फ्रान्समध्ये आंतरविद्याशाखीय पीएचडीसाठी पाठ्यवृत्ती


फ्रान्स सरकारच्या पुढाकाराने व LERMIT ह्या आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था आणि युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, सॅक्ले  यांच्या सहकार्याने मेडिकेशन व थेराप्युटीक्स या शाखांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे व त्यासाठी तेवढ्याच तोडीचे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी या संस्थाच्या वतीने पीएचडीसाठी पाठ्यवृत्ती देण्यात येते.  मेडिकेशन व थेराप्युटीक्स शाखांबरोबरच जैवविज्ञान, रसायनशास्त्रज व भौतिकशास्त्र या विद्याशाखांमधील अर्जदारांना मेडिकेशन व थेराप्युटीक्समधील आंतरविद्याशाखीय संशोधन करता यावे, हासुद्धा या पाठ्यवृत्तीचा एक हेतू असतो. ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरु होणाऱ्या पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. १ एप्रिल २०१६  पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत. 

पाठ्यवृत्तीबद्दल:

डिसेंबर २००९ मध्ये फ्रान्स सरकारने भविष्यातही देशाचा विकास दर असाच राहावा म्हणून संशोधन व शिक्षणासाठी जवळपास २२ बिलीयन युरो एवढ्या रकमेची तरतूद केली. या कार्यक्रमांतर्गत सरकारने २०११ मध्ये एकूण १०० संशोधन प्रकल्पांची निवड केली व या संपूर्ण कामाला  Laboratories of Excellence या नावाने ओळखले जाते. यापैकीच मेडिकेशन व थेराप्युटीक्स या शाखांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधन करणारी संशोधन संस्था म्हणजेच Laboratory of Excellence in Research on Medication and Innovative Therapeutics (LERMIT).  LERMIT ही एक आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था असून त्यात जगातील उत्कृष्ट दर्जाच्या जैववैद्यक, रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञांचा समावेश आहे. थेराप्युटीक्स हे आंतरविद्याशाखीय संशोधन क्षेत्र असल्याने या विविध विद्याशाखांमधील हे शास्त्रज्ञ एकत्र येऊन थेराप्युटीक्समधील विविध मार्गांचा धांडोळा घेण्याचे काम करत असतात. समाजाला नेहमीच भीती असलेले व सध्या मोठ्या प्रमाणात लागण झालेले आजार म्हणजे कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, आणि प्रतिकारशक्ती कमी करणारे रोग. या रोगांशी लढण्याचे बळ समाजात मेडिकेशन व थेराप्युटीक्समधील संशोधनाच्या माध्यमातून तयार करणे या हेतूने संस्थेचे अविरत कार्य चालू आहे. जगातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता देखील या कार्याकडे आकृष्ट व्हावी व या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जगाला भीती असलेल्या या रोगांवर तेवढेच सशक्त उपाय शोधले जावेत, या हेतूंनी LERMIT व युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, सॅक्ले  यांच्या सहकार्याने ही पीएचडीसाठी पाठ्यवृत्ती योग्य उमेदवारांना बहाल केली जाते. पाठ्यवृत्तीधारकाच्या पीएचडीसाठी संशोधन प्रकल्पाचा कालावधी तीन वर्षांचा असेल. पाठ्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याला त्याचा प्रकल्प पूर्ण करावा लागेल. या पाठ्यवृत्तीअंतर्गत अर्जदाराला त्याच्या विद्यापीठ किंवा संस्थेकडून दरमहा निवासी भत्ता,वेतन भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतील. संस्थेंकडून दिल्या जाणाऱ्या एकूण पीएचडी पाठ्यवृत्तींची संख्या संस्थेकडून सांगण्यात आलेली नाही. पाठ्यवृत्तीधारकाची पीएचडी अभ्यासक्रमाला ऑक्टोबर २०१६ पासून  सुरुवात होईल.

आवश्यक अर्हता :

ही पाठ्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन किंवा औद्योगिक व तत्सम  कोणताही अनुभव असेल, तर त्याला प्राधान्य दिले जाईल.  अर्जदाराने ते त्याच्या संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे फ्रेंच भाषेवर  प्रभुत्व असणे आवश्यक आहे. फ्रेंच भाषेतील परीक्षा उत्तीर्ण असल्याचे तसे पुरावे त्याला त्याच्या अर्जाबरोबर जोडावे लागतील. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

अर्ज प्रक्रिया:

या पाठ्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या वेबसाईटवर जमा करावा.  अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक  पार्श्वभूमीबद्दल व या पाठ्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याने केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन अहवाल (Research Proposal),  त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रेआतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक  ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयइएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे.  अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ञ मार्गदर्शकाला इमेलद्वारे संपर्क करू शकतो.

निवड प्रक्रिया:

या पाठ्यवृत्तीसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेत दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात आलेल्या अर्जांमधून छाननी करून ठराविक योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाते. त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठाच्या तज्ञ समितीकडून या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यातील हुशार व ध्येयवादी उमेदवारांची अंतिम निवड या पाठ्यवृत्तीसाठी  केली जाते. यावर्षीच्या पहिल्या टप्प्यातून निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. २५ मे २०१६ रोजी होतील.

अंतिम मुदत:- 

या पाठ्यवृत्तीसाठी पूर्ण झालेले अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. १ एप्रिल २०१६  आहे.

महत्वाचा  दुवा :-


वरील लेख (फ्रान्समध्ये आंतरविद्याशाखीय पीएचडीसाठी पाठ्यवृत्तीलोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत ७ मार्च २०१६ रोजी प्रकाशित झाला. 

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?