मेरी डिग्री है जापानी!
जपानमधील केओ विद्यापीठाकडून ‘ग्लोबल
इन्फॉर्मेशन अँड गव्हर्नंन्स अॅकॅडमिक’ (GIGA) या
कार्यक्रमांतर्गत प्रशासन कौशल्य,पर्यावरण अभ्यास आणि माहिती-तंत्रज्ञान या
तिन्हींचा एकत्रित समावेश असलेल्या पदवी अभ्यासक्रमासाठी म्हणजेच ‘बॅचलर ऑफ आर्ट्स
इन एन्व्हायर्नमेंट अँड इन्फॉर्मेशन स्टडीज’ या पदवीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्याला प्रवेश व प्रवेश
शुल्कासहित इतर सर्व सोयीसुविधा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. कोणत्याही शाखेतील
बारावी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांकडून या विद्यापीठाने दि.१३ फेब्रुवारी २०१७ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल:-
केओ विद्यापीठ हे जपानमधील सर्वात जुने विदयापीठ आहे. टोकियोतील
मिनॅटो या उपनगरात वसलेल्या या विद्यापीठाची
स्थापना १८५८ साली झालेली असून
विद्यापीठात साहित्य, अर्थशास्त्र, कायदा, व्यवसाय
आणि वाणिज्य, वैद्यकशास्त्र, विज्ञान
आणि तंत्रज्ञान, धोरण व्यवस्थापन, पर्यावरण
आणि माहिती अभ्यास, नर्सिंग व फार्मसी या सर्व विद्याशाखांतील
पदवी ते पीएचडीपर्यंतचे
अभ्यासक्रम उपलब्ध
आहेत. २०१६
च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार तीनशे क्रमांकाचे असलेले केओ विद्यापीठ हे
जपानच्या ‘ग्लोबल ३०’ या ध्येयवादी प्रकल्पातील एक महत्वाचे विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे
बहुतांश अभ्यासक्रम हे जपानी व इंग्रजी भाषेत शिकवले जात असून या कार्यक्रमांतर्गत
असलेला अभ्यासक्रम हा इंग्रजीमध्ये असेल. केओ
विद्यापीठाकडून दिली जाणारी ही शिष्यवृत्ती कलाशाखेअंतर्गत पर्यावरण व माहिती
तंत्रज्ञान या विषयातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिली जाते. शिष्यवृत्तीधारकाला त्याचा हा पदवी
अभ्यासक्रम इंग्रजीत पूर्ण करावयाचा असून याचा कालावधी चार वर्षांचा आहे. विद्यापीठाने
सप्टेंबर
२०११ मध्ये पर्यावरण व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून आंतरराष्ट्रीय
विद्यार्थ्यांसाठी प्रशासन कौशल्य,पर्यावरण अभ्यास आणि माहिती-तंत्रज्ञान या तिन्हींचा
एकत्रित समावेश असेल, असा एक पदवी अभ्यासक्रम सुरु केला. सप्टेंबर २०१५ मध्ये मग
याच अभ्यासक्रम व शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे नाव बदलून ‘ग्लोबल इन्फॉर्मेशन अँड
गव्हर्नंन्स अॅकॅडमिक (GIGA)
कार्यक्रम’ असे करण्यात आले. शिष्यवृत्तींची एकूण संख्या विद्यापीठाने नमूद केलेली
नाही. पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या
शिष्यवृत्तीचा कालावधी एका वर्षांचा असून शिष्यवृत्तीधारकाला त्याची पुढील वर्षाची
शिष्यवृत्ती ही अगोदरच्या वर्षीच्या गुणांवर अवलंबून राहील. त्याचा अभ्यासक्रम
सप्टेंबर २०१७ पासून सुरु करता येईल. या शिष्यवृत्तीअंतर्गत अर्जदाराला विद्यापीठाकडून अभ्यासक्रमाचे
संपूर्ण शिक्षण शुल्क, दरमहा भोजन-निवास व इतर खर्चांसाठी आवश्यक
किरकोळ रक्कम वगैरे सुविधा देण्यात येतील.
आवश्यक अर्हता:-
ही शिष्यवृत्ती फक्त परदेशी अर्जदारांसाठी खुली आहे. या
शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे कोणत्याही प्रकारचे जपानी नागरिकत्व
नसावे. अर्जदार चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण असणारा व पदवीच्या पहिल्या
वर्षासाठी प्रवेश घेणारा असावा. अर्जदाराचे किमान वय
अठरा असावे. अर्जदाराची बारावीपर्यंतची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजी
आणि जपानी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. भारतातील अर्जदारांनी टोफेल, आयइएलटीएस, युनेट (UNATE), आईकेन (EIKEN) या इंग्रजीच्या परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. तसेच त्याने सॅट ही परीक्षा जर दिलेली असेल
तर विद्यापीठास या परीक्षेचे गुण कळवावेत. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.
अर्ज प्रक्रिया:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन
अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संकेतस्थळावर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक
पार्श्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी
याबद्दल माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित
असलेल्या दोन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, इयत्ता
बारावीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने टोफेल किंवा आयइएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे.
अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. १३ फेब्रुवारी २०१७ ही आहे.
विद्यापीठाचे
संकेतस्थळ :-
वरील लेख (मेरी डिग्री है जापानी!) लोकसत्ताच्या
करिअर वृत्तांत या पुरवणीत २८ जानेवारी
२०१७ रोजी प्रकाशित
झाला.
Comments
Post a Comment