आशिया फाऊंडेशनची पाठय़वृत्ती



अाशिया खंडातील देशांमध्ये असलेल्या विविध समस्यांवर काम करणाऱ्या युवावर्गाला या समस्यांविषयक सखोल ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्यांच्यातील नेतृत्व कौशल्ये विकसित व्हावीत या हेतूने ‘आशिया फाऊंडेशन विकास पाठय़वृत्ती’ ही पाठय़वृत्ती दिली जाते. एकविसाव्या शतकात भारतासह इतर आशियाई देशांना भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर काम करणाऱ्या उमेदवारांकडून तसेच इतर क्षेत्रांतील अर्जदारांकडून या पाठय़वृत्तीसाठी १ डिसेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पाठय़वृत्तीबद्दल:

कृतिशील व विकसनशील आशिया खंडाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या संस्थांपकी आशिया फाऊंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. १९५४ साली स्थापना झालेल्या या संस्थेने विविध शासकीय-स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नेतृत्व आणि संस्थात्मक विकास आणि धोरण संशोधन या क्षेत्रांमध्ये भरीव काम केले आहे. ही संस्था गेली सहा दशके आशिया खंडातील देशांना भेडसावणाऱ्या कायदा-प्रशासन, आíथक विकास, महिला सबलीकरण, पर्यावरण आणि प्रादेशिक सहकार्य या गंभीर मुद्दय़ांवर कार्यरत आहे. आशिया फाऊंडेशनचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे असून संस्थेने आशिया खंडातील एकूण १८ देशांमध्ये कार्यालयांचे जाळे विणले आहे. त्याव्यतिरिक्त फाऊंडेशनचे एक कार्यालय वॉिशग्टन येथेही आहे. सध्या फाऊंडेशनचे व्यवस्थापन खासगी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विश्वस्तांकडून केले जाते.

या पाठय़वृत्तीअंतर्गत अर्जदाराला संस्थेकडून दरमहा निवासी भत्ता, वेतन भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतील. याशिवाय पाठय़वृत्तीमध्ये पाठय़वृत्तीधारकाच्या अभ्यासक्रमातील सर्व खर्चाचा, तसेच विमानप्रवास, स्थानिक वाहतूक, व्हिसा शुल्क आणि आरोग्य व अपघात विमा यांच्या खर्चाचा समावेश आहे. याबरोबरच अभ्यासक्रमादरम्यान पाठय़वृत्तीधारकाला व्यक्तिगत- व्यावसायिक विकास योजनांसाठी पाच हजार अमेरिकी डॉलर रकमेचे बक्षीस दिले जाईल. संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या एकूण पाठय़वृत्तींची संख्या १२ आहे. पाठय़वृत्तीधारकाच्या प्रकल्पाचा कालावधी एक वर्षांचा असेल. या पाठय़वृत्तीमध्ये पाठय़वृत्तीधारकाने अर्ज केलेल्या क्षेत्रातील लघु अभ्यासक्रम, आशिया आणि अमेरिकेतील अभ्यास दौरे व विविध परिषदांचा समावेश असेल. विशेष म्हणजे ही पाठय़वृत्ती अर्धवेळ असून पाठय़वृत्ती कार्यक्रमात सहभागी असताना पाठय़वृत्तीधारक वर्षभर त्याच्या नोकरी- व्यवसायात सहभागी होऊ शकेल.

आवश्यक अर्हता:

‘आशिया फाऊंडेशन विकास पाठय़वृत्ती’ पाठय़वृत्ती सर्व आशियाई अर्जदारांसाठी खुली आहे. या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने फाऊंडेशन काम करत असलेल्या- कायदा-प्रशासन, आíथक विकास, महिला सबलीकरण, पर्यावरण आणि प्रादेशिक सहकार्य यांपकी कोणत्याही एका क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले असावे. त्या कामाचा संबंधित क्षेत्रावर लक्षणीय परिणाम झालेला असावा. अर्जदाराचे चारित्र्य उत्तम असावे. त्याचे कार्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय एकात्मतेस हातभार लावणारे असावे. अर्जदाराचे व्यक्तिमत्त्व विवेकी, वचनबद्ध व समाजातील प्रेरणादायी नेतृत्वाच्या स्वरूपातील असावे. अर्जदाराचे वय ४० पेक्षा कमी असावे तसेच त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया:

या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये नमूद केलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने त्याच्या संबंधित कार्याच्या पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, त्याने केलेल्या कामाची संपूर्ण माहिती देणारी लघुचित्रफीत, त्याच्या कामाच्या पाश्र्वभूमीशी परिचित असलेल्या दोन नामवंत व्यक्तींची शिफारसपत्रे, त्याच्या आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी अर्जासोबत जोडाव्यात.

निवड प्रक्रिया:

आशिया फाऊंडेशन विकास पाठय़वृत्तीसाठी अर्जदारांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. म्हणूनच या पाठय़वृत्तीची निवड प्रक्रियादेखील स्पर्धात्मक स्वरूपाचीच असते. निवड प्रक्रियेतील प्रारंभिक चाळणी प्रक्रिया व मूल्यमापन हे फाऊंडेशनच्या सदस्यांकडूनच हाताळले जाते. त्यानंतरची अंतिम निवड मात्र तज्ज्ञ समितीकडून केली जाते. या तज्ज्ञ समितीचा आशिया खंडातील समस्या, विविध गरजा आणि विकास याबद्दलचा दांडगा अभ्यास असतो. पाठय़वृत्तीधारकांची निवड लिंग, जात, धर्म, वंश, वैवाहिक स्थिती किंवा आíथक पाश्र्वभूमी यांसारख्या कोणत्याही निकषांचा आधार न घेता केली जाते. तसेच त्यांची ओळख व संपूर्ण माहिती निवडप्रक्रिया पूर्ण होईतोवर गोपनीय ठेवली जाते. अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत कळवले जाईल.

अंतिम मुदत:

या पाठय़वृत्ती कार्यक्रमामध्ये शिफारसपत्रे जमा करण्याची स्वतंत्र मुदत नसून, शिफारसपत्रे व पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०१५ आहे.

महत्त्वाचा दुवा:

asiafoundation.org/index.php





वरील लेख (आशिया फाऊंडेशनची पाठय़वृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत २ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?