बिझनेस स्कूलमध्ये पीएचडीची संधी

लीड्स विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलकडून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाशी संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. पीएचडीसाठी प्रवेश व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर अर्जदार अर्ज करू शकतो. पात्र अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी दि. १ जून २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:

इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमधील लीड्स शहरात वसलेले लीड्स विद्यापीठ हे युरोपमधील एक प्रमुख विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही युरोप व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कुल्स् पैकी एक आहे. लीड्स बिझनेस स्कूलकडून  पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात. या विभागाचा एमबीएचा अभ्यासक्रम हा जगातल्या नामांकित १०० अभ्यासक्रमांपैकी एक आहे. १९९७ साली स्थापना झालेल्या या विभागामध्ये सर्व अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास तीन हजार विद्यार्थी आहेत. तब्बल ऐंशीपेक्षाही जास्त वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये जास्त आहे.लीड्स बिझनेस स्कूलकडून दिली जाणारी ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना खुली आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिष्यवृत्तीधारकास पीएचडी अभ्यासक्रम हा पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पूर्ण करता येऊ शकतो. पूर्णवेळ पीएचडी अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा तर अर्धवेळ अभ्यासक्रमाचा पाच वर्षांचा आहे.  शिष्यवृत्तीधारकाच्या पहिल्या वर्षातील संशोधन गुणवत्तेवर दुसऱ्या वर्षाची शिष्यवृत्ती अवलंबून असेल व हाच निकष पुढील सर्व वर्षांसाठी लागू असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाचे शिक्षण शुल्क देण्यात येईल. याव्यतिरिक्त त्याला इतर कोणतीही आर्थिक मदत विद्यापीठाकडून दिली जाणार नाही.

आवश्यक अर्हता:

लीड्स बिझनेस स्कूलच्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पीएचडीच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर अर्जदार अर्ज करू शकतो. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असावी. अर्जदाराने पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी व पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी तरी मिळवलेली असावी. अर्जदार संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधर असावा व त्याने पीएचडीसाठी इतर कुठेही अर्ज केलेला नसावा. त्याला इंग्रजी भाषेचे उत्कृष्ट ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पातळीवर अर्जदाराचे तो पीएचडीसाठी निवडणार असलेल्या विषयाशी निगडीत संशोधन असावे. एखाद्या संशोधन संस्थेतील तशा संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र असलेले उत्तम. तसेच अर्जदाराने आयइएलटीएस किंवा टोफेलमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया:

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने सर्वप्रथम लीड्स बिझनेस स्कूलच्या पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा जेणेकरून अर्जदाराचा आयडी क्रमांक तयार होईल. आयडी क्रमांकाशिवाय पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.विद्यापीठाचा पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज व शिष्यवृत्ती असलेला अर्ज स्वतंत्र आहेत हे लक्षात घेऊन अर्जदाराने शिष्यवृत्तीचा अर्ज स्वतंत्रपणे भरावा. अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे  एस..पी., सी.व्ही., त्याला करायच्या असलेल्या संशोधनाचा २००० शब्दांतील लघु संशोधन प्रबंध, तसेच त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या  सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती, त्याचे जीआरई किंवा आयइएलटीएसचे गुणांकन, संशोधन अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात.

निवड प्रक्रिया:

अर्जदाराची त्याने निवड केलेल्या संशोधन विषयातील गुणवत्ता लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल.

अंतिम मुदत:- 

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ जून २०१७  ही आहे.

महत्वाचा दुवा :-



वरील लेख (बिझनेस स्कूलमध्ये पीएचडीची संधी) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत ३१ डिसेंबर २०१६ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?