फ्रान्समध्ये आयफेल शिष्यवृत्ती


फ्रान्समधील अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या खर्च सुसह्य व्हावा यासाठी फ्रान्स सरकारच्या परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आयफेल शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील या अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि. ८ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल:-

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी फ्रान्समधील विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेला असताना त्यांच्या निवास,भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा याबाबतीतील खर्चाचा ताण त्यांच्यावर पडू नये आणि तेथील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे शिक्षण सहजरीत्या व्हावे यासाठी फ्रान्स सरकारच्या परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आयफेल शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकांना त्यांनी निवडलेल्या पदव्युत्तर किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते. या शिष्यवृत्तीअंतर्गत, अभ्यासक्रमाच्या ठराविक कालावधीकरता पदव्युत्तर शिष्यवृत्तीधारकाला साधारणतः ११८१ युरो एवढा मासिक भत्ता दिला जाईल. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीधारकाला इतर सर्व सोयी सुविधाही दिल्या जातील, ज्यामध्ये एकवेळ आंतरराष्ट्रीय विमानप्रवास, सामाजिक सुरक्षा निधी, सांस्कृतिक कार्यक्रम भत्ता यांचा समावेश असेल. पीएचडी करणाऱ्या शिष्यवृत्तीधारकाला मासिक भत्ता १४०० युरो असेल व इतर सर्व सुविधा ह्या पदव्युत्तर शिष्यवृत्तीधारकासारख्याच असतील.

आवश्यक अर्हता :-

ही शिष्यवृत्ती फ्रेंच नागरिकांशिवाय सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. तसेच ज्या अर्जदारांकडे दुहेरी नागरिकत्व असून त्यापैकी एक नागरिकत्व हे फ्रान्सचे आहे, असे अर्जदार या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास अपात्र आहेत. संस्थेने या शिष्यवृत्तीसाठी वयाची अट घातली असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या  अर्जदाराचे वय ३० पेक्षा कमी असावे तर पीएचडीसाठी प्रवेश मिळालेल्या अर्जदाराचे वय ३५ पेक्षा कमी असावे.
ज्या अर्जदारांनी यापूर्वी आयफेल शिष्यवृत्तीला अर्ज केलेला आहे त्यांनी पुन्हा या शिष्यवृत्तीला अर्ज करू नये. तसेच अर्जदाराचा अर्ज फ्रान्समधील कोणत्याही संशोधन संस्था किंवा विद्यापीठाकडून येणे अपेक्षित आहे.
अर्जदाराकडे तो ज्या विषयातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणार आहे त्या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी. तसेच त्याला फ्रान्समधील कोणत्याही विद्यापीठात किंवा संशोधन संस्थेत पदव्युत्तर किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराकडे त्याच्या क्षेत्रातील संशोधन किंवा इतर कोणताही अनुभव असल्यास, त्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने त्याच्या संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराकडे फ्रेंच भाषेचे उत्तम ज्ञान असावे. तसेच त्याने प्रवेश घेतलेल्या फ्रेंच विद्यापीठाने शिफारस केलेली फ्रेंच भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे त्याला बंधनकारक असेल.


अर्ज प्रक्रिया:-
            ज्या अर्जदारांना फ्रान्समधील कोणत्याही विद्यापीठात किंवा संशोधन संस्थेत पदव्युत्तर किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे अशा अर्जदारांनी त्या संस्थेमार्फत या शिष्यवृत्तीला अर्ज करावेत. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या संस्थेला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी मेल करावा. त्याने स्वत: किंवा इतर कोणत्याही स्वरुपात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच एखाद्या अर्जदाराचे नामांकन एकापेक्षा जास्त संस्थांनी पाठवले तर त्याचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

निवड प्रक्रिया:-

अर्जदाराचा अर्ज व त्याबरोबर संशोधनातील त्याची गुणवत्ता व त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी, तसेच ज्या संस्थेने अर्जदाराचे नामांकन केलेले आहे त्या संस्थेचे किंवा विभागाचे फ्रान्समधील स्थान लक्षात घेऊन संबंधित विषयांतील तीन तज्ञांची समिती त्याच्या अर्जाची छाननी करतील. जे अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील, त्यांना मार्च २०१६ मध्ये त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

अंतिम मुदत:-

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ८ जानेवारी २०१६ आहे.

महत्त्वाचा दुवा:-
http://www.campusfrance.org/en



वरील लेख (फ्रान्समध्ये आयफेल शिष्यवृत्तीलोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत १६ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाला

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?