डेन्मार्कमध्ये पीएचडीचे धडे गिरवा!
डेन्मार्कमधील
कोपेनहेगन विद्यापीठाकडून कला विद्याशाखेतील विविध विषयांसाठी पीएचडीचे उच्चशिक्षण
घेऊ इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी
विद्यार्थ्यांने विद्यापीठांत स्वतंत्रपणे प्रवेश घ्यायचा असतो. त्यासाठी त्याला
प्रवेश शुल्क व इतर सर्व सोयीसुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात, असे या शिष्यवृत्ती
कार्यक्रमाचे ढोबळ स्वरूप आहे. कला शाखेतील कोणत्याही विषयामध्ये पदव्युत्तर
अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या विद्यापीठाने २२
जानेवारी २०१७ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल:-
कोपेनहेगन
विद्यापीठ हे डेन्मार्कमधील सर्वात जुने विद्यापीठ आहे. विद्यापीठाची स्थापना १४७९
मध्ये झालेली आहे. पीएचडीपर्यंतच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही पन्नास
हजारांच्या घरात जाते. विद्यापीठाचे एकूण चार कॅम्पस आहेत. यातील प्रमुख कॅम्पस
कोपेनहेगन शहरात आहे. विद्यापीठाचे बहुतांश अभ्यासक्रम हे डॅनिश भाषेत शिकवले जात
असून काही अभ्यासक्रम हे इंग्रजी व जर्मन भाषेतही उपलब्ध आहेत. कोपेनहेगन
विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी अनेक जण हे ‘नॉर्डिक
कंट्रीज’ म्हणजेच
फिनलॅण्ड, आइसलॅण्ड, नॉर्वे व स्वीडन या
जवळच्या देशांतील असतात. २०१६च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार या विद्यापीठाचा
समावेश पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये केलेला आहे. ‘अॅकॅडमिक रँकिंग्ज ऑफ
वर्ल्ड युनिव्हर्सिटीज’ या संस्थेने कोपेनहेगन विद्यापीठाला जगातल्या तिसाव्या क्रमांकाचे
विद्यापीठ म्हणून तर क्यूएस वर्ल्ड रँकिंगने जगातल्या ६८व्या क्रमांकाचे विद्यापीठ
म्हणून गौरवले आहे. विद्यापीठात आरोग्य व वैद्यकीय, कला शाखा, कायदा, मूलभूत व उपयोजित विज्ञान, सामाजिक शास्त्रे व तत्त्वज्ञान
हे सर्व प्रमुख विभाग असून, वेगवेगळ्या विषय व विद्याशाखांचा समावेश या सर्व विभागांतर्गत होतो.
कोपेनहेगन विद्यापीठाकडून दिली जाणारी संबंधित शिष्यवृत्ती ही कलाशाखेतील विविध
विषयांतील पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिली जाते. ‘लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन
सायन्सेस’, ‘आर्ट्स अॅण्ड कल्चरल स्टडीज’, ‘क्रॉसकल्चरल अॅण्ड रिजनल स्टडीज’ इत्यादी विषयांतर्गत
येणाऱ्या विविध इतर विषयांमध्ये पीएचडी पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाकडून ही
शिष्यवृत्ती दिली जाते. कोपेनहेगन विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींची
एकूण संख्या १६ एवढी आहे. पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या
शिष्यवृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा असून शिष्यवृत्तीधारकाला त्याचा अभ्यासक्रम
दि. १ सप्टेंबर २०१७ पासून सुरू करता येईल. शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित
कालावधीतच त्याला त्याचा प्रकल्प पूर्ण करावा लागेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत
अर्जदाराला त्याच्या विद्यापीठ किंवा संस्थेकडून दरमहा निवासी भत्ता, वेतन भत्ता, प्रवास भत्ता व
संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतील.
आवश्यक अर्हता:-
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार
कला शाखेतील पदव्युत्तर पदवीधर असावा. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधनाचा
अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने अर्जासहित त्याच्या
संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तिपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर
शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजी आणि जर्मन भाषेवर
प्रभुत्व असणे आवश्यक आहे. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या
इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. तसेच त्याने जीआरई ही परीक्षा
उत्तम गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी
यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.
अर्ज प्रक्रिया:-
या
शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून
दुव्यामध्ये दिलेल्या संकेतस्थळावर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने
अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड
का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, त्याने करायच्या असलेल्या
संशोधनाचा कमाल १२,००० शब्दांमध्ये लघू संशोधन अहवाल (Research
Proposal), त्याच्या
शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची
शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी
गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या
परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे.
अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा
अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकाला
ईमेलद्वारे संपर्क करू शकतो.
निवड प्रक्रिया:-
कोपेनहेगन विद्यापीठाच्या या शिष्यवृत्तीला निवड होण्यासाठी
अर्जदाराने विद्यापीठाच्या वर उल्लेख केलेल्या विभागांमधील उपलब्ध असलेल्या
कोणत्याही विषयांमध्ये पीएचडीचा विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेली असावी. तशी
नोंदणी न केलेले विद्यार्थी हे शिष्यवृत्तीस अपात्र राहतील.
महत्त्वाचा दुवा:-
अंतिम
मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी २०१७ ही आहे.
वरील लेख (डेन्मार्कमध्ये पीएचडीचे धडे गिरवा!) लोकसत्ताच्या
करिअर वृत्तांत या पुरवणीत १४ जानेवारी २०१७ रोजी प्रकाशित झाला.
Comments
Post a Comment