स्वित्झर्लंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती


ग्लोबल अलायन्स (Global Alliance for Public Relations and Communication Management) ही स्वित्झर्लंडमधील जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात  काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वित्झर्लंडमधील युएसआय (University of Italian Switzerland) या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर ग्लोबल अलायन्सच्या सहकार्याने जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवला जातो. या क्षेत्रातील आपल्या करिअरच्या मधल्या टप्प्यात असणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी ग्लोबल अलायन्सच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. ३१ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत. 
शिष्यवृत्तीबद्दल:
आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन असलेले आणि जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामधील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारा प्राध्यापकवर्ग यासाठी ओळखले जाणारे युएसआय (University of Italian Switzerland) हे आंतरराष्ट्रीय स्विस विद्यापीठ आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी साठ टक्के विद्यार्थी हे शंभर विविध देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामधील व्यावसायिक मानके वाढीस लागावी आणि या क्षेत्राच्या माध्यमातून सार्वजनिक हित जोपासले जावे या उदात्त हेतूंनी प्रेरित असलेली ग्लोबल अलायन्स ही स्वित्झर्लंडमधील जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात  काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वित्झर्लंडमधील या दोन्ही संस्था एकमेकांच्या सहकार्याने जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवतात. हा अभ्यासक्रम जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेला आहे. आपल्या करिअरच्या मधल्या टप्प्यात असणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी ग्लोबल अलायन्सच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अर्जदारांना ट्युशन फीच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते.
युएसआयचा जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन विभाग नामांकित आहे. या विभागात विषयाशी संबंधित विविध शाखांमध्ये संशोधन होते. विभागामध्ये पदवीपासून ते पीएचडीपर्यंत सर्व अभ्यासक्रम असून प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धात्मक वातावरण असते. जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन विभागाने याच विषयातील अर्धवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केला असून  तो EMScom (Executive Master of Science in Communications Management)  या नावाने ओळखला जातो. ग्लोबल अलायन्सची ही शिष्यवृत्ती याच अर्धवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागू आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी पावणेदोन वर्षांचा आहे म्हणून शिष्यवृत्तीधारकाला त्या कालावधीपुरतीच शिष्यवृत्ती उपलब्ध असेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला ग्लोबल अलायन्सकडून त्या कालावधीकरता २४५०० स्विस फ्रान्क्स म्हणजे साधारणपणे सोळा लाख रुपये एवढे शिष्यवृत्ती वेतन दिले जाते. या शिष्यवृत्ती वेतनामध्येच शिष्यवृत्तीधारकाला त्याची पन्नास टक्क्यांपर्यंत ट्युशन फीची रक्कम भरता येइल.  संस्थेच्या इतर सुविधा शिष्यवृत्तीधारकास उपलब्ध असतील. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही.
आवश्यक अर्हता :
ही शिष्यवृत्ती जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात कार्यरत असावा. त्याच्याकडे या क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. अर्जदाराने तसे त्याच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र अर्जासोबत जोडावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने टोफेल अथवा आयइएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हीपैकी एका परीक्षेत उत्तीर्ण असावे.

अर्ज प्रक्रिया:
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संस्थेच्या वेबसाईटवर जमा करावा. त्याबरोबरच तो अर्ज सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांसाहित त्याने ग्लोबल अलायन्स संस्थेला कुरियर सेवेने संस्थेच्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज  जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., स्वत:चा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रेआतापर्यंतच्यासर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयइएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे.
निवड प्रक्रिया:
अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व त्याची आर्थिक निकड लक्षात घेऊन निवड समिती अर्जाची छाननी करेल व अर्जाची अंतिम निवड हे निकष प्रामुख्याने लागू करून करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या अर्जदारांना दि. ६ फेब्रुवारी २०१६  पर्यंत त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल. अर्जदाराला पुढील पाच दिवसांत शिष्यवृत्तीच्या स्वीकारार्हतेबद्दल निर्णय घेऊन तो समितीला कळवणे बंधनकारक राहील. 
अंतिम मुदत:- 
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जानेवारी  २०१६  आहे.
महत्वाचा  दुवा :-
                                                                              

वरील लेख (स्वित्झर्लंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत ३० नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?