ऑक्सफर्डमध्ये शिकण्याची संधी



जगद्विख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातील सर्व विद्याशाखांच्या पदव्युत्तर विभागांकडून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विकसनशील देशांमधील हुशार व उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या अर्जदारांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासहित शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७-१८ साठी दिल्या जाणाऱ्या या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. ६ जानेवारी २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:

जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर खाद्य उत्पादनांची कमतरता भविष्यात सर्वत्र भासणार  आहे व त्यामुळेच आजमितीस होणाऱ्या या खाद्य उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन विकसनशील देशांतून वाढीस लागावे व त्यातून भविष्यातल्या वाढत्या लोकसंख्येच्या खाद्य आवश्यकतांची पूर्तता व्हावी या हेतूने लुईस द्रेफस फाउंडेशन गेली अनेक वर्षे सातत्याने विकसनशील देशांमधील कृषी व अन्न सुरक्षा या विषयांवर काम करत आहे. फाउंडेशनकडून या व अशा अनेक समस्यांचा वेध घेत असतानाच फक्त कृषी व अन्न सुरक्षाच नव्हे तर  आरोग्य, पर्यावरण, जल व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शासकीय योजना, परराष्ट्र योजना या व  इतर अनेक विषयांवर अशा प्रकारचे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार व्हावे अशी गरज निर्माण होताना दिसू लागली. भविष्यात या विषयांवर काम करणारे नेतृत्व तयार व्हावे व ऑक्सफर्डमधील घेतलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची व त्यांच्या निश्चित केलेल्या क्षेत्राची योग्य सांगड घालता यावी अशा प्रयोजनाने लुईस द्रेफस फाउंडेशनने ही शिष्यवृत्ती लुईस द्रेफस-वेनफेल्ड शिष्यवृत्तीया नावाने सुरु केलेली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संपूर्ण शिक्षण शुल्क विद्यापीठाकडून दिले जाणार आहे. त्याशिवाय शिष्यवृत्तीधारकाला भोजन, निवास व इतर आवश्यक खर्चांसाठी मासिक वेतनाच्या स्वरुपात निधी देण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत त्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी त्याला बहाल केली जाणार आहे.

आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती विकसनशील देशांतील सर्व अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन किंवा तत्सम कोणताही अनुभव असेल, तर त्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने ते त्याच्या संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्जदाराकडे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर मायदेशात परत येऊन निवडलेल्या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ काम करण्याची योजना तयार असावी, ही फाउंडेशनच्या आवश्यक अर्हतांपैकी एक प्रमुख अर्हता आहे.

अर्ज प्रक्रिया:

या शिष्यवृत्तीसाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकाच अर्ज असल्याने अर्जदाराने त्याचा अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून जमा करावा. अर्ज जमा करताना त्याबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एस..पी., त्याचा सी.व्ही., त्याने केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन अहवाल,  त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या तीन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व  शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयइएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे. अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विभागातील किंवा विषयातील प्राध्यापकांना इमेलद्वारे संपर्क करू शकतो. अर्जासह अर्जदाराने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेली एक प्रश्नावली सोडवून त्याच्या उत्तरांसहित जमा करावी.

निवड प्रक्रिया:

फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना मे २०१७ पर्यंत कळवण्यात येईल.   

अंतिम मुदत:- 

या शिष्यवृत्तीसाठी पूर्ण झालेले अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. ६ जानेवारी २०१७ ही आहे.

महत्वाचा  दुवा :-


वरील लेख (ऑक्सफर्डमध्ये शिकण्याची संधी) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत १७ डिसेंबर २०१६ रोजी प्रकाशित झाला.


Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?