जपानमध्ये स्पेस सायन्समधील पाठ्यवृत्ती


अंतराळविज्ञानातील (Space Science) जागतिक स्तरावरील जपानस्थित दोन प्रख्यात संशोधन संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅण्ड अॅस्ट्रॉनॉटीकल सायन्सेस’ (ISAS) आणि ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (JAXA) यांच्याकडून संयुक्तपणे जपानमध्ये अंतराळविज्ञानातील विविध विद्याशाखांमध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाते. स्पेस सायन्समध्ये जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ही पाठ्यवृत्ती ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’(ITYF) या नावाने ओळखली जाते. दोन्ही संस्थांनी २०१३ साठी देण्यात येणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत.


पाठ्यवृत्तीबद्दल:-


२००९सालापासून ISAS आणि JAXA यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’ (ITYF)ही पाठ्यवृत्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्तेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जपानने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे असे म्हणावे लागेल. विख्यात अशा दोन संशोधन संस्थांचे पाठबळ जरी ITYF ला असले तरी मुख्यत्वे ही पाठ्यवृत्ती ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (JAXA) कडून दिली जाते आणि पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅण्ड अॅस्ट्रॉनॉटीकल सायन्सेस’ (ISAS) मध्ये अंतराळविज्ञानातील विविध विद्याशाखांमध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्याची संधी मिळते. ITYF सारख्या जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून जपानच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये एक सकारात्मक परिणामकारकता निर्माण करणे हा उपरोक्त दोन्ही संस्थांचा हेतू आहे. JAXA ची ही पाठ्यवृत्ती मार्च २०१४मध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आहे. पाठ्यवृत्तीचा कालावधी तीनवर्षाचा असून पाठ्यवृत्तीधारकाच्या गुणवत्तेवर तो आणखी दोन वर्षासाठी (म्हणजे एकूण पाच वर्षांसाठी) वाढू शकतो. तसेच, पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला या संपूर्ण कालावधीसाठी दरमहा साधारणपणे ७,५०,००० येन एवढे वेतन दिले जाईल. तसेच संशोधनाच्या एकूण कालावधीसाठी संस्थेकडून पंचवीस लाख येन एवढा ‘संशोधन निधी’(Research Fund) दिला जातो, ज्यामध्ये संशोधनाशी संबंधित सर्व खर्चाचा समावेश आहे. अर्जदाराला विमा व इतर सामाजिक भत्तादेखील दिला जाईल.



आवश्यक अर्हता :-


ही पाठ्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या पाठ्यवृत्तीसाठी अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील पी.एच.डी. अथवा समकक्ष पदवी असावी. तसेच, त्याच्याकडे आठ वर्षांपेक्षा कमी कालावधीचा पोस्टडॉक्टरल संशोधनाचा अनुभव असावा. अर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराचे जपानी भाषेवर प्रभुत्व असले तर उत्तमच अन्यथा त्याला संस्थेच्या आवारात जपानी भाषेचे प्रशिक्षण उपलब्ध केले जाईल.



अर्ज प्रक्रिया:


या पाठ्यवृत्तीसाठी अर्जदाराला त्याच्या अर्जाबरोबर त्याचे एस.ओ.पी.(Statement of Purpose), आवडीनिवडी, छंद, शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभवइत्यादी बाबींनी सज्ज असा सी.व्ही., आतापर्यंतच्या त्याच्या संशोधनाची थोडक्यात मांडणी व त्याबरोबरच भविष्यातील त्याची स्वत:च्या संशोधनाची रूपरेषा आणि त्याच्या प्रकाशित झालेल्या आतापर्यंतच्या सर्व शोधनिबंधांच्या प्रती जोडाव्या लागतील. याबरोबरच अर्जदाराने त्याच्या अर्जात अर्जप्रक्रियेचा एक भाग म्हणून त्यालाशिफारसपत्रे देणाऱ्या तीन तज्ञांचे इ-मेल आयडीज नमूद करावेत. हे तीन तज्ञ त्याच्यासंशोधन पार्श्वभूमीशी संबंधित असावेत आणि त्यांनी त्यांची शिफारसपत्रे अर्जदाराच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय थेट संस्थेच्या ITYF2013@jaxa.jp या इ-मेल आयडीवर मेल करावीत. अर्जदाराने अर्जासाहित त्याची ही सर्व कागदपत्रे संस्थेच्या पत्त्यावर आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेतर्फे पाठवून द्यावीत. पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कळवण्यात येईल.


अंतिम मुदत:-
या पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्ट २०१३ आहे.


महत्वाचे दुवे:-


www.isas.jaxa.jp


ITYF2013@jaxa.jp.


वरील लेख लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. २९ जुलै२०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?