठी दरवर्षी ठराविक आंतरराष्ट्रीय अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संबंधित विषयांतील अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. गेटी फाउंडेशनच्या या शिष्यवृत्तीला अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत दि. १ ऑक्टोबर २०१५ आहे.

शिष्यवृत्तीबद्दल:-

अमेरिकेत लॉस एंजेलिसमधील ‘द गेटी फाउंडेशन’ या संस्थेने कला क्षेत्र व सामाजिक शास्त्रांशी संबंधित इतर शाखांमधील उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. या पुढाकाराचाच एक भाग म्हणून ही संस्था या क्षेत्रांची उत्तम जाण व प्रचंड आवड असणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था ज्यांनी या क्षेत्राला योगदान देत त्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशांना आर्थिक पाठबळ देण्याचे कार्य करत असते. कला क्षेत्र किंवा लेखन क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना गेटी संशोधन संस्थेत या निवासी शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते.

या शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्तीधारकाच्या संशोधन-लेखन प्रकल्पाचा कालावधी तीन ते नऊ महिन्यापर्यंत असेल. प्रत्येक प्रकल्पाचा कालावधी हा त्या-त्या प्रकल्पावर किंवा त्यातील घटकांवर आधारित असेल. शिष्यवृत्तीधारकाला त्याचा प्रकल्प मुक्तपणे करता यावा व त्याच्या स्वत:च्या संकल्पना हव्या तशा राबवता याव्यात यासाठी संस्थेने या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची शैक्षणिक औपचारिकता ठेवलेली नाही. मात्र, शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून घेणे योग्य राहील. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला संस्थेकडून त्या कालावधीकरता ६५००० डॉलर्स वार्षिक वेतन मिळेल. यामध्ये संशोधन निधीचा समावेश असेल. तसेच इतर सोयीसुविधांमध्ये शिष्यवृत्तीधारकाला गेटी संशोधन संस्थेत एक कार्यालय, संस्थेच्या निवासस्थानामध्ये एक अपार्टमेंट, संशोधनासाठी एक सहाय्यक, आरोग्य विमा व येण्याजाण्याच्या विमानप्रवासाचे शुल्क आदी गोष्टी पुरवल्या जातील.

आवश्यक अर्हता :-

ही शिष्यवृत्ती कला, मानववंशशास्त्र व सामाजिक विज्ञानातील विविध विषयांशी निगडीत आहे. या विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर किंवा पीएचडीच्या स्तरावरील संशोधन करू इच्छिणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे किमान शैक्षणिक पात्रता असावी. ज्या त्या अभ्यासक्रमानुसार ही शैक्षणिक पात्रता संस्थेने त्यांच्या वेबसाईटवर नमूद केलेली आहे. अर्जदाराने स्वत:चा अर्ज उत्कृष्ट बनवण्यासाठी त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी (किंवा पदव्युत्तर) स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने टोफेल अथवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असावे.



अर्ज प्रक्रिया:-

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संस्थेच्या वेबसाईटवर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्याबद्दल माहिती देणारे ऑनलाईन माहिती पत्रक, स्वत:चा सी.व्ही., त्याला करावयाच्या असलेल्या त्याच्या विषयातील संशोधनाची थोडक्यात ओळख करून देणारा एक अहवाल (Research Proposal), तज्ञांची शिफारसपत्रे, शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात.

निवड प्रक्रिया:-

अर्जदाराची त्याच्या क्षेत्रातील गुणवत्ता लक्षात घेऊन निवड समिती त्याच्या अर्जाची निवड करेल व अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. त्या शिष्यवृत्तीधारकांना अंतिम मुदतीनंतर सहा महिन्यांच्या आत त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ ऑक्टोबर २०१५ आहे.

महत्वाचा दुवा :-

http://www.getty.edu/foundation/


वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत (कला व सामाजिक शास्त्रे अमेरिकेतील संशोधन शिष्यवृत्ती) दि.  ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाला.


























Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?