सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती


आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून जागतिक स्तरावर ओळख असलेले ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस)’ हे विद्यापीठ मुलभूत विज्ञान, आंतरविद्याशाखीय संशोधन व उपयोजित संशोधनातदेखील तेवढेच अव्वल आहे. या विद्यापीठाच्या एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे म्हणून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी या  विद्याशाखांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारांकडून दि. १५ मे २०१६  पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत. 

शिष्यवृत्तीबद्दल:

सिंगापूरमध्ये असलेले ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस)’ हे  विद्यापीठ सिंगापूरमधील  सर्वात मोठे  स्वायत्त व शासकीय विद्यापीठ आहे. १९०५ साली स्थापना झालेले हे विद्यापीठ सिंगापूरमधील जुने विद्यापीठ तर आहेच त्याशिवाय आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रथितयश दोन रॅंकिंग सिस्टम्स म्हणजे क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग्ज व टाइम्स हायर  एज्युकेशन रॅंकिंग्ज, या दोन्ही संस्थांनी गेली कित्येक वर्षे ( व २०१५-१६ या वर्षीदेखील) या विद्यापीठाला आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून गौरवले आहे. क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग्जनुसार , (२०१५-१६ ) या वर्षी एनयुएस हे जगातील बाराव्या क्रमांकाचे तर  टाइम्स हायर  एज्युकेशन रॅंकिंग्जच्या यादीमध्ये यावर्षी या विद्यापीठाला जगात २६ व्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून निवडलेले आहे. प्रत्येक विषयाच्या भरपूर उपशाखा व त्यामध्ये चाललेले  एकूणच उत्तम दर्जाचे व अद्ययावत असे संशोधन, उत्कृष्ट प्राध्यापकवर्ग, सुसज्ज  अशा आधुनिक संगणकीकृत प्रयोगशाळा  व प्रत्येक पदवीनंतर विद्यार्थ्यांना जगातल्या नामांकित बहुराष्ट्री कंपन्यांबरोबर काम करण्याची मिळणारी संधी ही कारणे अर्थातच विद्यापीठाला जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनवण्यास पुरेशी आहेत. एनयुएस विद्यापीठात विविध विभांगाकडून पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम राबवण्यात येतात. संबंधित शिष्यवृत्ती ही विद्यापीठाच्या  एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी (NUS Graduate School for Integrative Sciences and Engineering) या विभागाच्या वतीने विद्यार्थ्याला बहाल करण्यात येते. फक्त आशिया खान्दातील्च नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता या विभागाकडे आकृष्ट करता यावी यासाठी विद्यापीठाने ही शिष्यवृत्ती सुरु केलेली आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पीएचडीच्या संशोधनाचा कालावधी चार वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून या चार वर्षांसाठी मासिक भत्ता दिला जाईल. तसेच पीएचडीच्या या कालावधीकरता संपूर्ण  ट्युशन फी दिली जाईल. शिष्यवृत्तीधारकाला दरमहा तीन हजार सिंगापूर डॉलर्स एवढा निवासी व वेतन भत्ता देण्यात येईल. याव्यतिरिक्त त्याला विमा भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील.शिष्यवृत्तीधारकाला ही शिष्यवृत्ती पीएचडीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी फक्त चार वर्षांसाठीच उपलब्ध असेल. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही व अर्ध्यातच त्याला ही शिष्यवृत्ती सोडून जाता येणार नाही. त्याला पीएचडी पूर्ण करणे बंधनकारक राहील.

आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराकडे तो ज्या विषयात पीएचडी करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी असावी. पदव्युत्तर स्तरावर अर्जदाराकडे किमान उच्च द्वितीय श्रेणी असावी असे जरी विद्यापीठाला अपेक्षित असले तरीही अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन अनुभव असेल, तर त्याला पीएचडीसाठी प्राधान्य दिले जाते. अर्जदाराने संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी जीआरई  व टोफेल ह्या परीक्षा दिलेल्या असाव्यात. कारण या शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाने अर्जदारास या परीक्षांचे गुण विद्यापिठास कळवणे बंधनकारक केलेले आहे. तसेच, त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने त्याच्या संशोधनाच्या विषयाची उपलब्धता विद्यापीठाच्या वेबसाईटवर तपासावी. 

अर्ज प्रक्रिया:
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज विहित नमुन्यात ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर अंतिम मुदतीपूर्वी जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याचे जीआरईचे गुण, तसेच टोफेल किंवा आयइएलटीएस या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस्, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही.लघु संशोधन अहवाल, प्रकाशित केली असल्यास शोधनिबंधांच्या प्रती,तज्ञांची शिफारसपत्रे,ट्रान्सक्रिप्ट्स् व कार्य अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच, अर्जदाराने पूर्ण झालेल्या अर्जाची प्रिंट घेऊन त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वतंत्रपणे विद्यापीठाकडे पोस्टाने किंवा आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेने जमा करावीत.   

निवड प्रक्रिया:

अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व त्याची संशोधनाची आवड लक्षात घेऊन निवड समितीकडून त्याची अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ईमेलने कळवले जाईल. अर्जदाराचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम अधिकार विद्यापीठाकडे असेल.

अंतिम मुदत:- 

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १५ मे २०१६  आहे.

महत्वाचा  दुवा :-

                                                                              


वरील लेख (सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीलोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत २८ मार्च २०१६ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?