मेक्सिकोमध्ये आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती कार्यक्रम




मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या स्तरावरील शिक्षण मेक्सिकोमधील विद्यापीठांमध्ये घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
या  अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व शुल्क, मासिक वेतन व इतर संबंधित सुविधा असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील अर्जदारांकडून  दि. ३१ ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:
मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेली AMEXCID (The Mexican Agency for International Development Cooperation) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक,आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रातील परस्पर सहकार्य व त्यातून विकास या हेतूंनी कार्यरत असलेली संस्था म्हणून ओळखली जाते. अलीकडेच म्हणजे सप्टेंबर २०११ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. शैक्षणिक स्तरावर मेक्सिको व इतर देशांमध्ये आदानप्रदान व्हावी व त्यातून सहकार्य वाढीस लागावे यासाठी संस्थेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी विविध विषयांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मेक्सिकोतील विविध विद्यापीठांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या स्तरावरील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मेक्सिको व इतर देशांमध्ये विविध क्षेत्रांतील दीर्घकालीन संबंध रुजले जावेत हा या शिष्यवृत्तीचा प्रमुख हेतू आहे. जगातील एकूण १८० पेक्षाही जास्त देशांमधील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती कार्यक्रमात मेक्सिकोतील जवळपास सत्तर नामांकित संस्था सहभागी झाल्या आहेत.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या स्तरावरील संशोधन अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते. शिष्यवृत्तीचा कालावधी त्या–त्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती व इतर सुविधा मिळतील. शिष्यवृत्तीअंतर्गत या कालावधीकरता पदव्युत्तर शिष्यवृत्तीधारकाला दरमहा ८४१२ पेसो (मेक्सिकन चलन) तर पीएचडी शिष्यवृत्तीधारकाला साधारणतः १०५१५ पेसो एवढे विद्यावेतन मिळेल.  शिष्यवृत्तीच्या इतर सोयीसुविधांमध्ये शिष्यवृत्तीधारकाच्या अभ्यासक्रमाचे नोंदणी शुल्क व संपूर्ण शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती बहाल केल्यानंतर तिसऱ्या महिन्यापासून मेक्सिकन सरकारचा आरोग्य विमा, शिष्यवृत्ती कालावधीत एकदा विमानप्रवासाचा अधिभार इत्यादी गोष्टींचा समावेश असेल.
आवश्यक अर्हता :
या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील अर्जदार अर्ज करू शकतो. विज्ञान, तंत्रज्ञान तसेच सामाजिक शास्त्रांमधील विविध विषयांचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती पदवी, पदव्युत्तर व  पीएचडी अशा वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी असून त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतादेखील वेगवेगळ्या आहेत. अर्जदाराची अगोदरच्या शिक्षणक्रमात त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्याला किमान ८/१० जीपीए असावा.
 अर्ज प्रक्रिया:
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने स्वत:चा अर्ज पूर्ण करून त्याबरोबर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, तज्ञांची शिफारसपत्रेमागील शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती, अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. पूर्ण झालेला अर्ज अर्जदाराने त्याच्या देशातील मेक्सिकन दुतावासात जमा करावा. इमेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे अर्जदाराने अर्ज जमा करण्याचा प्रयत्न करू नये.
निवड प्रक्रिया:
अर्जदाराची त्याने निवडलेल्या विषयातील गुणवत्ता, आवड व त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल. तसेच त्याने निवडलेल्या क्षेत्राचा त्याच्या देशावर भविष्यात होणारा परिणाम हा निकष शिष्यवृत्ती निवडीमध्ये महत्वाचा असेल. अर्जदारांना निवडीबाबत नोव्हेंबर २०१५ पर्यंत कळवले जाईल.
अंतिम मुदत:- 
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्ट २०१५  आहे.
महत्वाचा  दुवा :-


वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत ( मेक्सिकोमध्ये आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती ) दि.
३ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?