ग्रीसमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती



ग्रीस दूतावासाकडून विदेशी नागरिकांसाठी हेलेनिक (ग्रीक) शासकीय शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सर्व विद्याशाखांसाठी पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असून या वर्षीच्या म्हणजे २०१३-१४ च्या शैक्षणिक प्रवेशासहित दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी विदेशी नागरिकांकडून दुतावासाने दि.२६ जुलै २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:-

ग्रीस शासनाच्या शैक्षणिक मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली  State Scholarship Foundation नावाची एक संस्था आहे, ज्याला ग्रीक भाषेत IKY असं म्हटलं जातं. IKY ची संबंधित शिष्यवृत्ती जरी सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली असली तरी संस्थेने त्यासाठी अर्जदारांना दोन गटांमध्ये विभागले आहे. या गटांना संस्थेने टार्गेट १ व टार्गेट २ अशी नावे दिलेली आहेत. शिष्यवृत्तींची एकूण संख्या ३० असून त्यातील १५ शिष्यवृत्त्या टार्गेट १ गटाला म्हणजेच बाल्कन देश, पूर्वेकडील युरोपियन राष्ट्रे, आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका या खंडांमधील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत तर उर्वरित पंधरा शिष्यवृत्त्या युरोपियन युनियनची सदस्य राष्ट्रे,नॉर्वे, स्वित्झर्लंड, यूएसए, कॅनडा, जपान या टार्गेट २ गटामधील राष्ट्रांच्या अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत.  ही शिष्यवृत्ती कोणत्याही शाखेतील अर्जदाराला त्याच्या पुढील उच्च शिक्षणासाठी (पदव्युत्तर, पीएचडीच्या आणि पोस्टडॉक्टरल  अभ्यासक्रमांसाठी ) लागू आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदारांना ग्रीसमधील कोणत्याही विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. या शिष्यवृत्तीचा कालावधी एक वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीप्राप्त उमेदवाराला सुरुवातीला निवासासाहित इतर खर्चासाठी साठ हजार युरो एवढी रक्कम दिली जाते. यामध्ये त्याच्या ट्युशन फीचा समावेश आहे. संस्थेकडून उमेदवारास मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीचे भवितव्य विद्यार्थ्याच्या अगोदरच्या वर्षाच्या निकालावर अवलंबून असेल.

आवश्यक  अर्हता :-

संस्थेच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदार परदेशी नागरिक असावा. महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे फक्त एकाच देशाचं नागरिकत्व असावं (म्हणजे ग्रीस व त्याचा देश अशा दोन देशांचं दुहेरी नागरिकत्व त्याच्याकडे नसावं). या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराकडे विद्यापीठातील किमान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराचे इंग्रजी किंवा फ्रेंच या दोन्हींपैकी एका भाषेवर प्रभुत्व असावे. तसेच त्याला यापूर्वी कधीही IKY किंवा इतर कोणत्याही ग्रीक संस्थेची अथवा सरकारची कोणतीही शिष्यवृत्ती मिळालेली नसावी. अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय ३५ पेक्षा जास्त असू नये.

अर्ज प्रक्रिया:

संस्थेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांनी त्यांचा अर्ज त्यांच्या देशातील ग्रीक एम्बसीमध्ये जमा करावा. या अर्जासोबत अर्जदाराला त्याचे शिक्षण व शिक्षणेतर उपक्रम इत्यादी बाबींची माहिती देणारा सी.व्ही., नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या अनुभवाचे  प्रशस्तीपत्र, दोन शैक्षणिक तज्ञांची शिफारसपत्रे, अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रतेची म्हणजेच पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सर्व ट्रान्सक्रिप्ट्स् , अर्जदाराचे इंग्रजी किंवा फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व दाखवणारे प्रशस्तीपत्र आणि पीएचडी किंवा पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला त्याचा संशोधन प्रबंध ( Research Thesis)  इत्यादी कागदपत्रे जोडावी लागतील

अंतिम मुदत:- 

अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २६ जुलै २०१३ आहे.   


महत्वाचा दुवा :-
http://www.iky.gr/


वरील लेख (ग्रीसमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीलोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि.१५ जुलै२०१३ रोजी प्रकाशित झाला.



Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?